Tuesday, May 20, 2008

शिक्षणाचे तीन-तेरा! राज्यातील 90 हजार मुले शिक्षणापासून वंचित

शाळाबाह्य विद्यार्थी ः शिक्षण खाते खेळतेय आकड्यांचा खेळ

चिमणीचे पिलू किंवा वाघाचे बछडे कधीच शाळेत जात नाही? मग माणसाच्या पिलालाच शाळेची गरज का भासते? खरेच शाळा एवढी महत्त्वाची आहे; मग सरसकट सर्वांनाच शिक्षण का मिळत नाही? या प्रश्‍नाचे उत्तर मिळणे कठीणच आहे. आजही राज्यातील सुमारे नव्वद हजारांहून अधिक मुले प्राथमिक शिक्षणापासून वंचित आहेत.

सहा वर्षांपूर्वी अशाच शाळाबाह्य मुलांची संख्या सोळा लाखांच्या घरात होती. आता ही संख्या नव्वद हजारांवर जाऊन पोहोचली आहे. काही दिवसांत ही संख्या शून्यावर पोहोचली, तर आश्‍चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. कारण राज्यातील शाळाबाह्य मुलांची संख्या झपाट्याने कमी होत असून एकही शाळाबाह्य मूल राज्यात दिसणार नाही, असे दिवास्वप्न तीन वर्षांपूर्वी शिक्षणमंत्र्यांनी दाखविले होते. त्यामुळे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षण खात्याकडून आकड्यांचा खेळ खेळला जात आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबापुरीत सुमारे 50 हजार मुले शाळाबाह्य आहेत; तर राज्यातील इतर जिल्ह्यांत त्याचे प्रमाण ठाणे (2,591), रायगड (648), नाशिक (3,331), पुणे (1,650) आणि नागपूर (3,353) असे आहे.

शिक्षण खात्याच्या अनागोंदी कारभारामुळे नेमकी किती मुले शाळाबाह्य आहेत आणि किती शिक्षणाच्या प्रवाहात आली, याची नेमकी आकडेवारी शिक्षण खात्याकडे उपलब्ध नसल्याचेच स्पष्ट होते.

1 comment:

Anonymous said...

ऎकुणच महाराष्ट्र शासनाचा शिक्षणाकडे पाहण्याचा द्रुष्टिकोन संपुर्णपणे नकारात्मक आहे.मूळ समस्यांकडे लक्ष न देता शिक्षकां साठी आचार संहिता बनवण्यात त्यांना रस आहे. शिक्षकांचे पगार यांना तीन तीन महिने देता येत नाहीत. शाळांची विविध कारणां साठीची (उद: प्रयोग शाळा) अनुदाने वर्षानु वर्षे रखडली आहेत. छोट्या गांवात शाळांसाठी धड इमारती नाहीत, असल्याच तर त्याना छप्पर नाही. एकूण व्यवस्थापन असे आहे की या देशात शिक्षणाची गरजच काय? आणि हे राज्यकर्ते यांना सोइचे आहे कारण समाज सुशिक्षत झाला तर वाचेल विचार करेल आणि मग यांची व्होट बॅंक कमी होइल ही भिती तर नाही नां.
जे शासन नवीन शिक्षक भरती करताना 'शिक्षण सेवक' या पदावर शिक्षकांची भरती करतात आणि त्यांचा पगार हा शाळेतील शिपाया इतका किंवा काही वेळा त्याहून कमीच असतो त्यांना चांगले शिक्षक तरी कसे मिळणार? अर्थात शासनाला सुद्धा चांगले जाउदे किमान शिक्षण तरी मिळावे हे तरी कुठे वाटते आहे.

दैनेक ई-सकाळचा एक नियमीत वाचक - कॅलिफोर्निया, अमेरिका