Tuesday, January 20, 2009

सीमाप्रश्न आणि मुंबई

मुंबईत सुखद गारवा आहे. पण हळूहळू राजकीय भट्ट्या पेटू लागल्या आहेत. या शहराला निवडणुकीची चाहूल पटकन लागते. तशात परवा कुर्ल्यात पोटनिवडणूक झाली. शिवसनेच्या उमेदवाराने तेथे राष्ट्रवादीला चारीमुंड्या चीत केलं. सध्या त्याचीच चर्चा सुरु आहे. म्हणजे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा कसा शिवसेनेची पालिकेतील सत्ता उधळून लावण्याचा प्लॅन होता आणि कुर्ल्यातल्या दलित समाजाने त्या योजनेला कसा सुरुंग लावला आणि मनसेचे तेथे कसे काही चालले नाही, अशा वृत्तपत्रीय चर्चा लोकलमधल्या गप्पांतून ऐकू येत आहेत. मधल्या काळात, म्हणजे दहशतवादी हल्ल्यानंतर मनसेचा यूपी-बिहारी विरोधाचा अजेंडा झाकोळला गेला होता. अशा राष्ट्रीय आपत्तींच्यावेळी माणसं म्हणजे देशाचे नागरिक वगैरे नेहमीच एक होतात. पण आता आपत्ती टळली आहे. मुंबई आपापल्या कामा-संसाराला लागली आहे. नेहमीची रहाटगाडगी फिरू लागली आहेत. नेमकी ही वेळ साधून पुन्हा एकदा राज ठाकरे बोलणार आहेत. येत्या २४ तारखेला उत्तरप्रदेश दिन आहे. हा मोका मनसे कसा गमाविल? ठाण्यात २४ला राज ठाकरेंची सभा लागलेली आहे. तेथे ते काय बोलणार याची लोकांना मोठी उत्सुकता आहे म्हणे! उत्सुकता आहे. पण ते काय बोलणार याची नाही. ते आता मुंबईला पाठ झालेले आहे! उत्सुकता आहे ती याची, की ते बोलल्यानंतर काय होणार याची? निवडणुकीची हवा सुरू झाली की ठिणग्यांची आग व्हायला वेळ लागत नाही!

राज ठाकरे यांच्या भाषणात बेळगावचा मुद्दा असेल का? असेलच. कारण प्रश्न कर्नाटकात मराठी माणसांवर होणा-या अन्यायाचा आहे. पण या प्रश्नाबद्दल राज ठाकरे यांचा जो मतदारसंघ आहे, त्या मराठी तरुणांना काही देणे-घेणे आहे का? मुळात हा प्रश्न नेमका काय आहे, हे तरी मुंबईकर मराठी तरूणांना माहित आहे का?

तीन वर्षांपूर्वी सकाळच्या टुडे पुरवणीतर्फे मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्याचे मुख्यालय अलिबाग येथे एक सर्व्हे करण्यात आला होता. आर. आर. पाटील तेव्हा गृहमंत्री होते.  बेळगावच्या मुद्द्यावर प्रसंगी "महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल' अशी सिंहगर्जना त्यांनी बेळगावातील मेळाव्यात केली. त्यामुळे वृत्तपत्रांत त्यावर भरभरून लिहून येत होते. अशा काळात या शहरांतील मराठीबहुल महाविद्यालयांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून जे निष्कर्ष हाती आले ते धक्कादायक होते.     

मुंबईतील हुतात्मा स्मारक शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले आहे... बेळगाव पुण्याजवळ आहे... अशी काही उत्तरे त्या सर्वेक्षणात मराठी विद्यार्थ्यांनी दिली होती. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल आजच्या पिढीला अतिशय कमी आस्था आहे, हे त्यातून स्पष्ट झाले होते. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर अनेक विद्यार्थी ठाम होते, मात्र वृत्तपत्रीय प्रोपागंडातूनच अनेक विद्यार्थ्यांच्या राजकीय जाणीवा तयार होत आहेत, हे वास्तवही त्यातून समोर आले होते. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील एक धगधगते पर्व. मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे, या एका घोषणेसाठी एकशे पाच वीरांनी बलिदान केले. त्याची जाणीव मराठी तरूणाईला आहे काय, हे जाणून घेण्यासाठी या सर्वेक्षणामध्ये "मुंबईतील हुतात्मा स्मारक कोणाच्या स्मरणार्थ उभारण्यात आले आहे?' असा सोपा प्रश्‍न विचारण्यात आला होता. पण खेदाची बाब म्हणजे 84 टक्के विद्यार्थ्यांना या साध्या प्रश्‍नाचेही उत्तर देता आले नाही. काहींनी हे स्मारक गिरणी कामगारांच्या स्मरणार्थ उभारण्यात आले आहे, असे ठोकून दिले होते. एकाने "शिवाजी महाराज', तर एकाने "गांधीजींच्या स्मरणार्थ' असे त्याचे उत्तर दिले होते!
सर्वेक्षण घेण्यात आलेल्यांपैकी जवळपास निम्म्या विद्यार्थ्यांना सीमावाद काय आहे, हे माहित होते. बहुतेकांनी बेळगाव महाराष्ट्रात यावे अशी इच्छा प्रकट केली होती. यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे या प्रश्‍नावरून केंद्र सरकार महाराष्ट्रावर अन्याय करीत आहे, असेच बहुतेकांना वाटत होते. आपल्या राष्ट्रीय पातळीवरील राजकीय पक्षांनी लक्षात घ्यावा, असा हा मुद्दा आहे.

मात्र अनेक मराठी विद्यार्थ्यांचा बेळगावच्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय वेगळा असल्याचेही यातून दिसून आले होते. मुंबईच्या आयआयटीत शिकणाऱ्या दिलीप म्हस्के या 28 वर्षांच्या तरूणाने त्याबाबत काही वेगळे मुद्दे उपस्थित केले होते. तो म्हणाला होता, की महाराष्ट्रातील राजकीय पक्ष राज्याच्या हिताबाबत किती गंभीर आहेत, हेच स्पष्ट होत नाही. शिवाय राज्यात आणखी एखाद्या मागासलेल्या भागाची भर का घालायची हाही मोठा प्रश्‍न आहे! प्राची गावडे या एमबीएच्या विद्यार्थिनीला सीमाप्रश्‍न हा नॉन इश्‍यू वाटला होता. जागतिकीकरणाच्या काळात अशा प्रश्‍नांवर वेळ वाया घालविणे अयोग्य आहे, असे तिचे मत होते. वर्षा साळुंखे या एसएनडीटीत माहिती आणि ग्रंथालय शास्त्र या विषयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकत असलेल्या युवतीनेही, "जागतिकीकरणाच्या युगात प्रदेशांतील अंतर नष्ट होत असल्याने हा आग्रह योग्य नाही,' असे सांगितले होते.

आज पुन्हा एकदा असा सर्व्हे केला तर त्याची उत्तरे काय असतील, हे पाहणे मोठे मनोरंजक ठरेल. कदाचित आज मराठी तरुणांना हा सगळाच सीमाप्रश्न म्हणजे केवळ राजकीय स्टंटगिरी वाटत असेल. तुम्हाला काय वाटते? मराठी तरुण खरेच अशा सिनिक नजरेने या वादाकडे पाहात आहेत?

Friday, January 16, 2009

राज्यात येणार ३५ हजार शाळांचे पीक

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर २० हजार प्राथमिक व १५ हजार माध्यमिक शाळांच्या प्रस्तावांना एकाच क्षणात मंजुरी देण्याची जोरदार तयारी शासनदरबारी सुरू आहे. या ३५ हजार नव्या विनाअनुदानित खासगी शाळांच्या प्रस्तावांवर मंजुरीची स्वाक्षरी होताच, राज्यातील शासकीय शाळांतील हजारो शिक्षकांच्या नोकरीवर गदा येणार आहे. कायम विनाअनुदानित शाळांच्या या पुरात शासकीय व विनाअनुदानित शाळांमधील पटसंख्या वाहून जाणार आहे.

ग्रामीण भागातील शाळांमधील पटसंख्या आजच रोडावत आहे. विद्यार्थी गळतीचे प्रमाण वाढत असतानाच खासगी शाळांकडे पालकांचा कल वाढतो आहे. त्यामुळेच महापालिका, जिल्हा परिषद व नगर परिषदेतील शाळांमधील शिक्षकांना पटसंख्या वाढविण्यासाठी घरोघरी फिरावे लागत आहे. नव्या शाळांची भर पडल्यास शिक्षकांना पटसंख्या कायम राखण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

गावपातळीवर इंग्रजी माध्यमातील विनाअनुदानित शाळा सुरू झाल्यास त्याकडे मध्यमवर्गीयांचा कल अधिक राहणार आहे. मागणी व पुरवठ्याचा निकष लावूनच शासनाने शाळांना मंजुरी द्यावी, या मागणीकरिता येत्या १८ तारखेला पुण्यातील नारायणपेठेतील न्यू इंग्लिश शाळेत शिक्षकांचा मेळावा घेण्यात येत आहे, असे पुणे येथील शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे यांनी सांगितले.

इंग्रजी माध्यमातील शाळांची संख्या झपाट्याने वाढते आहे. परिणामी भाषा शिक्षक अतिरिक्‍त होत आहेत. मराठी शाळा बंद पडत असल्यानेदेखील शिक्षकांच्या नोकरीवर परिणाम होताना दिसून येतो आहे. आज विनाअनुदानित शाळांमधील कायम शिक्षकांची संख्या ६० हजारांहून अधिक आहे. त्या शाळा अद्याप अनुदानावर न आल्यामुळे अल्प वेतनावर शिक्षक काम करीत आहेत. एका गावात तीन ते चार शाळा हे प्रमाण असल्यामुळे त्यात नवीन शाळांची भर पडल्यास विद्यार्थ्यांची पळवापळवी झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचा सर्वाधिक फटका शासकीय शाळांना बसणार आहे.

आकडे बोलतात
-प्राथमिक व माध्यमिक शाळा : ५० हजार
-एकूण शिक्षक : ५ लाख
-कायम विनाअनुदानित शाळा : ६ हजार
-शिक्षक संख्या : ६० हजार
-शिक्षण सेवक : ४० हजार
-नियमित शिक्षक : ४ लाख

इतक्‍या शाळांना एकदम मंजुरी दिल्यास शासकीय शाळांतील शिक्षक बेरोजगार होतीलच. शिवाय शाळांची संख्या वाढली तरी शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्‍नही कायम राहतोच. त्यामुळेच आहे त्या शाळांची परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिक शाळांना मंजुरी देण्याचा विचार योग्य आहे काय, आपल्याला काय वाटते?

Saturday, January 10, 2009

सत्यमचा धडा

सत्यम कॉम्प्युटर्सचे अध्यक्ष बी. रामलिंगम राजू यांनी आपण कंपनीमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याची कबुली देत आपला राजीनामा दिला. त्यानंतर सत्यमचा शेअर तब्बल ७७ टक्‍क्‍यांनी कोसळला आणि शेअर बाजाराला तसेच सर्वसामान्य गुंतवणूकदाराला धक्का बसला.

अमेरिकेतील सब प्राइमचा बसलेला फटका, त्यानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळलेल्या अनेक वित्तीय संस्था, कच्च्या तेलाचे दिवसेंदिवस उतरत असलेले भाव या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजारासह जगभरातील सर्वच प्रमुख शेअर बाजार "आजारी' अवस्थेत होते. त्यांच्या प्रकृतीत थोडा-फार चढउतार होत असला तरी म्हणावी तशी सुधारणा नव्हती. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्येही हतबलता आली होती. त्यात सत्यमच्या घोटाळ्याचीही भर पडली.

या घोटाळ्याने कॉर्पोरेट क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांच्या प्रतिमेला धक्का लावण्याचे काम तर केले आहेच शिवाय शेअर बाजाराच्या, शेअर बाजाराची नियंत्रक म्हणून काम करणाऱ्या "सेबी'च्या विश्‍वासार्हतेवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. सत्यमची नोंदणी न्यूयॉर्क शेअर बाजारतही झाली आहे. त्यामुळे या गैरव्यवहारामुळे भारतातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची परदेशात जी प्रतिमा आहे, तिलाही धक्का बसला आहे. या निमित्ताने हिशेब लेखापरीक्षण, नियंत्रण यांतील ज्या काही त्रुटी उघड झाल्या आहेत, त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूक किती सुरक्षित आहे, याचा विचार सर्वसामान्य, मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांच्या मनात येणे स्वाभाविक आहे.

गेल्या काही वर्षांत मध्यमवर्गीयांची शेअर बाजारातील गुंतवणूक वाढली होती. गुंतवणूकदारांनाही फायदा होतच होता. मात्र सध्याची आर्थिक अस्थिरता आणि सत्यमने शिकवलेला धडा यांमुळे कमीत कमी काळात अधिक फायद्यापेक्षाही सुरक्षिततेचा विचार केला, तर नवल वाटायला नको. ही गोष्ट गुंतवणूकदार आणि कंपन्या दोन्हींसाठी फारशी चांगली नाहीये. त्यामुळेच या प्रकरणातून धडा घेऊन अर्थ मंत्रालय, कंपनी कामकाज खाते, सेबी या सर्वांनी कंपन्यांच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणे, आवश्‍यक आहे.

Thursday, January 08, 2009

'सत्यम'चा फुगा फुटला

देशातील आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी गणल्या गेलेल्या "सत्यम कॉम्प्युटर्स' कंपनीच्या अध्यक्षांनीच कंपनीची आर्थिक स्थिती अवाच्या सव्वा फुगवून आर्थिक भरभराटीचा फुगा आणला होता, असे बुधवारी स्पष्ट झाले. वर्षानुवर्षे केलेल्या या गैरप्रकाराची कबुली देऊन, अध्यक्ष रामलिंग राजू यांनी पदाचा राजीनामा दिला. राजू यांचे बंधू व कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. रामा राजू यांनीही पदाचा राजीनामा दिला. देशाच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील हा सर्वांत मोठा गैरप्रकार मानला जात असून, कंपनीच्या ५३ हजार कर्मचाऱ्यांचे भवितव्यही त्यामुळे धोक्‍यात आले आहे.

त्यातून भारताची कॉर्पोरेट आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील उज्ज्वल प्रतिमाही डागाळली जाण्याची शक्‍यता आहे. नीतिमत्ता, कॉर्पोरेट व्यवस्थापन, हिशेब आणि व्यवसाय सेवा यांबाबतची विश्‍वासार्हताही धोक्‍यात येणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि गैरप्रकाराच्या सूत्रधारांवर कडक कारवाई होईल, अशी घोषणा कॉर्पोरेट व्यवहार मंत्री आणि सेबी यांनी केली.


हा प्रकार उघड झाल्यानंतर "सेबी'ने कंपनीच्या शेअरची खरेदी, विक्री किंवा अन्य सर्व व्यवहारांची सत्यता तपासून पाहण्याचे आदेश दिले. कंपनीच्या हिशेब नोंदींची तपासणीही होणार आहे. हे सर्व प्रकरण गंभीर गैरप्रकार तपास कार्यालयाकडे सुपूर्त करण्यात येणार आहे.

दोषींवर कारवाई होईल तेव्हा होईल, पण या गैरव्यवहारमुळे ५३ हजार कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्‍यात आले त्याचे काय? "सत्यम'सारखे गैरव्यवहार रोखण्यासाठी कोणते उपाय योजावेत, या बद्दल आपल्या प्रतिक्रिया कळवा...

Friday, January 02, 2009

राज्यातील पोलिस ठाणीही होताहेत "हायटेक'

राज्यातील ९९४ पोलिस ठाण्यांना 'इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी'ने जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नव्या वर्षात कार्यान्वित केला जाणार आहे. "क्राईम ऍण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्किंग सिस्टिम' (सीसीटीएनएस) या प्रकल्पांतर्गत पोलिस खात्यात "ई-गव्हर्नन्स' योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी केंद्र सरकारकडे यंदा तीनशे कोटी रुपयांची मागणी केली आहे.

पोलिस खात्यातील कामकाजाच्या संगणकीकरणासाठी राज्य पोलिस दल "नाईन-एएस' हा पथदर्शी प्रकल्प राबविणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्‍यक माहिती गोळा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. सुरवातीच्या काळात मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई, नाशिक येथील पाच पोलिस आयुक्तालये आणि विशेष शाखांमध्ये हा प्रकल्प राबविला जाईल. दुसऱ्या टप्प्यात सर्व राज्यभर त्याची अंमलबजावणी होईल. राज्यातील दोन लाख पोलिसांच्या कामकाजाचे नियोजन त्याद्वारे करण्यात येणार आहे.

"कॉमन इंटिग्रेटेड पोलिस ऍप्लिकेशन' (सीपा) या प्रकल्पात राज्यातील दहा पोलिस आयुक्तालये आणि ३३ जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालये संगणकाद्वारे जोडण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला. नंतर याच प्रकल्पात सुधारणा करून तो "क्राईम ऍण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्किंग सिस्टिम' असा करण्यात आला. "ब्यूरो ऑफ पोलिस रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट'तर्फे तो राबविला जात आहे. केंद्र सरकारच्या साह्यातून हा प्रकल्प पाच वर्षांच्या कालावधीत राबविणार आहे. दोन हजार कोटी रुपयांचा निधी त्यासाठी राखून ठेवण्यात आला आहे. देशभरातील प्रत्येक पोलिस ठाण्यात दाखल होणारे गुन्हे व त्यांच्या तपासाची माहिती "ऑनलाइन' उपलब्ध होण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे. या प्रकल्पासाठी प्रत्येक ठाण्यात किमान पाच संगणक व पाच प्रिंटर मिळण्याची मागणी महाराष्ट्र पोलिसांनी केंद्राला केली आहे.

सध्या पोलिस दलात "ई-गव्हर्नन्स'च्या माध्यमातून "क्राईम ऍण्ड क्रिमिनल इन्फोसिस्टिम' (सीसीआयएस) व "फॅक्‍ट्‌स फाइव्ह' हे दोन प्रकल्प सुरू आहेत. "सीसीआयएस'द्वारे गुन्ह्याचा प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) ते आरोपपत्र दाखल करण्यापर्यंतची माहिती उपलब्ध होते, तर "फॅक्‍ट्‌स फाइव्ह'मध्ये राज्यातील प्रत्येक गुन्हेगाराच्या बोटांच्या ठशांचे रेकॉर्ड ठेवण्याचे काम सुरू आहे. पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) ते सुरू आहे.

सध्या राज्यातील प्रत्येक पोलिस आयुक्तालय आणि जिल्हा अधीक्षकांशी "ऑनलाइन' पत्रव्यवहार केला जातो. "ई-गव्हर्नन्स' प्रत्येक गावापर्यंत पोहण्यासाठी प्रयत्नशील राज्य सरकारची "ब्रॉडबॅंड कनेक्‍टिव्हिटी' येत्या वर्षभरात सर्वत्र पोचेल. त्यातून पोलिस यंत्रणेतील अंतर्गत गतिमान समन्वय राखला जाईल, असा विश्‍वास सहायक पोलिस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी व्यक्त केला. पोलिस खात्यासाठी आवश्‍यक साधनसामग्रीची खरेदीसाठी ऑनलाइन निविदांची पद्धतही लवकरच सुरू करण्याचे सरकारचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिस दलातील ई-गव्हर्नन्स-

-महाराष्ट्र पोलिसांचे www.mahapolice.gov.in हे संकेतस्थळ.
-नियमित "अपडेट' होणाऱ्या या संकेतस्थळाला काही महिन्यांतच दोन लाख जणांची भेट
-मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक पोलिसांची स्वतंत्र संकेतस्थळे
-मुंबईसह राज्यात पोलिस दलांतर्गत "ऑनलाइन' पत्रव्यवहाराला म्हणावा तसा प्रतिसाद नाही
-ग्रामीण भागातील पोलिस ठाण्यांमध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्‍यकता

या प्रयत्नाचा उपयोग पोलिस दलाची कार्यक्षमता वाढविण्यास तसेच सर्वसामान्यांच्या मनात पोलिसदलाबद्दल विश्‍वासार्हता निर्माण करण्यासाठी होऊ शकतो, असे आपल्याला वाटते का?

Thursday, December 25, 2008

विधिमंडळ परिसरात आमदारांचे धूम्रपान

सार्वजनिक ठिकाणच्या "धूम्रपान बंदी'ची अधिसूचना धुडकावण्याचे चित्र नवे नाही...मात्र हेच दृश्‍य विधिमंडळ परिसरातील असेल तर ?..

विधिमंडळ परिसरात सध्या कडेकोट बंदोबस्त आहे. साधी काडीपेटी नेणेही जिकरीचे, तिथे सर्रास धूम्रपान सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव बुधवारी या परिसरात उघडकीस आले. खिडकीशेजारी उभे राहून धूर सोडणाऱ्या आमदारांच्या गप्पा अशा रंगल्या होत्या, की त्यांना कायद्याची आणि नियमांची सोडा, पण कॅमेरे घेऊन सज्ज असणाऱ्या मंडळींचेही भान राहिले नाही. कायदे घडविणाऱ्या "विधिमंडळा'च्या देखत होणाऱ्या उल्लंघनाची विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर दखल घेतील काय, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

अधिवेशन सुरू असल्यामुळे विधिमंडळ परिसरात सध्या कडेकोट बंदोबस्त आहे. कुणी "परिंदा' ही "पर' मारू शकणार नाही, अशी चोख (?) व्यवस्था परिसरात आहे. तरीहीदेखील सवयीचे गुलाम असणाऱ्या अनेकांनी या परिसरात धूम्रपानासाठी "सुरक्षित' स्थळदेखील शोधून ठेवले असल्याचे गेल्या आठ दिवसांतील निरीक्षणानंतर निदर्शनास आले. प्रसाधनगृहे, कॅण्टीनचे किचन, पक्ष कार्यालयातील पडद्यामागची जागा किंवा परिसरात उभ्या असलेल्या चार चाकी वाहनांचा धूम्रपानासाठी सर्रास वापर केला जात आहे.

धूम्रपानावरील बंदी मोडण्याच्या घटनांवर बुधवारी (ता. २४), तर कडीच झाली. एका आमदार महोदयांनी विधिमंडळाच्या इमारतीमधील खिडकीजवळ उभे राहूनच मनसोक्त धूम्रपान करीत असल्याचे बघून उपस्थितांना धक्काच बसला. त्यांना "कंपनी' देण्यास आणखी एक विधानसभा सदस्य होते. या घटनेमुळे सार्वजनिक स्थळी धूम्रपान करणाऱ्या सामान्य नागरिकांवर कारवाईची भाषा वापरणारे सरकार सरकारच्या जवळ असणाऱ्यांच्या बाबतीत नियम शिथिल तर करीत नाही ना, असा स्वाभाविक प्रश्‍न पडला आहे. विधिमंडळ परिसरात ही बंदी कशाप्रकारे तोडली जाते याच्या मागावर "सकाळ'चा चमू होता. त्यात हे आमदार बुधवारी अडकले.

बंदी असूनही शहरात अनेक सार्वजनिक ठिकाणी हा प्रकार सुरू आहेच; परंतु विधिमंडळ परिसरातील हा प्रकार धक्कादायक असल्याचे मत व्यक्त होत आहे. गुटख्याच्या पुड्या आणि इतर आक्षेपार्ह वस्तूदेखील परिसरातील कर्मचारी, पोलिस आणि पुढाऱ्यांजवळ आढळून येतात. कायदा करणाऱ्यांवरच जर वचक निर्माण करता येत नसेल तर बंदीचे आदेश हवेत कशाला, असा संतप्त सूरही यानिमित्ताने आता निघू लागला आहे.

आमदारांनी सार्वजनिक ठिकाणी केलेल्या धुम्रपानाविषयी आपल्याला काय वाटते. कायदा करणारेच कायदा मोडत असतील, तर त्यांना काय शिक्षा करावी, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. ...