Showing posts with label trible. Show all posts
Showing posts with label trible. Show all posts

Friday, April 18, 2008

आदिवासी विद्यार्थ्यांची उपासमार

पोषण आहार बंद ः उपस्थिती रोदावअली

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दिला जाणारा पोषण आहार ऐन परीक्षांच्या काळात तडकाफडकी बंद करण्यात आल्याने शहापूर तालुक्‍यात विद्यार्थ्यांची उपासमार होत आहे. शिवाय शाळेतील उपस्थितीवरही परिणाम होत आहे.

तालुक्‍यातील चारशे शाळांमध्ये पोषण आहार दिला जात होता. मात्र 1 एप्रिलपासून आहार देणे बंद करण्यात आल्याने गरीब व आदिवासी विद्यार्थ्यांची उपासमार होत आहे. दुपारचे जेवण मिळत नसल्याने शाळेत जाण्याऐवजी गरीब मुले गावातील लग्नाच्या पंगतीत गर्दी करतात. त्यामुळे शाळेतील उपस्थिती रोडावली आहे. याबाबत विद्यार्थी सेनेचे तालुका संघटक सुरेश पाटील यांनी पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्याद्वारे त्यांनी पोषण आहार बंदच्या निर्णयामुळे होणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधले आहे.

ऐन परीक्षांच्या काळात पोषण आहार बंद केल्याने एकच गोंधळ उडाला आहे. पंचायत समितीचे अधिकारीही चक्रावून गेले आहेत. काहीही करा; पण धान्य उसनवारी घेऊन पोषण आहार सुरू ठेवा, असे तोंडी आदेश शिक्षकांना देण्यात आल्याचे समजते. मात्र कोणत्याही शाळेत अजून तरी पोषण आहार सुरू करण्यात आलेला नाही, असे सांगण्यात आले.

अगोदरच अनेक संधीपासून वंचित असलेल्या या विद्यार्थ्यांचा आहार बंद करून जिल्हा परिषदेने शिक्षणविषयक उदासिनता दाखवून दिली आहे.

Saturday, December 29, 2007

"सिकल सेल' म्हणजे काय?

"सिकल सेल' म्हणजे एक प्रकारचा हिमोग्लोबिनचा आजार. जनुकीय दोषांमुळे रक्ताच्या पेशींमधील हिमोग्लोबिनमध्ये दोष निर्माण होतात. सिकल म्हणजे कोयता. या आजारात रक्तातील पेशी कोयत्याच्या आकाराच्या होतात, त्यामुळे या आजाराला "सिकल सेल' असे म्हटले जाते. यात केवळ रुग्णाला पाहून किंवा नाडीची चाचणी करून त्याचे निदान करता येत नाही. त्याच्या रक्ताची "हिमोग्लोबिन इलेक्‍ट्रोफोरेसिस' ही विशिष्ट चाचणी करून हा रोग झाला आहे काय, हे तपासावे लागते. या रोगाबाबत एक विशेष बाब म्हणजे "सिकल सेल' झालेल्या रुग्णांना हिवताप होत नाही. या रुग्णांच्या पेशींमध्ये हिवतापाच्या जंतूंना विरोध करणारे घटक तयार झालेले असतात, त्यामुळे त्यांना हिवतापाचा संसर्ग होत नाही.

लक्षणे
या आजारात वेगवेगळी लक्षणे दिसतात. रक्तपेशी कोयत्याच्या आकाराच्या झाल्यामुळे त्या एकमेकींना जोडल्या जाऊन रक्तवाहिन्यांमध्ये अडकून पडतात. त्यामुळे काही वेळा या रोगाने ग्रस्त झालेल्या रुग्णांचे हातपाय खूप दुखतात (हॅंड फूट क्रायसिस). काही वेळा रक्त शरीरात एका बाजूला झुकल्यामुळे ते कमी पडते (हिमोलायसिस). अशा वेळी रुग्णाला बाहेरून रक्त द्यावे लागते. या आजारात रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. काही वेळा रुग्णाला दम लागणे, कावीळ होणे आदी लक्षणेही दिसतात. रक्तातच दोष निर्माण झाल्याने रुग्ण ऍनेमियाने ग्रस्त झालेले दिसतात. काही वेळा ऑक्‍सिजनच्या अभावामुळे रुग्णांना खूप तीव्र वेदना होतात.

रोग कोणाला होतो?
"सिकल सेल' आजार आनुवंशिक असतो. भिल्ल, आदिवासी किंवा वंचित घटकांमध्ये सर्वसाधारणपणे हा रोग आढळतो. छोटे जनसमुदाय, किंवा ज्या समुदायांमध्ये नात्यांत विवाह होतात, त्यांच्यात "सिकल सेल'चे प्रमाण जास्त आढळते. महाराष्ट्रात सातपुड्याचा पट्टा, गडचिरोली, धुळे, विदर्भ आदी भागांत या आजाराचे प्रमाण जास्त आहे.

उपचार काय?
"सिकल सेल' या आजारावर कोणतेही थेट उपचार नाहीत. रुग्णांत जशी लक्षणे दिसतात, त्यानुसार उपाययोजना करावी लागते. (उदा. रक्त कमी झाल्यास बाहेरून रक्त देणे) या आजारावर काही जनुकीय उपचार (जेनेटिक थेरपी) करता येतात का, यावर संशोधन सुरू आहे.

Friday, December 28, 2007

एकदशांश लोकसंख्येला "सिकलसेल' आजार


राज्यातील लोकसंख्येच्या एकदशांश म्हणजेच एक कोटी 21 लाख नागरिकांना "सिकलसेल' या जीवघेण्या रोगाने ग्रासले आहे, अशी धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. सरकारने याची गंभीर दखल घेतली असून, या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी तातडीची पावले उचलण्याकरिता राज्यस्तरीय समिती स्थापन केली आहे.

विदर्भातील सर्व जिल्ह्यांसह राज्यातील एकूण 19 जिल्ह्यांमधील आदिवासी पट्ट्यातील नागरिकांना "सिकलसेल' (रक्तामधील रोगप्रतिकारक पेशींना नष्ट करणाऱ्या कोयत्याच्या आकाराच्या पेशी तयार होणे) या रोगाने ग्रासले आहे. या आजारात माणसाच्या शरीरातील रोगप्रतिबंधक शक्ती कमी होऊन त्याला अन्य आजार होतात. त्यातच त्याला मृत्यू ओढवण्याची शक्‍यता असते. नागपूर येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजने तयार केलेल्या अहवालानुसार हा प्रकार उघडकीस आला आहे. या भागातील गरिबी, अशिक्षितपणा आणि कुपोषणामुळे या रोगाचे प्रमाण वाढले आहे. याची व्याप्ती लक्षात घेऊन राज्य सरकारने तातडीने एक बैठक बोलावून या आजारावर प्रतिबंध आणि नियंत्रण आणण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. त्यासाठी राज्यस्तरावरील उच्चस्तरीय समिती नेमण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

"सिकलसेल' हा आजार विशेषतः आदिवासींना होतो. हा आजार अनुवंशिक असल्याने त्याची व्याप्ती वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. या रोगावर प्रभावी औषध आजही उपलब्ध नाही.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोगाचा फैलाव होऊनही सरकारी यंत्रणा यापासून अनभिज्ञ कशी काय राहू शकते? सिकलसेलने ग्रासलेले रुग्ण दगावल्यानंतर शासनाचे डोळे उघडले नाही, हे नशीबच म्हणायचं...