Saturday, September 06, 2008

सिम्बायोसिस टेकडीवर हिरवाई

शहरातील प्रदूषण, वृक्षतोड, नष्ट होत असलेल्या टेकड्यांबद्दल नेहमीच चर्चा होते. महापालिका, वनखात्याचे अधिकारी विविध उपक्रम राबवितात; पण जबाबदार नागरिक म्हणून या समस्येवर मार्ग काढणारे फार थोडेच! याच हेतूने काही मंडळी सिम्बायोसिस टेकडीवर एकत्र आली आणि बघता बघता गेल्या दहा वर्षांत त्यांनी टेकडीचे चित्रच पालटून टाकले... या मंडळींनी स्थापन केलेल्या "ग्रीन हिल्स ग्रुप'ने विविध प्रकारच्या झाडे लावण्याबरोबरच महापालिका, वनविभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने पाण्याचे नियोजनही केले आहे. गवतही उगवणार नाही, अशा खडकाळ टेकडीवर ग्रुपने हिरवीगार वनराई फुलवली आहे. डेक्कन आणि सेनापती बापट रस्त्यावर फिरताना बाहेरून कोणाला वाटणारही नाही एवढी हिरवाई टेकडीवर पाहायला मिळते. विविध प्रकारचे पक्षीही येथे वास्तव्यास आले आहेत.

"ग्रीन हिल्स ग्रुप'च्या या कार्याला या वर्षी दहा वर्षे पूर्ण होत आहेत. यात प्रामुख्याने शिंदेमामा, श्रीकांत परांजपे, रवी पुरंदरे यांच्यासह निवृत्त कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही मंडळी रोज सकाळी व्यायामासाठी, श्रमदानासाठी जमतात आणि रोपांना माती लावणे, पाणी साठवण्याच्या खड्ड्यातील माती काढणे, नवीन रोपांची लागवड आणि रोपांची मशागत करताना दिसतात. काही शाळा आता त्यांच्या या उपक्रमामध्ये सहभागी झाल्या आहेत.

याबद्दल माहिती देताना पुरंदरे म्हणाले, ""झाडे लावल्यानंतर त्यांना पाणी घालायचे कसे, असा प्रश्‍न पूर्वी आमच्या समोर होता. यासाठी टेकडीवर व्यायामाला फिरायला येणाऱ्या लोकांच्या हातात पाण्याने भरलेल्या पाण्याच्या बाटल्या द्यायला सुरवात केली. ज्यांना शक्‍य आहे ती मंडळी छोट्या बादलीतून पाणी घेऊन जात होती. आता टेकडीवर सिमेंटच्या टाक्‍या बांधल्या आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात रोपांना पाणी देण्याची काही प्रमाणात सोय झाली आहे. पुढील सहा महिन्यांत महापालिकेतर्फे टेकडीच्या पायथ्याच्या टाकीजवळ सायकली ठेवण्यात येणार आहेत. व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांनी सायकलवर व्यायाम केला की ते पाणी वरच्या टाक्‍यांवर पोहोचणार आहे,'' असेही त्यांनी सांगितले.

सिम्बायोसिस टेकडीवर नागरिकांनी निर्माण केलेली वनराई, स्तुत्यच आहे. संपूर्ण शहराचे कॉंक्रिटीकरण होत असताना अशा प्रकारची हिरवी बेटं शहराच्या फुफ्फुसाची भूमिका बजावतात. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी अशाप्रकारच्या उपक्रमात सहभागी होऊन वनराई तयार केली पाहिजे. तरंच ग्लोबल वॉर्मिंगला काही अंशी का होईना आपण दूर ठेवू शकू...

1 comment:

Unknown said...

The Green hills group members & many other unknown citizens deserve to be complimented for their sustained efforts & resourcefulness,which successfully converted the almost barren Hanuman Tekdi into a lush green one in a short span!

स्वतःच्या डोळ्याने हे परिवर्तन पाहिले असल्यामुळे त्या सर्वांचे मनापासून हार्दिक अभिनंदन!