Friday, September 05, 2008

बार डान्सरही सच्चा कलाकारच - उच्च न्यायालय

पूर्वी डान्स बारमध्ये काम करणारी आणि सध्या एका हॉटेलमध्ये काम करणारी महिला सच्चा कलाकार असू शकते, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकत्याच दिलेल्या एका निकालात व्यक्त केले आहे.

आठ वर्षांपूर्वी ( ९ एप्रिला २०००) नागपूर पोलिसांनी क्‍लबवर धाड टाकली होती. त्यावेळेस क्‍लबमध्ये अश्‍लील नृत्य चालू होते असे कारण देऊन व्यवस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र घटनास्थळी केलेल्या पंचनाम्यात कोणत्याही अश्‍लील कृत्याची पुरेशी माहिती दिलेली नव्हती. याविरोधात हॉटेलचे मालक धनंजय देवधर यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. तीन वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाने ही फिर्याद रद्द केली होती. सर्वोच्च न्यायालयानेही व्यवस्थापनाच्या बाजूने निकाल दिला होता. मात्र दरम्यानच्या काळात पोलिसांनी पुन्हा मुंबई पोलिस कायद्यानुसार क्‍लब व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटीस बजावून परवाना निलंबित केला. क्‍लबमध्ये काम करणाऱ्या महिला सच्चे कलाकार नाहीत, असा आरोप पोलिसांनी ठेवला होता. या निलंबनाला देवधर यांनी पुन्हा दुसऱ्या याचिकेद्वारे न्यायालयात आव्हान दिले. ज्या कलाकारांवर ठपका ठेवण्यात आला होता, ते मुंबईच्या डान्स बारमध्ये पूर्वी काम करीत होते. मात्र मुंबईच्या डान्स बारनाही कार्यक्रम सादरीकरणाचा परवाना राज्य शासनच देते, असे न्यायालयाने निकालात सांगितले. परवाना निलंबित करण्याची पोलिसांची कारवाई न्यायालयाने अवैध ठरवून रद्दबातल केली.

न्यायालयाने बारडान्सरना सच्चा कलाकार असं संबोधून बारगर्लचा गौरव केला आहे. मात्र, काळजी एवढीच वाटते की त्यातून डान्सबार संस्कृत पुन्हा बोकाळणार तर नाही?

No comments: