Wednesday, June 11, 2008

पाचशे महिला कर्मचारी असल्यास पाळणाघर सक्तीचे

नगरविकास सचिव ः विकास नियमावलीत सुधारणा

मुंबईत यापुढे नव्याने बांधण्यात येणाऱ्या व्यापारी, औद्योगिक आणि अन्य आस्थापनांच्या इमारतीत पाचशेपेक्षा अधिक महिला कर्मचारी असतील, तर अशा ठिकाणी 40 चौरस मीटर क्षेत्रफळाचे पाळणाघर बांधणे विकसकावर बंधनकारक राहील. यासाठी विकास नियमावलीत आवश्‍यक सुधारणा करण्यात आली आहे. नगरविकास खात्याचे प्रधान सचिव टी. सी. बेंजामिन यांनी मंत्रालयात पत्रकारांना ही माहिती देताना, येत्या दोन-तीन महिन्यांत राज्यात अन्यत्रही पाळणाघरांच्या सक्तीसाठी नियमावलीत दुरुस्ती करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे, असे सांगितले. या सुधारणांची अंमलबजावणी महानगरपालिकेने करावयाची आहे.

महाराष्ट्र पहिलानोकरी करणाऱ्या महिलांसाठी पाळणाघरांची कामाच्या ठिकाणीच व्यवस्था करणे बंधनकारक करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य असल्याचे बेंजामिन यांनी सांगितले. महिला कर्मचाऱ्याचे मूल कामाच्या ठिकाणच्या पाळणाघरात असेल, तर तिला कामाकडे पूर्ण लक्ष देणे शक्‍य होईल, या उद्देशाने पाळणाघर योजना राबविण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे.

ही योजना स्वागतार्ह असली, तरी पाळणाघराचे बंधन राहू नये म्हणून महिला कर्मचाऱ्यांची संख्या पाचशेपेक्षा कमीच असल्याचे दाखविण्यात येईल, असे होण्याची शक्‍यता आहे. त्याचप्रमाणे पाळणाघरासाठी मुंबईसारख्या शहरात उपनगरी गाड्यांच्या गर्दीतून लहान मुलाला रोज घेऊन जाणे महिला कर्मचाऱ्यांना अशक्‍यप्राय आहे, त्यामुळे याचाही विचार झाला पाहिजे.

1 comment:

ASHISH BADWE said...

मिस वैशाली, तुम्ही विचार केला तो योग्य आहे. प्रत्येक कायद्याच्या कचाट्यातुन मार्ग शोधण्यात तरी भारतीयांचा कोणी हात पकडु शकत नाही. पाळणाघराची संकल्पना निश्चीत चांगली आहे. परंतु त्यात आणखी सुधारणा अपेक्षीत आहे. आणि खरच ही संकल्पना यशस्वी होईल असे वाटत नाही. त्यापेक्षा संयुक्त कुटुंब पध्दती वाढवी याकरीता जर शासनाला काही करता आले तर पाळणा घराची आवश्यकताच राहणार नाही. कारण संयुक्त कुटुंब पध्दतीत लहान मुलांचे संगोपन लक्षपुर्वक होते असे मला वाटते ही पध्दती भारतात लोप पावत आहे तिला जिवंत ठेवण्याकरीता राज्य शासनाने पुढाकार घेतल्यास महाराष्ट्र राज्य असा निर्णय घेणारे पहिले राज्य ठरेल नाही का?
आशिष बडवे पांढरकवडा
९४०३४५५९६०
visit my site - www.dainikyavatmalnews.com
Email - ashishbadwe@gmail.com