Thursday, June 12, 2008

राडारोड्यामुळे तळेच "गायब'!

मुळा रस्ता ः पावसाळ्यात पाणी झोपडपट्टीत शिरण्याचा धोका

पुणे-मुंबई रस्त्यावर वाकडेवाडी येथे सुरू असलेल्या एका मोठ्या बांधकामाच्या जागेतील राडारोडा टाकून मुळा रस्त्यावरील पाण्याचे नैसर्गिक तळे पूर्णपणे बुजविण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात तेथे साचणारे पाणी आता थेट मुळा रस्ता झोपडपट्टीत शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. राडारोड्यामुळे तळे पूर्णपणे गायब झाल्याचे महापालिका प्रशासनाने आता कबूल केले आहे. संबंधित कंत्राटदाराने परवानगी घेतली होती का? परवानगी घेतली असेल तर कोणाची? याशिवाय, परवानगी न घेताच राडारोडा टाकला का, हे प्रश्न पुढे आले आहेत.

मुळा रस्त्यावरील झोपडपट्टीमागे हे विस्तीर्ण तळे आहे. पावसाळ्यात ते पूर्णपणे भरते. तळे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत आहे. हे तळे उतारावर असून, उताराच्या खालच्या बाजूस मुळा रस्त्यावरील मोठी झोपडपट्टी आहे. झोपडपट्टी महापालिकेच्या हद्दीत आहे. तळ्यामुळे झोपडपट्टीत पाणी शिरण्यापासून रक्षण होत होते. आता तळे पूर्ण बुजविल्यामुळे पाण्याचे लोंढे थेट झोपड्यांना धडकण्याची शक्‍यता आहे.

कारवाई कुणी करायची?
या राड्यारोड्यामुळे पाणी झोपडपट्टीत शिरू शकेल या धोक्‍याची जाणीव आता महापालिका प्रशासन व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डालाही झाली आहे. राडारोडा टाकताना काहीही कारवाई न करणाऱ्या या दोन्ही यंत्रणांमध्ये, राडारोडा काढून संबंधितांवर कारवाई करायची कोणी, यावरून टोलवाटोलवी सुरू आहे.

आपल्याही परिसरात असा राडारोडा टाकलेला असल्यास किंवा टाकला जात असल्यास त्याची माहिती आणि छायाचित्रे या ब्लॉगवर नक्की टाकावीत...

2 comments:

Anonymous said...

TALE RADARODA TAKOON BUJVILYACHE VACHOON HASAVE KI ... TECH KALAT NAHI.
MAHAPALIKET BHAYANAK ANDADHUNDEE VA
BESHIST TASECH BILDER LOBBY RAJYA KARAT ASLYANECH HE PRAKAR RAJROS
SARVANCHYA DOLYAT DHOOL PHEK KAROON
HOTAT.AATA TALE KON BALKAVATE TE
PAHAYACHE

captsubh said...

जसे हे तळे गायब झाले तसेच इंद्रायणी व इतर नद्यांची पात्रे गायब किंवा अतिशय अरूंद होत चाललेली आहेत.राम नदीचे असेच अस्तित्व संपले!
या बातम्या सकाळमध्ये व सकाळच्या ब्लोगवर फ़ोटोसकट प्रसिद्ध होतात,वाचक त्यांचे विचार/प्रतिक्रिया व्यक्त करतात,पण सारे कांही अलबेल असल्यासारखी परिस्थिती "जैसे थे"च रहाते!
महसुलमंत्री नारायण राणे इंद्रायणी नदीच्या पात्रात ३०-४० हजार ट्रक राडारोडा टाकून तिचे पात्र अरूंद झाल्यावर पावसाळ्यात जवळपासच्या घरात/शेतात हाहाकार होत आहे पहात असतांनाहि स्वस्थ रहातात!जिल्हाधिकारी,तहसीलदार इत्यादि अधिकारी या प्रकरणाकडे पूर्ण दुर्लक्ष करतात!शिवसेनेचे नेते रामदास कामत व BJP चे नेते तेथे भेट देवून याकडे लक्ष वेधतात.
डोक्टर बालाजी तांबे यांच्या कार्ल्याचे आत्मसंतुलन व्हिलेजला पुराचा धोका असूनहि कारवाई कांहीच होत नाही कारण यात एका मंत्र्याचे हितसंबंध जपायचे असतात!
जो महसुलमंत्री जनतेच्या हिताची कधीहि कदर करत नाही तो स्वतःचा स्वार्थ जपत मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने बघत जनतेच्या पैशाने दिल्लीच्या वा-या करत तेथे लोटांगणे घालत असतो!
हल्ली नद्या,तळी ही प्रायव्हेट प्रोपर्टी असल्यासारखे समजून समाजकंटक बिल्डरांची लोबी राज्यकर्त्यांशी संधान बांधून अशी अतिक्रमणे चालूच ठेवतात.
खरेतर अशा लोकांना आधीच थोपवायला हवे असते,पण झोपलेले व टेबलाखालून सतत लांच खाणारे शासन कधीच दखल घेत नाही म्हणून जनतेच्या नशिबी अशा बातम्या पचविण्यापेक्षा दूसरे कांहीच रहात नाही!
बरे पुण्याचे पालकमंत्रीतरी यात लक्ष घालतील अशी अपेक्षासुद्धा करता येत नाही कारण ते स्वतःच निरनिराळ्या मोक्याच्या ठिकाणच्या जमिनी विकासाच्या नांवाखाली हस्तगत करण्यात इतके गुंग असतात की ते कुणाला प्रतिबंध करणार???
त्यामुळे त्यांची सकाळ वृत्तपत्र समुहाशी बांधिलकी असूनहि उपयोग कांहीच नाही!!!
सर्व एकाच माळेचे मणी! देश वा गांवे वा शहरे किंवा तेथिल हतबल जनता मग जावू द्या खड्ड्यात!
मला खात्री आहे की सकाळ समुहाचा व त्याच्या संपादकांचा उद्देश अतिशय प्रामाणिक आहे,पण त्यांच्यापण पूर्ण लक्षात आले आहे की तेपण सध्याच्या परिस्थितीत तितकेच असहाय आहेत!
त्यामुळे त्यांचा जनजागृती करण्याचा प्रयत्न अपूरा व थोडाफ़ार केविलवाणा दिसू लागला आहे!