Friday, January 18, 2008

देणग्या न घेण्याचे न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

पोलिसांनी चौक्‍या उभारण्यासाठी आणि अन्य पायाभूत सुविधांसाठी कोणाही नागरिकाकडून किंवा संस्थांकडून देणग्या घेऊ नयेत व त्या पुरस्कृतही करू नयेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला. देणग्या घेऊन उभारलेल्या व अनधिकृत चौक्‍यांबाबत आयुक्तांनी प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे निर्देश देऊन न्यायालयाने पोलिसांच्या या पद्धतीविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.

पोलिस देणग्या व पुरस्कर्त्यांमार्फत अनधिकृत चौक्‍या उभारत आहेत. हे काय चालले आहे? हे सगळे ताबडतोब थांबवावे. आयुक्तांनी तातडीने एक परिपत्रक जारी करावे, असे निर्देश न्यायमूर्ती बिलाल नाझकी आणि न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या खंडपीठाने दिले. आय. के. चुगानी यांनी शहरातील तीनशेहून अधिक अनधिकृत पोलिस चौक्‍यांबाबत जनहित याचिका सादर केली आहे. मुंबई शहरातील 252 चौक्‍या अनधिकृत असल्याचे मान्य करण्यात आले आहे, तर 52 चौक्‍या पुरस्कर्त्यांमार्फत किंवा देणगीदारांकडून उभारण्यात आल्या आहेत.

या परिस्थितीविषयी खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली आणि हे ताबडतोब थांबविण्याचे निर्देश दिले. अनधिकृत चौक्‍यांना मान्यता देण्याबाबत महापालिकेकडे पाठपुरावा करण्यात येत आहे व त्यास मंजुरी न मिळाल्यास त्या पाडून टाकण्यात येतील, असे निवेदन पोलिसांतर्फे न्यायालयात करण्यात आले होते. त्यामुळे किती पोलिस चौक्‍या अनधिकृत आहेत, अनधिकृत चौक्‍यांबाबत कोणता निर्णय घेण्याचा विचार आहे, किती चौक्‍या देणग्यांतून व पुरस्कर्त्यांकडून उभारण्यात आल्या आहेत, याचा तपशील देणारे प्रतिज्ञापत्र आयुक्तांनी सादर करावे, असे निर्देश खंडपीठाने दिले. पुढील सुनावणी 24 जानेवारीला ठेवण्यात आली आहे.

देणगीदारांमार्फत चौक्‍या उभारण्याची वेळ मुंबई पोलिसांवर यावी, ही निश्‍चितच खेदजनक बाब आहे. त्या पार्श्‍वभूमीवर न्यायमूर्ती बिलाल नाझकी आणि न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या खंडपीठाने प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश देऊन पोलिसांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.

1 comment:

Anonymous said...

Dengitun Police chukya ubharne mhanje Maharashtra Sashan Bhrashtrala halu halu official ani gondas swrup denayacha su-sanghatit kat rachat ahe. Karan mag asya "Sponsoser" che POLICE mindhe honar. Ashi "sponcership" Daud sarkhya lokankadun ghetyalayas phar bare. To airconditiond police chaukya hi dayel.

Vijay Naik