नारायण राणेंनी स्वगृही परतावे - समर्थकांचा कल
नारायण राणे यांनी आपली आगामी राजकीय वाटचाल नागपूर अधिवेशनानंतर घोषित करण्याचे स्पष्ट केले आहे; परंतु त्यांनी स्वगृही म्हणजे शिवसेनेत परतावे, असा विचार त्यांच्या समर्थकांतून व्यक्त होऊ लागला आहे.
गेल्या साडेतीन वर्षांत कॉंग्रेसमधील घुसमटीतून मोकळे झालेले कार्यकर्ते आणि समर्थक नव्या पक्षासाठी फारसे उत्सुक नाहीत. त्यामुळे राणेंच्या आगामी भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
राणेंवर कॉंग्रेसने केवळ निलंबनाचा बडगा उगारला आहे. कॉंग्रेसमधून निलंबनाचा कालावधी ठरविलेला नाही. राणेंनी पक्ष सभासदत्वाचा राजीनामा दिलेला नाही; परंतु पक्षश्रेष्ठींसह ते सत्ताधाऱ्यांवर आरोप करीत आहेत. कॉंग्रेसमधील आपणास एकही पद नको. हा पक्ष केवळ दलालांचा आहे. तेथे प्रामाणिक माणूस चालत नाही. पक्ष संपविणाऱ्या माणसांना तेथे मान-सन्मान नाही, अशी टीका राणेंनी केली आहे. त्यामुळे राणे आता कॉंग्रेसमध्ये फार काळ थांबणार नाहीत, या शक्यतेला बळकटी मिळत आहे. अधिवेशनानंतर आपली भूमिका जाहीर करताना ते कॉंग्रेसला स्वतःहून सोडचिठ्ठी देतील, असे चित्र कालच्या सभेनंतर स्पष्ट झाले. त्यामुळे राणे आपली राजकीय वाटचाल कोणत्या दिशेने ठेवतील, या बाबत उत्सुकता आहे. काल येथे झालेल्या मेळाव्यानंतर जवळच्या समर्थकांनी त्यांची भेट घेतल्याचे समजते. या भेटीत राणेंनी प्रत्येक कार्यकर्त्याचे मत जाणून घेतले. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मतांनुसार पूर्ववैमनस्य विसरून शिवसेनेत परतावे. कॉंग्रेसने केलेल्या अपमानाचा बदला घ्यायचा असल्यास स्वगृही परतणे हितकारक ठरेल, असा सूर कार्यकर्त्यांमधून उमटू लागला आहे. काही कार्यकर्त्यांनी मात्र नवा पक्ष काढून आपली ताकद आजमावायला काय हरकत आहे, असे मत मांडल्याचे समजते.
आपल्यालाही राणेंनी स्वगृही म्हणजे शिवसेनेत परतावे, असेच वाटते का? की त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करून आपले सामर्थ्य दाखवून द्यावे...