राणे कॉंग्रेस सोडणार?
कॉंग्रेसमध्ये एकाकी पडलेले महसूलमंत्री नारायण राणे आता पक्षातूनही बाहेर पडणार का, अशी चर्चा सध्या सुरू असून, "आता राणे फार काळ पक्षात राहत नाहीत,' अशी प्रतिक्रिया ऐकू येत आहे. येत्या दहा-पंधरा दिवसांतच याबाबतची हालचाल अपेक्षित असल्याचा अंदाज पक्षात व्यक्त होत आहे.
पक्षश्रेष्ठींनी देऊ केलेल्या "शेवटच्या संधी'वरही राणे यांच्याकडून प्रतिसाद न आल्याने आता ते कॉंग्रेसचे कमी दिवसांचेच सोबती राहिल्याचेही बोलले जात आहे. राणे यांना पक्षात सामावून घेण्यासाठी पक्षश्रेष्ठींच्या पातळीवरूनही अनेक प्रयत्न करण्यात आले होते. प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्षपद त्यांना देऊ करण्यात आले होते; पण त्यांनीच ते नाकारले होते. त्यानंतरच त्यांना प्रदेश प्रचार समितीचे अध्यक्षपद देऊ करण्यात आले आणि त्याबाबतही त्यांनी फारशी अनुकूलता दाखविली नाही. राणे यांनी त्यांचा हट्टीपणा सोडावा, यासाठी कॉंग्रेस अध्यक्षांचे राजकीय सचिव अहमद पटेल, महाराष्ट्राच्या प्रभारी सरचिटणीस मार्गारेट अल्वा, राणे यांना कॉंग्रेसमध्ये आणण्यात मोठी भूमिका बजावणारे बाळासाहेब विखे-पाटील यांनीही त्यांची समजूत घालण्याचे प्रयत्न केले. अगदी राणे यांनी दिल्लीस दिलेल्या शेवटच्या भेटीच्या वेळीही त्यांना सबुरीचा सल्ला देण्यात आला होता; पण राणे यांनी भूमिकेत बदल केला नाही.

