चिअरगर्ल्सवर बंदीच हवी!
चिअरगर्ल्स तोकडे कपडे घालून नृत्य करतात, हे भारतीय संस्कृतीला शोभत नाही, असे सांगत राज्यातील काही नेत्यांनी चिअरगर्ल्सवर बंदी घालण्याची मागणी केली. चिअरगर्ल्सवर बंदी घालण्याचा कायदा अजून तरी आपल्याकडे नाही, असे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी म्हटले आहे. त्यांचे नृत्य अश्लिल वाटले, तर मात्र पोलिस कारवाई करू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केल्यामुळे नवी मुंबईत होणाऱ्या सामन्यांमध्ये चिअरगर्ल्सच्या नृत्याकडे पोलिसांचे विशेष लक्ष असेल, हे तर स्पष्ट आहे.
महाराष्ट्रात चिअरगर्ल्सवर बंदी घालावी का, या "ई-सकाळ'ने विचारलेल्या प्रश्नाला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. "ई-सकाळ'कडे आलेल्या "मेल'च्या निरिक्षणातून बहुसंख्य जण चिअरगर्ल्सवर बंदी घालावी, याच विचारांचे असल्याचे जाणवते.
देशाबाहेर राहणारे भारतीय स्वतःच्या संस्कृतीचा विसर पडू न देता, वेगवेगळ्या देशांच्या संस्कृती आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. देशाबाहेर राहणारे भारतीयही स्वतःचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करतात आणि त्या देशाच्या कार्यक्रमांमध्येही सहभागी होतात.तोकडे कपडे घालून नृत्य करणाऱ्या चिअरगर्ल्स सांस्कृतिक मूल्यांवर जगणाऱ्या बहुसंख्य भारतीयांच्या मानसिकतेला मानवणाऱ्या नाहीत.
"आयपीएल'चे सामने मनोरंजन करणारे असले तरी खेळाडूंना चिअर करण्यासाठी त्यांचे पाठिराखे मैदानावर उपस्थित असतात. त्यासाठी चिअरगर्ल्स कशाल हव्यात. उलट चिअरगर्ल्समुळे खेळाडूंची एकाग्रता कमी होत असल्याने ही संकल्पनाच योग्य वाटत नाही.