बराक ओबामा का जिंकले?
अवघ्या दोन वर्षांपूर्वी बराक हुसेन ओबामा कोणाला माहिती होते?... फारसे कोणालाच नव्हते. अमेरिकेच्या राजकीय नकाशावर उदय होण्याइतपतही इलिनॉसच्या या सिनेटरचे राजकारणात स्थान नव्हते.
मग ते जिंकले कसे? चतुर आणि शिस्तबद्ध प्रचार, पैशाचा प्रचंड वापर आणि अनुकूल राजकीय वातावरण हे तीन मुद्दे ओबामांच्या विजयासाठी कारणीभूत ठरले, असे जागतिक प्रसारमाध्यमांनी विश्लेषण केले आहे.
उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेत ओबामांनी हिलरी क्लिंटन यांच्यासारख्या दिग्गजाला मागे टाकले, तेथेच ते अर्धी लढाई जिंकले. उरलेली लढाई त्यांनी पैशाच्या जोरावर जिंकली. प्राथमिक फेऱ्यांतच ओबामांना वाढता प्रतिसाद मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला. दात्यांची संख्या जशी वाढत गेली, तसा त्यांनी प्रचारासाठी सरकारी पैसा नाकारला. त्यामुळे पैशाच्या वापराचे बंधनही त्यांच्यावर उरले नाही. त्यांच्या प्रचार मोहिमेला पैसा देणाऱ्यांची मोठी फळी उभी राहिली. "फेसबुक'चे संस्थापक ख्रिस ह्यूज यांनी ओबामांना इंटरनेट निधी प्रणाली तयार करून दिली. त्याद्वारा ३० लाख लोकांनी त्यांना पैसा उभा करून दिला. त्यातूनच ओबामा हे विरोधी जॉन मॅकगेन यांच्यापेक्षा चौपट खर्च करू शकले.
दूरचित्रवाणीचा ओबामांनी आपल्या प्रचारात मॅकगेन यांच्यापेक्षा सफाईने वापर करून घेतला. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात ओबामांनी मॅकगेन यांना प्रत्येक आघाडीवर मागे टाकले. रिपब्लिकन पक्षाच्या बालेकिल्ल्यातही ओबामांनी मॅकगेन यांची दमछाक केली. व्हिडिओ गेमच्या सीडींमध्येही ओबामांनी जाहिराती दिल्या.
"व्होट फॉर चेंज' (बदलासाठी मतदान करा) हे ओबामांचे आवाहन अमेरिकेतील तरुणाईला भावले आणि त्यांनी ओबामांना भरभरून मतदान केले, हे आकडेवारीवरून स्पष्ट झाले. "एक घर, एक कार आणि एक कुटुंब' या प्रतिमेमुळे ओबामांना ज्येष्ठांची पसंती मिळाली.
आपल्याला काय वाटते, कशाच्या जोरावर ओबामा निवडणूक जिंकले असतील...चतुर आणि शिस्तबद्ध प्रचारामुळे की अनुकुल वातावरणामुळे? आपण ओबामाच्या जिंकण्याने समाधानी आहात का? भारतीयांची त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे, असे वाटते?
बराक ओबामा यांचा स्लाईड शो