Monday, September 22, 2008

मित्राने २३ लाख बुडविल्याने कुटुंबाचा अंत

पत्नी आणि दोन मुलांचा दोरीने गळा आवळून खून करून पतीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पिंपरीच्या मिलिंदनगरजवळ रविवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास उघडकीस आली. पतीने पत्नी आणि मुलांना पावभाजीतून विष दिल्याचेही आढळले.

उसनी दिलेली मोठी रक्कम वसूल न झाल्याने हा प्रकार घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. विजय मुथय्या पुजारी (वय ४५), पत्नी सुगंधा (वय ४०), मुलगा प्रतीक (१२) आणि मुलगी प्रेरणा (१८, रा. सर्व मिलिंदनगरजवळ, व्हिक्‍टरी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, पिंपरी) अशी मृतांची नावे आहेत. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजारी कुटुंबीय मूळचे कर्नाटकचे असून, गेल्या ३० वर्षांपासून शहरात स्थायिक झाले होते. त्यांचा मुलगा प्रतीक पाचवीत शिकत होता; तर प्रेरणा एम. यू. महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती.

सहायक पोलिस आयुक्त प्रभाकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय यांचा मृतदेह छताच्या हुकाला लटकलेला होता. त्यांची पत्नी आणि दोन्ही मुलांच्या गळ्यांवर दोरीने आवळल्याच्या खुणा आढळल्या. विजय यांच्याजवळ एक चिठी सापडली आहे. ""एका मित्राला २३ लाख रुपये दिले होते. ते परत करण्यासाठी मित्राने दिलेले दोन धनादेश न वटल्याने मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही,'' असा मजकूर या चिठीत आहे.

अशाप्रकारे घरातील इतर सदस्यांचा खून करून आत्महत्या करण्याच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये वाढल्या आहेत. आर्थिक तोटा सहन करावा लागला महणून आत्महत्या करणे, हा मार्ग होऊ शकत नाही. शिवाय आर्थिक फरवणुकीच्या घटनाही अलीकडे वाढलेल्या दिसतात. बेभरवशाच्या आजच्या जमान्यात कोणाशीही एवढ्या मोठ्या रकमेचे व्यवहार करणे सर्वसामान्यांनी टाळायला हवे. नाही का...?आपल्याला काय वाटते, याविषयी? आपणही अशा घटना आजूबाजूला पाहिल्याच असतील. तर, आमच्याशी त्या शेअर करा, पुणे प्रतिबिंब आणि सकाळ ब्लॉगवर

1 comment:

patil said...

antharun pahun paye pasarave