Sunday, September 21, 2008

भारतातर्फे विदेशी कॅटेगरीत पाठविण्यात येणाऱ्या चित्रपटांमध्ये "तारे जमीं पर' या चित्रपटाची निवड झाली असली तरी हा एका मराठी माणसाचाच विजय आहे. कारण "तारे जमीं पर' या चित्रपटाचे क्रिएटिव्ह डायरेक्‍टर अमोल गुप्ते आहेत. तसेच त्यांनीच या चित्रपटाची कथा आणि पटकथा-संवाद लेखन केले आहे. त्यामुळे एका अर्थी मराठीचाच हा विजय आहे, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष अजय सरपोतदार यांनी व्यक्त केली.


भारतातर्फे ऑस्करच्या शर्यतीत एकूण नऊ चित्रपट होते. त्यातील विशेष बाब म्हणजे या नऊ चित्रपटांपैकी निशिकांत कामत यांचा "मुंबई मेरी जान', आशुतोष गोवारीकरचा "जोधा अकबर', मंगेश हाडवळेचा "टिंग्या', उमेश कुलकर्णीचा "वळू' हे चित्रपट मराठी माणसांचेच होते. त्यामुळे या वेळच्या ऑस्करच्या शर्यतीत मराठी माणसांचेच वर्चस्व होते आणि एका मराठी माणसानेच यामध्ये बाजी मारली याचा आनंद होत आहे, असेही ते म्हणाले.


खरे तर "मामि' चित्रपट महोत्सवात "टिंग्या'ने अटीतटीची लढत "तारे जमीं पर'ला दिली होती. अनेक पुरस्कार या चित्रपटाने पटकाविले. त्यामुळे ऑस्करच्या शर्यतीत हा चित्रपट जरी मागे पडला असला तरी आता मी तो वेगळ्या पद्धतीने पाठविणार आहे. टिंग्या ऑस्करला जाणारच आहे, अशी प्रतिक्रिया "स्मॉल टाऊन प्रॉडक्‍शन'चे रवी राय यांनी व्यक्त केली. टिंग्या हा चित्रपट त्यांनी बनविला होता. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी परीक्षकांच्या निर्णयावर नापसंती दर्शविली नाही.


ऑस्करच्या स्पर्धेत बाजी मारणाऱ्या आपल्या मराठी बांधवांना या ब्लॉगवर शुभेच्छा द्यायला विसरू नका...मराठी माणसाविषयीच्या आपल्या भावनाही व्यक्त करा. अमोल गुप्तेनं ऑस्करपर्यंत धाव घेऊन बच्चन कुटुंबीयांना दाखवून दिलंय... की हम यहॉंकें शेहेनशा...