Tuesday, August 12, 2008

वाहतुकीसाठी सर्वत्रच उदासीनता

पुण्यातील एकूण लोकसंख्येच्या २५ टक्‍क्‍यांपेक्षाही अधिक म्हणजेच पाच लाख एवढी शालेय विद्यार्थ्यांची संख्या आहे. मल्टिमीडिया सेक्‍शनमध्ये आणखी भरपूर काही...असे असतानाही शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीबाबत आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत सर्वच पातळ्यांवर उदासीनता दिसून येते. रस्त्यांलगत, चौकांलगत नव्हे तर शहरी मध्यवस्त्यांत असलेल्या शाळांच्या परिसरात या प्रश्‍नाचे गांभीर्य अधिक ठळकपणे जाणवते.

आज पुण्यात शाळांची संख्या हजारोंच्या घरात आहे. त्यातील बहुतांश शाळा मुख्य रस्त्यांलगत आहेत. किंबहुना कित्येक रस्त्यांचा विकास शाळांना डोळ्यांसमोर ठेवून करण्यात आला आहे. तर, बऱ्याच शाळा ऐन चौकात आहेत.वाहतूक कोंडी पुणे शहराला नवीन नसली, तरी अनेक रस्त्यांवरील वाहतूक कोंडीला शाळाच कारणीभूत ठरत असल्याचे चित्र आहे; तर याच वाहतुकीने शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्‍यात आणली आहे. औंधचे शिवाजी विद्यालय, पुणे विद्यापीठ चौकातील पाषाण रस्त्यालगतचे आणि जंगली महाराज रस्त्यावरील मॉडर्न हायस्कूल, शिवाजीनगर येथील भारत इंग्लिश स्कूल, जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावरील हेलेनाज स्कूल, लक्ष्मी रस्त्यालगतची हुजूरपागा, नूमवि, टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल, महाराष्ट्र मंडळ, वनिता समाज शाळांमधील विद्यार्थी वेगवान वाहतुकीचा सामना करत आहेत. शाळेचे मुख्य प्रवेशद्वार थेट रस्त्यावरच खुले होत असल्याने विद्यार्थ्यांना अन्य कोणताही पर्याय राहिलेला नाही.

पाषाण रस्त्यावरील मॉडर्न हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. जी. बनसोडे म्हणाले, ""या रस्त्यालगत असलेल्या विद्यापीठ चौकात तीन रस्ते एकत्रित येतात, पर्यायाने मोठी वाहतूक असते. शाळा तसेच कार्यालये एकाच वेळी सुटत असल्याने शाळेसमोरील रस्त्यावर वाहनांचा ओघ मोठा असतो. शाळेसमोरील रस्त्यांची विकासकामे या प्रश्‍नात भरच टाकतात.'' शाळेच्या आवारात प्रवेश मिळत नाही म्हणून मिळेल तेथे (विद्यार्थ्यांची ने-आण करणारी), कधी रस्त्याच्या पलीकडे, तर कधी शाळेपासून दूर अंतरावर उभी केलेली वाहने, ही वाहने गाठण्याच्या नादात विद्यार्थ्यांनी उडणारी धांदल, तारेवरची कसरत करत वाहतुकीतून वाट शोधणारे विद्यार्थी असे चित्र शाळांच्या ठिकाणी हमखास पाहायला मिळते. अहिल्यादेवी प्रशालेच्या पीएमपीएलच्या बस जागेअभावी बालगंधर्व पुलाजवळ तर रेणुका स्वरूप शाळेच्या बस भिकारदास मारुती मंदिराजवळील बस स्थानकाजवळ थांबवाव्या लागतात, असे बसचालकांनी सांगितले.

मध्यवस्तीतील शाळा जागेचे निमित्त करून वाहनांना प्रवेश नाकारतात. मात्र या शाळांकडून उपलब्ध जागेचा मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक वापर होत असल्याचा दावा या क्षेत्रातील तज्ज्ञ करतात. ही वाहने शाळा भरणे-सुटण्याआधीच शाळेबाहेरील अरुंद रस्त्यांवर गर्दी करतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. शाळांलगतच्या अरुंद रस्त्यांवर चारचाकी वाहने उभी असतात असे त्यामुळे या रस्त्यांवर रिक्षा उभ्या करता येत नाहीत. अनेक पालक शाळेच्या मुख्य दरवाज्यापर्यंत पाल्यांना सोडण्याबाबत आग्रही असतात त्यामुळेही वाहतुकीची कोंडी होते, असे रेणुका स्वरूपच्या मुख्याध्यापिका सुषमा कुलकर्णी यांनी सांगितले.

त्यातच शाळा सुटल्यानंतर तीन हजार विद्यार्थ्यांनींचा लोंढा एकदम रस्त्यावर येतो. परिणामी वाहन चालविणे कठीण जातेच, पण वाहतूक कोंडीला दररोजच सामोरे जावे लागते. काही शाळांच्या चौकात वाहतूक नियंत्रक दिवे लावले आहेत. मात्र, या सिग्नलचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते, असे शाळा आणि विद्यार्थी सांगतात. अगदी याउलट तक्रार अन्य वाहनचालक करतात. या वाहनचालकांच्या म्हणण्यानुसार, मुलांना शाळेत सोडण्यासाठी आणि नेण्यासाठी आलेली वाहने रस्त्यावरी अत्यंत बेशिस्तपणे उभी केली जातात. नादुरुस्त वाहतूक नियंत्रक दिवे, गैरहजर वाहतूक पोलिस, शाळांच्या प्रवेशद्वारासमोरील झेब्रा क्रॉसिंगचा अभाव यामुळे हा प्रश्‍न दिवसेंदिवस गुंतागुंतीचा होत आहे. काही शाळा वाहतूक कोंडी सोडवण्यास हातभार लावतात. मात्र, काही शाळा ही जबाबदारी ढकलू पाहतात.

वाहतूक विभागाच्या पातळीवरील अनास्था, शालेय पातळीवरील बेजबाबदारपणा, ने-आण करणाऱ्या वाहनचालकांच्या पातळीवरील अरेरावी आणि पालकांच्या पातळीवरील असहाय्यता या गोष्टी विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि हित जोपासण्यास असमर्थ ठरत आहे.

शाळा आणि शाळांलगतची वाहतूक याबाबत आपल्याला काय वाटते. शालेय विद्यार्थ्यांना करावी लागणारी कसरत आणि नित्याने होणारी वाहतूक कोंडी याला कोणते घटक कारणीभूत आहेत, असे आपल्याला वाटते. शिवाय या गोष्टी टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबविल्या पाहिजे, असे आपल्याला वाटते?
आपण आपल्या प्रतिक्रिया एसएमएसद्वारेही पाठवू शकता. त्यासाठी टाईप करा. एअरटेल मोबाईलधारकांसाठी PUN5 (आपली प्रतिक्रिया) आणि पाठवा 56666 वर. इतर मोबाईलधारकांसाठी PUN5 (आपली प्रतिक्रिया) आणि पाठवा 54321 या क्रमांकावर.

2 comments:

captsubh said...

चांगले जुने ते संभाळता येत नसतांना नवा "विकास,विकास" असा नारा सतत लावून पुण्यामध्ये सर्व उद्योग,शिक्षणसंस्था,माहिती उद्योग वगैरे एकवटून वाढलेल्या प्रचंड लोकसंख्येमुळे व त्याबरोबरच्या प्रचंड वाहनसंख्येमुळे वाहतुकीची ही लाजिरवाणी परिस्थिती उदभवली आहे!

गेले कांही वर्षे लोकसंख्यावाढीला काबुत ठेवण्याच्या व अक्राळविक्राळ वाढणा-या शहरांची वाढ रोकण्यासाठी विकेंद्रीकरणाच्या व नवी शहरे दूरवर बसवण्याच्या गरजेच्या विषयावर कांही शहर प्लनिंगच्या जाणकार व अनुभवी तज्ञानी लिहून कांहीहि उपयोग झाला नाही,कारण राजकारणी लोक व त्यांच्याशी संधान बांधून असलेली बिल्डर लोबी यांना पुणे शहरच अमर्यादित वाढवायचे आहे जेणेकरून येथिल आकाशाला भिडणा-या किंमती आणखी वाढू शकतील!

पुण्याच्या वाहतुकीचे तीनतेरा केव्हाच झालेले आहेत हे आपण रोजच दिवसरात्र अनुभवतच आहोत! मग त्यात विद्यार्थी पण अडकणारच!
आता या परिस्थितीतून मार्ग काढायला शिस्तीचा पूर्णपणे अभाव असणा-या पुण्यात फ़क्त हेलिकोप्टर सेवा [पण दुर्दैवाने न परवडणारी!]सुरू केली तरच मार्ग काढता येइल!

परवाच मुख्यमंत्र्यांच्या पुणे भेटीत त्यांच्या ताफ़्यात लाल दिव्याच्या असंख्य गाड्या बाकी सर्व वाहतुक तिष्ठत ठेवून धावत गेल्या!
त्यानंतर थांबलेली कित्येक असहाय वाहने मुंगीच्या गतीने कशीबशी प्रयाण झाली! आता या लाल दिव्याच्या गाड्यातल्या महाभागांना व पोलिसांना नेहेमीच्या वाहतुकीशी काय देणेघेणे आहे?

राष्ट्रकुल स्पर्धा जवळ आल्यामुळे थोडेफ़ार पोलिस रस्त्यावर दिसू लागले आहेत,ते त्यानंतर पुण्याची वाहतुक "जैसे थे" लवकरच होउ देतील!

राज्यकर्त्यांना,महानगरपालिकेच्या अधिका-यांना पुण्याचा विकास आणखी वेगवान करायचा आहे कारण त्यातच त्यांना आपली पोळी भाजून घेता येते!

जितकी जास्ती लोकसंख्या तेवढीच कांही वर्षाने जास्ती मते हे ओळखून पक्ष व पुढारी कुटुंबनियोजन व शहरांचे विकेंद्रीकरण या विषयांकडे ढुंकून बघायला तयार नाहित!

"सकाळ" आपल्या परीने प्रयत्न करून निरनिराळ्या स्तरांवर/पातळीवर प्रश्नांचे निराकरण यासाठी जनतेकडून पण उत्तरे मागवितो! पण आलेल्या अनुभवावरून "उदासीनता" मान्य करतो!

संपादक श्री.यमाजी मालकर आपले उदात्त विचार "जागर"च्या माध्यमातून लोकांसमोर मांडतात,पण परिस्थिती कांही कधीच सुधारण्याऐवजी आणखी चिघळतच जाते!!!

कुठे जातात हे कोपराकोपरावरच्या फ़लकांवर झलकणारे पुण्याचे सत्ताधारी खासदार,पालकमंत्री व आमदार अशा वेळी???

कांही बाबतीत यांचे योगदान मान्य केले तरी सर्व छोट्यामोठ्या गोष्टीत श्रेय लाटायला हे कायम उत्सुक व कांहीहि वाईट गोष्टी जनतेच्या नजरेपुढे आल्या किंवा आणल्या गेल्या की हे पडद्याआड!
यांच्याच विकासाच्या व्याख्येमुळे लागली नाहि कां पुण्याची वाट???

पुण्याच्या सीमा आत्ता आहेत तेथेच गोठविल्या पाहिजेत,उद्योगांना आणखी कारखाने काढायला मनाई केली पाहिजे,३३ मजले उंचीच्या इमारती उभारायची परवानगी कायमची रद्द केली पाहिजे,कुटुंबनियोजन कठोरपणे व सक्तीने राबविले पाहिजे व वाहतुक शिस्तभंग करण्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने काढलेल्या उदगारांप्रमाणे हंटर चालविले पाहिजेत तरच या तरूण शालेय विद्यार्थ्यांचे भवितव्य थोडेफ़ार वाचविता येइल!!!

milind said...

unless we strengthen local public transport (pmt) dependency on own transport will not be reduced. in absence of good public transport people are putting their life in denger for buying own transport and travelling in pune. for sake of improvement govt allowing new construction / business in pune without putting any effort to improve infrasture like road, water , electricity. all new business came to pune like BPO, their chiefs never leave in pune , they only think of profit, when situation will go out of hand they simply change place of business.
also whenever any minister visit pune ask them to make own arrangement for travel without traffic police support then only solution can find. now a days corporater / ministers are become a king and these type of problem never affect them.