Tuesday, June 17, 2008

यापुढे आंदोलकांवर प्लास्टिक गोळ्यांचा मारा

आंदोलन आणि निदर्शनांच्या वेळी आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी यापुढे पोलिसांकडून प्लास्टिक गोळ्यांचा वापर करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी मंत्रालयात पोलिस शस्त्र धोरणासंदर्भात आयोजित बैठकीत घेतला.

राज्याचे पोलिस महासंचालक अनामी रॉय आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पोलिस दलासाठी विविध शस्त्रांबाबत विचारविनिमय झाला. आंदोलकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्याचा वापर करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

पोलिस दलातून यापुढे 0.303 रायफल व 0.410 मस्केट शस्त्रास्त्र टप्प्याटप्प्याने कमी करण्याचे या वेळी ठरले.आजच्या बैठकीत पोलिस दलासाठी विविध शस्त्रास्त्रांची उपलब्धता, नव्या शस्त्रविषयक धोरणांची वैशिष्ट्ये, शस्त्रास्त्रे मिळविण्यातील अडीअडचणी इत्यादी विषयांवरही चर्चा होऊन नवी शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठी 44 कोटी रुपये व दारूगोळा खरेदीसाठी 14 कोटी रुपये खर्चास तत्त्वतः मान्यता देण्यात आली.

कोणालाही इजा न पोहोचता आंदोलकांवर नियंत्रण आणण्यासाठी प्लास्टिकच्या गोळ्यांचा वापर करण्याचा निर्णय योग्य असला, तरी एकदा का आंदोलकांना कळले की, पोलिसांचा गोळीबार हा प्लास्टिकचा आहे, तर ते पोलिसांना जुमानण्याची शक्‍यता कमीच आहे. अशा परिस्थितीत आंदोलनावर नियंत्रण येण्याऐवजी ते अधिकच चिघळण्याची शक्‍यता आहे.

No comments: