Monday, June 02, 2008

शालेय ज्ञान अन्‌ शाहरुख खान

"सबसे बडा अंडा देनेवाले पंछी का नाम क्‍या है?' "शतुर्मुग!' ""बिलकुल सही, आपको मिलता है एक लाख का इनाम!'' (टाळ्या). "देश के सबसे पश्‍चिमी राज्य की राजधानी का नाम?' अहमदाबाद। ""इस जबाब के लिये आपको मिलता हे पॉंच लाख का इनाम!'' (प्रचंड टाळ्या)....

दूरचित्रवाणीवरील "क्‍या आप पॉंचवी पास से तेज है?' या कार्यक्रमाची ही एक छोटीशी झलक. हिंदी चित्रपट अभिनेता शाहरुख खानचा हा कार्यक्रम देशातली "ज्ञानी' माणसं हुडकून त्यांना कोट्यवधी रुपये वाटणार आहे. त्यातलं सगळ्यांत मोठ्ठं- दोन कोटी रुपयांचं बक्षीस जेव्हा कुणाला मिळेल तेव्हा ते मिळवणाऱ्याच्या मुलाखती, तिच्या माध्यमातून "बुद्धिवर्धक' तेल - साबण - वेफर्सच्या जाहिराती यानं माध्यमं गजबजून जातील, ज्ञानी माणूस "सेलिब्रिटी' होईल.

थोडक्‍यात, एकविसाव्या शतकाच्या सुरवातीलाच ज्ञानाधारित समाजाची निर्मिती पूर्ण होईल. (एकविसाव्या शतकाला ज्ञानाधारित का म्हणायचं? याआधीची शतकं अज्ञानाधारित होती का? पण हा प्रश्‍न तूर्तास बाजूला.) प्रश्‍न असा आहे, की एक समाज म्हणून आपण ज्ञान, ज्ञानी, ज्ञानार्जन कुणाला, कशाला म्हणतो?शालेय ज्ञानालाच महत्त्वआधुनिक जगात औपचारिक शिक्षणाला ज्ञान मिळवण्याचं सगळ्यात प्रभावी माध्यम मानलं जातं.

औद्योगिक क्रांतीच्या जोरावरचा युरोपियन वसाहतवाद जगभर फोफावल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बनलेलं ज्ञान म्हणजे शाळा-महाविद्यालयं, विद्यापीठांतून "मिळणारं' ज्ञान. एका समाजगटाचं दुसऱ्या समाजगटावरचं सांस्कृतिक वर्चस्व हा शालेय ज्ञानाचा मुख्य आधार आहे.

फक्त पुस्तकात असणाऱ्या, समाजातल्या छोट्या पण प्रबळ गटानं सांगितलेल्या ज्ञानालाच ज्ञान म्हणण्याचा आपल्या देशातला सगळ्यांत मोठा तोटा म्हणजे ग्रामीण- दलित- आदिवासी मुलामुलींची शाळाशाळांमधून होणारी पडझड. अगदी लहान वयापासून परिसरात नसलेली भाषा, परिसरात नसलेली माणसं- घरं- पशु-पक्षी, प्राणी, झाडं, खाणं, पिणं पुस्तकांच्या माध्यमांतून चित्रं दाखवत शिकणं मुलांवर अन्याय तर करतंच; पण शिक्षणातला त्यांचा रस सुरू होण्याआधीच संपवतं. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 म्हणतो तसं केवळ शहरी, श्रीमंत, उच्चजातीय घरांमधले, परिसरातले अनुभव शाळांमधून वैध ज्ञान म्हणून येतात, तेव्हा आपण देशातल्या कोट्यवधी मुलांचं जगणंच नाकारतो. मुलं शाळांमधून गळत नसतात, शाळांकडून नाकारली जातात.

शाहरुखच्या कार्यक्रमात दिसणारं ज्ञानाचं स्वरूप हे सत्ताधारी, बाजारपेठेनं प्रभावित झालेला, इंग्रजी जाणणारा नवश्रीमंत मध्यमवर्ग, ज्याला ज्ञान म्हणतो त्या प्रकारचं आहे. सामाजिक वस्तुस्थितीशी, जीवनानुभवाशी त्याचा संबंध नाही. या ज्ञानाला वैधता असण्याचं कारण म्हणजे त्यात पैसा, प्रसिद्धी अन्‌ व्यक्तिकेंद्रित प्रगती साधणारं "मार्केट' आहे. "राष्ट्रीय प्रज्ञा शोध'सारख्या प्रतिष्ठित परीक्षादेखील अशाच कार्यक्रमाचं अवघड स्वरूप आहेत. जोवर अशा कार्यक्रमांमधून ज्ञानी, प्रज्ञावान माणसं शोधण्याचा उद्योग उच्चवर्गीय आश्रयानं सुरू राहील, जोवर शाहरुखच्या अभिनयाला- नाट्याला, "ज्ञानी माणसं शोधण्याची मोहीम' मानलं जाईल तोवर शैक्षणिक गुणवत्तेचं सार्वत्रिकीकरण एक स्वप्नच राहील.

आपल्याला काय वाटते याविषयी? ज्ञानाचं स्वरूप सत्ताधारी बाजारपेठेने प्रभावित झालेलं असावं, की त्याहीपलिकडे असावं?

2 comments:

ASHISH BADWE said...

मिस वैशाली पाचवी पास हा ज्ञानरंजना सोबत मनोरंजनाची जोड देणारा कार्यक्रम आहे. ज्ञानाचं स्वरूप मात्र व्यावसायीक जोड देणारं नसावं ज्ञानाचं स्वरूप सत्ताधारी बाजारपेठेने प्रभावित झालेलंही नसावं ते त्याही पलिकडे समतोल असावं सर्वांना समान संधी यावर आधारीत असावं - आशिष बडवे
www.dainikyavatmalnews.com
www.vidarbhanews.blogspot.com
09403455960

Anonymous said...

Ms.Vaishali has not clarified her ideas about 'merit'and its 'spread among masses(sarvatrikikaran)'.Documents like NCF 2005 can provide only guidelines (howsoever noble they might be) but the real challenge lies in implementation since India has immense population as well as diversity in its background.It would not be correct to drag NTS exam in the same category as 'Panchavi pass..'There cannot be a educational panacea for all.Government of India is trying its best through different ways like Navodaya Vidyalayas to reduce the disparity among the urban and the rural students.