Friday, May 30, 2008

आदर्श उपक्रम

पाथर्डी - कोळसांगवी (ता. पाथर्डी) गावाने स्त्री जन्माचे स्वागत कृतीतून करून आगळावेगळा उपक्रम राबविण्याचा निर्धार केला आहे. "कन्या शुभजन्म दिन' योजना आखली असून, गावातील बहुतेक महिलांची मानसिकता नव्या उपक्रमाला अनुकूल आहे. "स्त्रीजन्माचे स्वागत' या चळवळीच्या कार्यकर्त्या डॉ. सुधा कांकरिया यांच्या साक्षीने योजनेची पहिली लाभधारक "साक्षी'वर नोटा बरसल्या.

सरकारच्या शुभमंगल योजनेतून प्रेरणा घेऊन येथील महिलांनी स्वतःच्या कल्पनेतून आगळीवेगळी योजना सुरू केली. गावातील महिलांची बैठक झाली. तीत सुलभा घुले, सुरेखा घुले, सविता गाडे, नंदा घुले, वर्षा बडे, प्रतिभा घुले, विद्या खोजे आदींनी योजनेचे स्वरूप गावातील महिलांना सांगितले.

या ग्रामसभेस गावातील पुरुषही उपस्थित होते. "कन्या शुभ जन्मदिन' योजनेत सुमारे शंभर महिलांनी सदस्यत्व स्वीकारले आहे. गावात मुलगी जन्मली, की मंडळाच्या सदस्यांनी प्रत्येकी शंभर रुपये द्यावेत, असे बैठकीत ठरले. योजनेची पहिली लाभधारक कन्या म्हणून साक्षी संदीप पेटारेचा तिच्या आईसह सत्कार करण्यात आला.

या आनंदोत्सवात डॉ. कांकरिया यांनीही पाचशे रुपये देऊन योजनेचा प्रारंभ केला. गावात कन्या जन्मली, की दोनशे रुपये मी स्वतः देणार, असे घोषित केले. या निर्णयाचे गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या संदेशाचा फलक त्यांनी महिला मंडळाला दिला. विठ्ठल घुले महाराज यांच्या आशीर्वादाने हा उपक्रम आकारला येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

गावाची शिदोरी
गावात ज्या दिवशी कन्या जन्म घेईल, तो दिवस शुभ मानायचा, म्हणजे "कन्या जन्मदिन' हा शुभदिन मानून आनंदोत्सव साजरा करायचा. मातेची भेट घेऊन तिचे कौतुक करायचे. गावातील महिलांकडून प्रत्येकी शंभर रुपये मुलीच्या नावे गोळा केले जातात. दहा हजार रुपये गोळा झाले, की नवजात मुलीच्या नावे पैसे बॅंकेत ठेवायचे. १८ वर्षांनंतर मुलीच्या लग्नाच्या वेळी व्याजासह होणारी रक्कम मुलीला "गावाची शिदोरी' म्हणून देण्यात येईल.

या उपक्रमाचे अभिनंदन तर करायलाच हवे, शिवाय प्रत्येक गावात अनुकरणही.

2 comments:

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

किती सुंदर योजना आहे ही! इतर गावांनी अनुकरण करावे अशी. महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिक संघटनांचे जाळे आहे. प्रत्येक संघटनेने एकेक गाव दत्तक घेतले व कन्या-जन्म-देणगी देण्याचा प्रघात पाडला तर बरे होईल. FESCOM या शिखर संघटनेचे ऑफिस पुण्यात आहे. त्यांचेकडे ही बातमी व माझी सूचना पाठवा.

Akshay kashid said...

it really nice