Wednesday, January 02, 2008

वेध आरोग्य संवादाच्या प्रवासाचा

एकविसाव्या शतकात पाऊल ठेवून आपल्याला आता सात वर्षे झाली आहेत, तरी आपल्या देशात अजूनही न्यूमोनिया, जुलाब यांसारख्या रोगांनी मृत्युमुखी पडणाऱ्या बाळांची संख्या अतोनात आहे. कुपोषणाच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. शंभरातल्या साठ स्त्रियांना ऍनिमिया आहे. म्हणजे रक्त कमी आहे. एक कोटी लोक क्षयाने पछाडलेले आहेत. त्यातले पाच लाख दर वर्षी (औषधे उपलब्ध असूनही) मरण पावत आहेत. मलेरियाने पुन्हा उचल खाल्ली आहे. लहान वयात मुलींची लग्ने होतच आहेत. व्यसने आणि अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गर्भाचे लिंग तपासून मुलींचे गर्भ काढून टाकण्याचे दुष्कर्म आमचेच काही व्यवसायबंधू करीत आहेत. चार लाख गावांना पिण्याचे पाणीच नाही. ८६ कोटी लोकांना संडासाची सोय नाही. दर दोन हजार लोकांमागे एक डॉक्‍टर आहे; पण ही झाली सरासरी. डॉक्‍टरांची सारी गर्दी शहरात आहे. दुर्गम भागात अगदी प्राथमिक उपचारदेखील उपलब्ध नाहीत, अशी परिस्थिती आहे. यातच आता एचआयव्ही- एड्‌सने आपले बस्तान चांगलेच जमवले आहे. या सर्व प्रश्‍नांच्या मुळाशी दारिद्य्र, महागाई, बेरोजगारी, दुष्काळ, विस्थापन, पर्यावरणाचा नाश, विकासाची भरकटलेली दिशा आदी सगळे आहेच. हे ध्यानात ठेवून आरोग्याचा विचार व्हायला हवा, आरोग्याचा संवाद व्हायला हवा, असे काही लोकांना वाटले आणि हा आरोग्य संवादाचा प्रवास सुरू झाला.

आपल्यात आरोग्याचा संवाद मुळीच होत नाही, असे मात्र नाही. आपण सगळेच आरोग्याच्या प्रश्‍नावर नेहमीच आणि बरेच काही बोलत असतो. घरातले कुणाचे तरी आजारपण, औषधांचा खर्च, हॉस्पिटलचे अनुभव, कर्जबाजारीपण, घरगुती उपाय आदी विषय तर नेहमीचेच. या संवादामध्ये अनेकदा असहायताच जास्त असते. "नशिबाचे भोग' म्हणून आपण हे सगळे मनोमन मान्यही करत असतो. या विषयांखेरीज रेशनचे धान्य, महागाई, दारू, पिण्याचे पाणी, हवामान, पाऊसपाणी, शेतीचे उत्पन्न, सणवार, स्वयंपाकपाणी, परिसर स्वच्छता यांबद्दलही खूप संवाद होत असतो; पण इथेदेखील आपल्याला बरीच असहायताच वाटत राहते. शेवटी या साऱ्या घटकांचा आरोग्यावर जो इष्ट किंवा अनिष्ट परिणाम होत असतो, तो पुन्हा वैयक्तिक पातळीवर होतो; किंवा तसे निदान आपल्याला वाटत राहते. म्हणून यावरचे अनेक उपाय वैयक्तिक पातळीवरच केले जातात. वैयक्तिक स्वच्छता, व्यायाम, योगासने, आहार, दिनक्रम आदींवर भर दिला जातो. हे सगळे चांगलेच आहे; पण या पलीकडे जी व्यापक परिस्थिती आहे, तिच्याकडे आपले दुर्लक्ष होते.

म्हणून अनेक लोकांनी एकत्र येऊन समग्र आरोग्याचा विचार करायला हवा, माहिती घ्यायला हवी, ज्यांच्याकडे ही माहिती आहे त्यांनी ती लोकांना द्यावी, या माहितीचा उपयोग करून सजगपणे लोकांनी निर्णय घ्यावेत आणि ते वस्तीपातळीवर, गावपातळीवर आणि शहरपातळीवरही अमलात आणावेत, असहायतेची जागा सशक्त संवादाने घ्यावी, असे आम्हाला वाटते. गेल्या दीड-एक दशकामध्ये ग्रामीण, आदिवासी, शहरी वस्त्यांमध्ये काम करणाऱ्या विविध संस्था-संघटनांचा याबाबतीतला अनुभव अतिशय उत्साहवर्धक आहे. एक काळ असा होता, की गरीब लोकांसाठी मोफत वैद्यकीय शिबिरे भरवणे, औषधवाटप करणे यालाच आरोग्याचे काम म्हणत असत. अशा कामाला दानधर्माची प्रतिष्ठा होती. अजूनही अशी शिबिरे अनेक ठिकाणी आयोजित केली जातात; पण त्यातून सर्वसामान्यांची निर्णयशक्ती वाढत नाही. उलट त्यांचे अवलंबित्व वाढते.

आरोग्य संवाद ही संकल्पना तुलनेने नवी आहे; पण त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यातूनच ही संकल्पना जनमानसात रुजेल, आणि रोगराई कायमची हद्दपार होऊन भारतीय जीवनाचा प्रवास आरोग्यदायी ठरेल. नववर्षाच्या निमित्ताने सर्वांनीच हा संकल्प करावा...

No comments: