Friday, December 21, 2007

भारनियमनाची अडचण रहाटगाडग्यामुळे दूर

गावात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी पूर्वी सार्वजनिक विहीर खोदून त्याकडेला दगडी बांधकाम केले जाई. जुन्या वाड्यात असे जुने रहाटगाडगेखूप दिसत. आता मात्र गावोगावी नळ पाणीपुरवठा योजना झाल्याने रहाटगाडे ही संकल्पना कालबाह्य झाली आहे.

त्यातूनही पूर्वीच्या परंपरांची माहिती पुढील पिढीसाठी टिकून राहावी, याकरिता व भारनियमनास उत्तर म्हणून येथील वास्तुविशारद अशोक गोडबोले यांनी आधुनिक रहाटगाडगे तयार केले आहे. श्री. गोडबोले सातारा शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असून, शहरातील सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो. येथील विवेकशास्री गोडबोले यांच्या वैदिक पाठशाळेत एक जुनी मोठी विहीर आहे. या विहिरीचे पाणी विद्युतयंत्रणेद्वारे इतर पाणी साठवणीच्या टाक्‍यात वितरित केले जाते. मात्र, भारनियमनाच्या वाढत्या वेळापत्रकामुळे पाणी साठविण्यास अडचणी येत होत्या. यावर विवेकशास्त्री गोडबोले यांनी वास्तुविशारद अशोक गोडबोले यांच्याशी याबाबत चर्चा केली. चर्चेतून पूर्वी विहिरीवर असणाऱ्या रहाटगाडग्याची संकल्पना पुढे आली. पूर्वीचे रहाटगाडगे लाकडाचे असायचे, त्यामुळे ते पाणी उपसा करताना जड वाटायचे. याचा विचार करून श्री. गोडबोले यांनी रहाटेचे चक्र सुलभतेने फिरवता यावे, यासाठी बेअरिंग बसविले. त्यामुळे एका मोठ्या चक्राद्वारे पाण्याचा उपसा करण्यात यश मिळाले आहे. या चक्रास हा मोठे कॅन बसविण्यात आले आहेत.

रहाटगाडग्यातून उपसलेले पाणी तेथील मोठ्या टाकीत भरले जाते. भारनियमनाची अडचण रहाटगाडग्यामुळे दूर झाली आहे.

No comments: