Wednesday, December 19, 2007

ब्रिटनमधील लठ्ठपणा...

'फास्ट फूड' आणि व्यायामाचा अभाव यामुळे युरोपीय आणि अमेरिकी लोकांत लठ्ठपणा वाढत आहे... पूर्वेकडील देशांत पिझ्झा-बर्गर यांचे "फॅड' युरोपाप्रमाणे नसल्याने त्यांच्यात लठ्ठपणा कमी आहे... लोकांना सांगून कळत नसेल, तर त्यांचे त्यांना काहीही करू द्या... या आहेत ब्रिटनमधील लोकांच्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया.

अमेरिकेपाठोपाठ ब्रिटनमधील महिलांमध्येही लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. वाढत्या लठ्ठपणाबाबत काही दिवसांपासून ब्रिटनमधील प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. अनेक ब्लॉगवरही ही चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील लेखक टॅड सॅफ्रन ब्रिटनच्या दौऱ्यावर आले होते. दौऱ्यावर असताना आणि तेथून परत गेल्यानंतरही त्यांनी काही लेखांमध्ये ब्रिटनच्या महिलांमधील लठ्ठपणावर कोरडे ओढले होते. या लिखाणावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी स्वागत केले, तर काहींनी लेखकाच्या हेतूबद्दल शंका उपस्थित केल्या.

"ब्रिटिश महिलांचा कल स्वतःच्या पायावर उभे राहण्याकडे आहे, आपल्या दिसण्याकडे त्या फारश्‍या लक्ष देत नाहीत किंवा दिसण्याबाबत इतर कोणाशी स्पर्धाही करत नाहीत. परंतु, त्यांचे आपल्या शरीराकडे होणारे दुर्लक्ष ही बाब क्षम्य नाही,' "द टेलिग्राफ' या लंडनमधील वर्तमानपत्राच्या ब्लॉगवरील हा मजकूर तेथील सर्वसामान्य लोकांची प्रतिक्रिया सांगणारा आहे. अमेरिकेतील महिला आणि युरोपातील महिला, विशेषतः ब्रिटनमधील महिला यांचे विचार, राहणीमान, संवादकौशल्य आदी गोष्टींची तुलना ब्लॉगवर करण्यात आली आहे. युरोप आणि अमेरिकेतील लठ्ठपणा वाढण्याची कारणे कोणती याचे विश्‍लेषण करण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. बदललेली जीवनशैली आणि "फास्ट फूड'चा मनमानेल तसा वापर यामुळे लठ्ठपणा वाढत असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. महिलांमधील लठ्ठपणा हा विषय इतका संवेदनशील झाला आहे, की हा ब्लॉग इंटरनेटवर टाकण्यात आल्यानंतर दिवसभरात पन्नासहून अधिक जणांनी प्रतिक्रिया नोंदविल्या. बहुतेकांनी टॅड सॅफ्रन यांच्यावरच तोंडसुख घेतले. काहीही असले तरी या विषयाबद्दल काही जणांनी विचार करायला सुरवात केली आहे, हेही नसे थोडके.
- सुरेंद्र पाटसकर

"फास्ट फूड'चे लोण भारतातही झपाट्याने पसरत आहे. त्याचे दृश्‍य परिणाम लहान मुलांवर मोठ्या प्रमाणावर दिसत असले, तरी महिलाही यांत मागे नाही. एकीकडे कुपोषण आणि दुसरीकडे अतिरिक्त लठ्ठपणा, यामध्ये आता समतोल साधण्याची वेळ आली आहे. तुमचे निरीक्षण नोंदवा...

प्रतिक्रिया वाचण्यासाठी इथे क्‍लिक करा

1 comment:

Jyotsna said...

the glamour and standard for high cholestrol junk food which is offered by our so called high standard society is dangerous for upcoming generation.Its bad effect will reflect further generations in kind of diabetes,high bp, artharitis,infertility and many unrevealed diseases.
Better to get alert in time.
jyotsna tilak