Saturday, December 22, 2007

मृताच्या उत्पन्नाचा विम्यात सर्वांगीण विचार व्हावा

"अपघातातील मृताचे कुटुंबीय त्याच्या हयातीत केवळ त्याच्या मासिक पगारावर अवलंबून नसतात; तर त्याला मिळणारे वार्षिक फायदे, मुलांच्या शिक्षणासाठी मिळणारे फायदे असे अन्य लाभही कुटुंबाला आवश्‍यक असतात. त्याच्या मृत्यूमुळे या सर्व लाभांना त्याच्या कुटुंबीयांना मुकावे लागते. त्यामुळे अपघातातील मृताच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईची रक्कम ठरविताना संबंधित व्यक्तीचे केवळ वेतनच नव्हे, तर त्या व्यतिरिक्त मिळणारे फायदेही जमेस धरावेत, असा महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.

हा निकाल देताना केंद्रीय मोटार वाहन कर कायद्याच्या 168व्या कलमात दिलेल्या "न्याय्य भरपाई' या संज्ञेचा अन्वयार्थ न्यायालयाने लावला आहे. व्यक्तीच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबाचे होणारे नुकसान पैशांच्या रूपातच भरून द्यायला हवे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायालयाने निकालात म्हटले आहे, ""खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन योजनेचा लाभ मिळत नाही. अशा वेळी त्याचा भविष्यनिर्वाह निधी, ग्रॅच्युइटी, इतर लाभ यांवरच कुटुंबाचा भविष्यकालीन डोलारा अवलंबून असतो. ज्या लाभांशी संपूर्ण कुटुंबाचे हित निगडित असते, त्यांचा विचार भरपाईची रक्कम ठरविताना करायलाच हवा. यालाच "न्याय्य भरपाई' म्हणता येईल. अशा संज्ञांचा तर्कसंगत अर्थ लावायला हवा.''

आतापर्यंत मृताच्या निव्वळ वेतनाच्या प्रमाणातच कुटुंबीयांना भरपाई मिळत होती. नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या अपिलाविरोधात दिलेल्या या निकालामुळे अपघातांत मृत्युमुखी पडलेल्या लाखो व्यक्तींच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे देशातील असंख्य नागरिक न्यायालयाना धन्यवाद देतील....!

No comments: