Friday, December 14, 2007

सिप्रोफ्लोक्‍सासिन'वर बंदी नाही

भारत हे बंदी घातलेल्या औषधांचे गोदाम या वृत्तावर डॉ. विश्‍वास राणे यांनी आपली प्रतिक्रया नोंदविली आहे. बातमी योग्य असली, तरी गैरसमज पसरविणारी आहे, असे त्यांचे मत आहे.

डॉ. राणे म्हणाले, "कोणत्याही देशात सिप्रोफ्लोक्‍सासिनवर बंदी घातलेली नाही, भारतात तर नाहीच नाही. "सिप्रोफ्लोक्‍सासिन' हे "फोर-क्विनोलोन' गटातील एक प्रतिजैविक (अँटिबायोटिक) आहे व त्याचा उपयोग अनेक प्रकारच्या जंतुबाधेवर केला जातो. अगदी टायफॉईड म्हणजे विषमज्वरासाठीही ते वापरले जाते. प्रत्येक औषधाला मर्यादा असतात व त्या डॉक्‍टरला माहीत असावयास हव्यात व त्याप्रमाणेच डॉक्‍टरने त्या औषधाचा वापर करावयास हवा. सिप्रोफ्लोक्‍सासिन'चा वापर वाढत्या वयातील मुलांसाठी करावयाचा नाही, असे उत्पादक कंपन्या सांगत असतानाही डॉक्‍टर त्याचा वापर मुलांमध्ये करणार असतील, तर त्या डॉक्‍टरला उत्तर प्रदेशातील डॉ. मेहरोत्राप्रमाणे शिक्षा होणार, व्हावयास हवी व ते योग्यच आहे.''

"सिप्रोफ्लोक्‍सासीन' (तसेच "गॅटिफ्लोक्‍सासिन', "जेमिफ्लोक्‍सासीन', "स्पारफ्लोक्‍सासीन', "नॉरफ्लोक्‍सासीन', "पेफ्लोक्‍सासीन', "लोमेफ्लोक्‍सासीन', "मॉक्‍सिफ्लोक्‍सासीन', "नॅलिडिक्‍सिक ऍसिड', "ओफ्लोक्‍सासीन', "लेव्होफ्लोक्‍सा सीन' ही "फोर-क्विनोलीन' गटातील औषधे) भारतात उपलब्ध आहेत, त्यांच्यावर बंदी घातलेली नाही. उलट भारतीय औषध उत्पादक सिप्रोफ्लोक्‍सासीन या "जेनेरिक' (मूळ नावाने) औषधाचे फार मोठ्या प्रमाणावर प्रगत देशांना निर्यात करीत आहेत. "ब्रिटिश नॅशनल फॉर्म्युलरी'ने "सिप्रोफ्लोक्‍सासीन' वापराबद्दल दिलेली धोक्‍याची सूचना अशी आहे.

""ज्या रुग्णांना "एपिलेप्सी' आहे किंवा आधी झाली असेल, अशा रुग्णांत "फोर-क्विनोलीन' गटातील औषधे सावधतेने वापरावीत. यकृत (लिव्हर) किंवा मूत्रपिंड (किडनी) कार्य बिघडलेल्या रुग्णांत, गरोदर असलेल्या किंवा स्तनपान करणाऱ्या स्त्रियांत, लहान व वाढत्या वयातील मुलांत "सिप्रोफ्लोक्‍सासीन'चा वापर करू नये. ज्या सांध्यांवर वजन तोलले जाते (उदाहरणार्थ गुडघे) अशा मुलांतील वाढत्या सांध्यावर कायमचे दुष्परिणाम होऊन आर्थ्रोपथी निर्माण होते.

'' सिप्रोफ्लोक्‍सासीनवर बंदी नको; पण सिप्रोफ्लोक्‍सासीनबरोबरील इतर औषधांच्या हगवणीसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधमिश्रणांवर व विशेषतः मुलांना द्यावयाच्या "सायरप'वर बंदी आणावयास हवी. सिप्रोफ्लोक्‍सासीन वा फोर क्विनोलीन औषधांबरोबरील इतर औषधांच्या, तसेच जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यू.एच.ओ.) स्वीकारलेल्या १२ औषध मिश्रणांखेरीज इतर सर्वच औषध मिश्रणांवर बंदी आणावयास हवी.

No comments: