Wednesday, December 12, 2007

गुडगावच्या शाळेत विद्यार्थ्यांचा गोळीबार

शाळेत विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या हिंसाचाराची लागण भारतातही होत असल्याचे आज येथे निदर्शनास आले. आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांत झालेल्या भांडणाचे पर्यवसान आज गोळीबारात झाल्याने येथील डीएलएफ परिसरात असलेल्या "युरो इंटरनॅशनल स्कूल' या शाळेत एका विद्यार्थ्याचा बळी गेला. याप्रकरणी आकाश आणि विकास यादव या दोघा विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या शाळेत आठवीच्या वर्गात शिकत असलेल्या अभिषेक त्यागी याच्याशी आकाश आणि विकास यादव या दोघांचे भांडण झाले होते. त्यामुळे या दोघांनीही अभिषेकला मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तो शनिवारी शाळेत आला नाही. सोमवारी तो नेहमीप्रमाणे शाळेत आला. शाळा सुटल्यानंतर तो घरी निघाला होता. त्या सुमारास आकाश आणि विकास यांनी त्याला व्हरांड्यात गाठले आणि त्याच्यावर गोळ्या झाडल्या. आकाशने त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या व नंतर रिव्हॉल्वर विकासकडे दिली. त्यानेही अभिषेकवर एक गोळी झाडली. त्यापैकी एक गोळी त्याच्या कपाळात घुसली तर, दोन गोळ्यांनी छातीचा वेध घेतला. अगदी जवळून हा गोळीबार झाल्याने अभिषेकचा जागीच मृत्यू झाला. त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी जाहीर केले.

आकाशने बांधकाम व्यावसायिक असलेल्या त्याच्या वडिलांचे रिव्हॉल्वर लपवून शाळेत आणले होते. अतिरंजीत, ऍक्‍शन चित्रपट पाहून शालेय मुलांमध्ये हिंसाचाराचे प्रमाण वाढत आहे. पालकांनीही रिव्हॉल्वर, चाकू, सुरी अशा वस्तू मुलांपासून दूर ठेवल्या पाहिजे. कारण शालेय वयातच मुलांना या वस्तूंचे आकर्षण असते. हा हिंसाचार रोखण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे.

No comments: