Sunday, December 09, 2007

सरकारची हॅक झालेली वेबसाइट "जैसे थे'"

हायटेक' असल्याचा दावा करणाऱ्या महाराष्ट्र सरकारची अधिकृत वेबसाईट हॅक होऊन साडेतीन महिने झाले, तरी अद्याप ही वेबसाईट पूर्णतः पूर्ववत झाली नसून हॅकरचा तपास लावण्यातही पोलिस यंत्रणेला यश मिळालेले नाही.

वेबसाईट हॅक झाल्यावर अवघ्या 48 तासांत ती पुन्हा सुरू केल्याचा दावा सरकारने केला होता; मात्र आजही ही वेबसाईट "अपडेट' करताना अडचणी येत आहेत.महाराष्ट्र सरकारमधील सर्व खाती, विभाग, प्रकल्प व योजनांशी संबंधित इत्थंभूत माहिती असणारी सरकारची अधिकृत वेबसाईट 17 सप्टेंबरला हॅकर्सनी हॅक केली होती. हॅकर्सनी यातील कोणत्याही माहितीला धोका न पोहोचवता केवळ वेबसाइटचे मुख्य पान हॅक केले होते. सरकारने ही वेबसाईट काही तासांत पुन्हा नव्याने सुरू केली असली, तरी आजही साइट आजारी अवस्थेतच आहे.

ही वेबसाईट "हॅकर्स कूल अँड अलजेरा' या हॅकर्सनी हॅक केल्याचे सांगण्यात येत होते. याप्रकरणी सरकारच्या वतीने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेअंतर्गत असलेल्या सायबर क्राईम सेलने अज्ञात हॅकर्सविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या सेलने वेबसाईटचे मुख्य सर्व्हर तपासासाठी हैदराबाद येथील फोरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठविले होते. तेथून ते परत आले, पण अजूनही ते माहिती-तंत्रज्ञान संचालनालयाकडे परत दिलेले नाही.

हॅक करणाऱ्याचा आय. पी. कोड अमेरिकेतून मिळाल्याचे आढळून आले. इंटरनॅशनल सर्व्हिस प्रोव्हायडरकडे हा कोड कोणाला दिला होता का, याचा शोध सुरू आहे; मात्र अद्याप एकूण तपासात काहीही ठोस माहिती हाती लागलेली नाही.

No comments: