Friday, December 07, 2007

अमिताभ बच्चनना अनाहूत सल्ला


माननीय बच्चनसाहेब,

आपले निस्सीम मराठी चाहते आहेत. नुकतीच एक बातमी वाचनात आली, की आपल्या चिरंजीवांच्या विवाहप्रसंगी आपण विविध गोष्टींवर किती खर्च केला याचा तपशील विचारण्यात आला आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाचा अवमान झाल्याची आणि सेवाकराच्या नावाखाली नागरिकांचा छळ होत असल्याची तक्रार जयावहिनींनी थेट राज्यसभेत केली आहे.


बच्चनजी, आपल्या घरचे हे कार्य मोठ्या प्रमाणात गाजले. ज्यांना निमंत्रणही नव्हते, अशा अनेकांना घरचे कार्य असल्यासारखा उत्साह वाटत होता. आत गोंधळ नको आणि चर्चेला कारण नको म्हणून आपण प्रसारमाध्यमांनाही बंदी घातली होतीत. परिणामी आत नक्की काय झाले ते गुपितच राहिले.


"विजय'जी आपल्या माहितीसाठी सांगतो, की विवाह समारंभात दिल्या जाणाऱ्या अनेक सेवा करपात्र झाल्या आहेत. समारंभाची जागा (मंडप) अन्न सेवा, मांडव घालणे, सभागृहाची सजावट, रोषणाई, समारंभ संयोजन यासाठी भाड्याने घेतलेल्या गाड्या, वधू-वरांसाठीचे "हनिमून पॅकेज' अशा साऱ्यांवर अनेक वर्षांपासून सेवाकर आहे आणि संसदेच्या अनेक अधिवेशनांत खासदारांच्या मान्यतेनेच या सेवा करपात्र झाल्या आहेत आणि त्यांचे दरही बदलले आहेत. खासदार बच्चन वहिनींना याची माहिती असणारच!


अमिताभजी, सेवा कर खाते सेवा घेणाऱ्याला "नोटीस' बजावीत नाही, तर सेवा देणाऱ्याला बजावते. मात्र, ही "नोटीस' बजावण्यासाठी गृहपाठ म्हणून नागरिकांकडून माहिती मिळविली जाते. देशातील सुबुद्ध आणि प्रतिष्ठित नागरिकांचे शासनाला सहकार्य करण्याचे आद्य कर्तव्य असते. तर पहिली बाब अशी, की आपणास "नोटीस' आली नसून "चौकशीपत्र' आले असणार आणि त्यात अवमानकारक काही असत नाही. आपणाकडून ही माहिती घेऊन सेवा कर विभाग, संबंधित सेवादात्यांनी त्याबाबतचा कर सरकारजमा केला आहे किंवा कसे हे तपासून आवश्‍यक तिथे "नोटिसा' पाठवेल.


अमितजी, महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी असा खर्च वधूपित्याच्या माथी मारला जातो. आपणही कदाचित हा सर्व खर्च रॉय कुटुंबालाच करायला लावला असणार! प्रश्‍न आहे तो "मेकअप'चा. आपली सून एके काळची विश्‍वसुंदरी असल्याने, तिला मेकअपची गरजच नाही. शिवाय अभिनेत्री असल्याने तिचा पगारी "ब्यूटीशियन' असणारच. तसा तो आपल्या कुटुंबातील सर्वांचाच असणार. पगारी माणसाने दिलेली सेवा करपात्र ठरू शकत नाही, ही माहिती लक्षात घ्या.


बच्चनसाहेब, आपणापुढे दोन-तीन मार्ग आहेत. विवाह सोहळ्याच्या खर्चाचा तपशील आपण खर्च केला असल्यास सेवा कर विभागाला कळवा. तसे नसल्यास हा खर्च आम्ही केलेला नाही, असे कळवा किंवा एकदा संबंधित अधिकाऱ्यांना वेळात वेळ काढून प्रत्यक्ष भेटा. तेही प्रभावित होतील आणि पुढे नातवंडांना "अमिताभ आमच्या ऑफिसात आला होता' अशा आठवणी सांगतीलच.


आपण काहीही करा; पण अवमान वगैरे न मानता आदर्श नागरिकाने कसे वागावे याचा धडा भारतीय जनतेला द्या.जयावहिनींना नमस्कार कळवावा.

आपला (मित्र)चारुचंद्र भिडे

No comments: