Wednesday, October 24, 2007

राष्ट्रध्वजाचा अवमान...

पहिल्यावहिल्या ट्‌वेंटी- २० क्रिकेट स्पर्धेचे जगज्जेतेपद पटकावून कोट्यवधी भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या महेंद्रसिंह धोनी याच्या तरण्याबांड "टीम'ला आता खटल्यालाही सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे...

कारण आहे राष्ट्रध्वजाच्या अवमानाचे. दक्षिण आफ्रिकेतील ही स्पर्धा जिंकल्यावर तिरंगा घेऊन मैदानाला फेरी मारल्याने या खेळाडूंनी राष्ट्रध्वजाचाच अवमान केला, अशी फिर्याद कानपूरच्या एका वकिलाने "टीम इंडिया'वर गुदरली आहे.

ट्‌वेंटी- २० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धूळ चारून जगज्जेतेपद पटकावल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंनी हाती तिरंगा घेऊन मैदानाला जी फेरी मारली त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान झाला. त्यामुळे या क्रिकेटपटूंवर कारवाई करावी, अशी फिर्याद न्यायालयात दाखल झाली आहे. कानपूर येथील राहुल पांडे या वकिलाने दाखल केलेली ही तक्रार मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोंदवून घेतली असून, या प्रकरणी येत्या २५ ऑक्‍टोबरला पुढील सुनावणी होणार आहे. या प्रकरणी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार धोनी, उपकर्णधार युवराजसिंग यांच्यासह भारतीय संघाच्या अन्य खेळाडूंनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.

दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच झालेल्या अंतिम सामन्यात पाकला पराभूत करून भारताने या स्पर्धेचे जगज्जेतेपद पटकावल्यानंतर संपूर्ण देशाने अक्षरशः दिवाळी साजरी केली होती। मात्र, अंतिम सामना जिंकल्याच्या आनंदात "धोनी ब्रिगेड'ने तिरंगा हाती घेऊन मैदानाला फेरी मारली. यात अनेकदा खेळाडूंच्या हातातील राष्ट्रध्वज जमिनीवर लोळत होता. यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान झाला, असे पांडे यांनी नमूद केले आहे. या अवमानाचे "साक्षीदार' म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव निरंजन शहा, सिनेनट शाहरूख खान व समालोचकाच्या भूमिकेतील ज्येष्ठ क्रिकेटपटू रवी शास्त्री यांचीही नावे पांडे यांनी आपल्या फिर्यादीत नोंदविली आहेत.

राष्ट्रध्वजाचा अवमान म्हणजे नेमकं काय...? क्रिकेटपटूंचे कृत्य जाणिवपूर्वक अवमान करण्याच्या उद्देशाचं होतं का...?

No comments: