Thursday, October 25, 2007

टिप्स...बोनस लाभदायी करण्यासाठीच्या!


दिवाळीनिमित्त मिळालेल्या बोनसपैकी किमान तीस टक्के रक्कम भविष्यकालीन तरतुदीसाठी वापरा, असा गुंतवणूक तज्ज्ञांचा सल्ला आहे. इतर रकमेपैकी संपूर्ण कुटुंबाला एकत्रितपणे ज्या वस्तू उपयोगी पडू शकतात, त्यांना प्राधान्य द्या आणि मग चैन किंवा मनोरंजनासाठीच्या वस्तू खरेदी करा, असा त्यांचा कानमंत्र आहे.

दिवाळी तोंडावर आली आहे आणि दोन आठवड्यांत बोनसचे पैसे हातात येतील. बोनसची ही रक्कम कशी खर्च करायची, याचे व्यवस्थित नियोजन केले, तर त्याचा केवळ तेवढ्या काळापुरता नव्हे, तर आयुष्यभरासाठी उपयोग होऊ शकतो. बोनसची ही रक्कम पगाराव्यतिरिक्त असते. हे उत्पन्न आपण दरमहाच्या उत्पन्नात गृहीत धरलेले नसते; त्यामुळे या रकमेपैकी किमान तीस टक्के रक्कम गुंतवणुकीसाठी वापरली पाहिजे, असे गुंतवणूक तज्ज्ञ सांगतात.

ही गुंतवणूक सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीसारख्या (पीपीएफ) खात्यात करू शकतो किंवा करबचत करणाऱ्या म्युच्युअल फंडांमध्ये करू शकतो. संपूर्ण कुटुंबाला विम्याचे संरक्षण देणाऱ्या "मेडिक्‍लेम सारख्या योजनांमध्येही गुंतवणूक करता येईल. प्रत्येक बोनसमधून त्या विम्याचा हप्ता फेडण्याचे नियोजन आपल्याला करता येईल, असा सल्ला अर्थतज्ज्ञांनी दिला. आर्थिक वर्षातील सहा महिने पूर्ण झाल्यामुळे करबचतीचा विचारही बोनसच्या रकमेपासूनच करता येईल, असे तज्ज्ञांनी सांगितले.

ठेव किंवा ईएलएसएसबोनसच्या रकमेपैकी तुम्ही तीस टक्के रक्कम प्राप्तिकराची बचत करणाऱ्या शेड्यूल्ड बॅंकांच्या मुदत ठेवींमध्ये ठेवली आणि दर वर्षी अशा प्रकारे रकमेची बचत करत गेलात, तर पाच वर्षांनंतर जवळजवळ सध्याच्या बोनसच्या दीडपट रक्कम तुमच्या हातात येईल. हा पर्याय नको असेल, तर म्युच्युअल फंडांच्या इक्विटी लिंसेव्हिंग स्किममध्ये (ईएलएसएस) तुम्ही ही रक्कम गुंतवू शकता. या योजनांद्वारे तुमचे पैसे शेअर बाजारातच गुंतवले जातात. यात थोडा धोका जरूर आहे; पण मिळणारे फायदेही तितकेच आहेत; शिवाय पाच वर्षांचा कालावधी तुम्ही ठरवलात, तर धोका आपोआपच कमी होतो.


मिलिंद संगोराम (करसल्लागार)

No comments: