Showing posts with label civic issue. Show all posts
Showing posts with label civic issue. Show all posts

Sunday, August 24, 2008

शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांसह बैठक

पुणे शहराच्या प्रलंबित प्रश्‍नांची राज्य सरकारकडे तड लागावी, यासाठी आता केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी लक्ष घातले असून, सोमवारी मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत ते या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहेत. या बैठकीला राज्य सरकारच्या मुख्य सचिवांपासून सर्व महत्त्वाच्या विभागांच्या प्रधान सचिवांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

श्री. पवार यांनी गेल्याच आठवड्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांशी चर्चा केली होती. त्यामध्ये अनेकांनी पुण्याचे विविध प्रश्‍न राज्य सरकारकडे प्रलंबित असल्याची तक्रार केली.

राज्य शासनाने प्रलंबित असलेले प्रश्‍न खालीलप्रमाणे


* झोपडपट्टी पुनर्वसन योजना आणि पुणे महानगर विकास प्राधिकरणाबाबतचे प्रश्‍न मार्गी लागत नाही.
* पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांच्या विकास आराखड्याला मान्यता.
* आत्तापर्यंत फक्त बाणेर, बालेवाडी या दोनच गावांच्या विकास आराखड्याला अंतिम मान्यता मिळून त्याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. बाकीच्या नऊ नियोजन गटांच्या विकास आराखड्याला अजूनही मान्यता मिळालेली नाही.
* पुणे शहराबाहेरून आखण्यात आलेले रिंग रोड, पुणे महानगर विकास प्राधिकरण व मोशी येथे उभारण्यात येणारे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र.

आपल्याला काय वाटते, की हे प्रश्‍न पुणे शहरासाठी खरोखरीच महत्त्वाचे आहेत का? आणि असतील, तर यापैकी कोणत्या प्रश्‍नांना आपण प्राधान्य क्रम द्याल? या प्रश्‍नांची क्रमवारी कशाप्रकारे लावाल? याव्यतिरिक्तचे प्रश्‍न सोडविले पाहिजे असे आपल्याला वाटत असेल, तर त्यांबाबतही मत मांडा..

Tuesday, July 01, 2008

देशाला भेडसावणार "ई वेस्ट'ची समस्या

डॉ. अजय ओझा : कचऱ्यातील मूलद्रव्ये मानवी आरोग्यास धोकादायक

देशातील 20 लाख संगणक आता कचऱ्यात फेकण्यायोग्य झाले आहेत. तसेच 70 लाख मोबाईल दूरध्वनी संच "आउटडेटेड' बनले आहेत. या अवाढव्य कचऱ्याचे अर्थातच "ई वेस्ट'चे करायचे काय, हा मोठा प्रश्‍न उभा राहिला आहे.

डॉ. अजय ओझा म्हणाले, ""देशभरात प्रचंड प्रमाणात ई-कचरा निर्माण होत आहे. त्यातील कॉपर व अन्य मूलद्रव्ये काढण्याची प्रक्रिया कठीण आहे, तसेच त्यातील पारा आणि कॅडमियम यापासून मानवी आरोग्यास धोका आहे. पुणे महापालिकेने ई-कचरा व्यवस्थापनाबद्दल पावले उचलली आहेत. मात्र, माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचा त्यांना पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.

''मुळातच हा ई-कचरा निर्माण कशामुळे झाला. अन्‌ तो ई-कचरा निर्माण होऊ नये यासाठी कोणत्या उपयायोजना राबविता येतील, असे आपल्याला वाटते?

Friday, June 20, 2008

शहरातील एकही परिसर राड्यारोड्याला अपवाद नाही...

शहरातील कोणताही परिसर राड्यारोड्याला अपवाद नसल्याची, प्रतिक्रिया "सकाळ'च्या वाचकांनी दिली आहे. शहरात विविध रस्त्यांवर टाकल्या जाणाऱ्या राड्यारोड्याबाबत "सकाळ'ने विस्तृत वृत्त दिले होते. तसेच, छायाचित्रेही प्रसिद्ध केली होती. या राड्यारोड्यामुळे शहरात दुर्घटनांची माहिती देतानाच ज्या परिसरात राडारोडा टाकण्यात आला आहे, तेथील नागरिकांनी "सकाळ'कडे माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले होते. त्याला "ई- सकाळ'च्या वाचकांनी भरघोस प्रतिसाद दिला. अनेकांनी आपली मते थेट "पुणे प्रतिबिंब' आणि "सकाळच्या ब्लॉग'वर नोंदविली.

बाणेर परिसर राड्यारोड्याला अपवाद नसल्याचे एका वाचकाने सांगितले. ते म्हणाले, ""बाणेर परिसरात सध्या नवीन बांधकामे सुरू आहेत. त्यातील अनेक बांधकामांचा राडारोडा रस्त्यावर टाकण्यात आला आहे. मात्र, त्याचे येथील नागरिकांना सोयरेसुतक नाही. याचाच लाभ हे बांधकाम व्यावसायिक घेत आहे.''

तर, एका वाचकाच्या म्हणण्याप्रमाणे केवळ बांधकामांचा राडारोडाच नाही, तर बांधकामांच्या साहित्यांची ने- आण करणारे ट्रक, टेंपोही रस्त्यावरच लावले जातात. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. त्याबाबत पोलिस कोणतीही भूमिका घेत नाही.

पीएमसीच्या कारभाराबाबत पडताळणी करण्याची गरज एका वाचकाने व्यक्त केली. ते म्हणाले, ""की संबंधित क्षेत्र अधिकारी नेमून दिलेल्या परिसरात पाहणीसाठी जातात का, याची तपासणी एका पथकाद्वारे केली पाहिजे.'' या मताला दुजोरा देताना एक वाचक म्हणाले, की महापालिकेच्या शिथिल वर्तनामुळे बांधकाम व्यावसायिक राज्य करत आहेत.

या व्यतिरिक्त आपली मते तुम्हाला व्यक्त करायची असतील, तर पुणे प्रतिबिंब आणि ब्लॉगवर जरुर कळवा...

Wednesday, June 18, 2008

राडारोडा जिवावर बेतला

विजेच्या धक्‍क्‍याने दोघे जखमी
शहराच्या विविध भागांत टाकण्यात येणारा राडारोडा आता नागरिकांच्या जिवावर उठला आहे. भैरोबानाल्याजवळील नवीन मुठा कालव्याजवळील राडारोड्याचे डोंगर उच्चदाबाच्या वीजवाहिनीपर्यंत पोचले आहेत. येथून जाताना गेल्या दोन दिवसांत एका मुलासह दोन जण विजेच्या धक्‍क्‍याने भाजून गंभीर जखमी झाले आहेत. या ठिकाणी यापूर्वी अनेक जनावरे विजेच्या धक्‍क्‍याने मृत्युमुखी पडली आहेत. या घटनांमुळे या परिसरात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चिमटा वस्तीजवळील या कालव्याच्या परिसरात गेल्या काही वर्षांपासून राडारोडा टाकण्यात येत आहे. येथील नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे आता येथे सुमारे एक किलोमीटरच्या परिसरात राडारोड्याचे डोंगर उभे राहिले आहेत. काही कंपन्यांचा टाकाऊ मालही येथे टाकण्यात येतो. हा राडारोडा आता येथील 22 किलोवॉटच्या उच्च वीजवाहिनीपर्यंत पोचला आहे.

रहदारीच्या असलेल्या या रस्त्यावरून जाण्याचा नागरिकांनी धसका घेतला आहे. या ठिकाणी असणाऱ्या शंकराच्या मंदिराच्या दर्शनासाठी अनेक नागरिक येतात. तसेच वस्तीतील मुले खेळण्यासाठी येथे येतात. त्यामुळे येथील धोका अजूनही कायम आहे. गेल्या काही वर्षांपासून येथे टाकण्यात येणाऱ्या राडारोड्याच्या तक्रारीची महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधींनी दखल न घेतल्यानेच हा प्रकार घडल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. "महापालिका व पाटबंधारे या पुढेही गप्प बसणार की जीव जाण्याची वाट पाहणार,' असा सवाल येथील नागरिकांनी "सकाळ' प्रतिनिधीशी बोलताना केला.

आपल्या घराजवळच्या परिसरात अशाप्रकारचा राडारोडा टाकला जात असेल, तर आम्हाला या ब्लॉगवर जरूर कळवा...अथवा छायाचित्र पाठवा...आपण प्रशासनाकडे तक्रार केली असेल, पण त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असेल, तर तेही कळवा..