मराठी पाट्या लावा
महाराष्ट्रात लातूरला भूकंप झाला, तेव्हा भूकंपग्रस्तांसाठी मदतीचा हात आखडता घेणाऱ्या मुंबईतील व्यापाऱ्यांनी जेव्हा भूजमध्ये भूकंप झाला, तेव्हा मात्र तेथे भरभरून मदत केली, मग महाराष्ट्र व गुजरात असा भेदभाव का, असा परखड सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बुधवारी उपस्थित केला.
मराठी पाट्या लावण्यासाठी आता फक्त एकच दिवस शिल्लक आहे, पाट्या बदलल्या नाहीत तर परिणामांना सामोरे जा, असा अंतिम इशाराही त्यांनी दिला.गेल्या काही दिवसांपासून मराठी पाट्यांचा मुद्दा चांगलाच तापला आहे. त्यातच काल मनसेने व्यापाऱ्यांची सभा उधळून लावली होती. या पार्श्वभूमीवर मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध राज ठाकरे यांनी चौफेर हल्ला चढविला.
महाराष्ट्राची राजभाषा मराठी असावी, हा १९६१ चा कायदा आहे , तरीही राज्याच्या भाषेसाठी कोर्टात जावे लागते यासारखे दुर्दैव नाही. भाषेसाठी कोर्टात जाणारे कुठलेही राज्य या देशात नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी कायदा आमच्यामुळे झाला असून, मनसेने त्याचे श्रेय घेऊ नये, असा इशारा दिला. मराठीचा आग्रह योग्य असला, तरी त्यात पक्षीय राजकारण आणणे योग्य आहे का? या सर्वांत तुम्ही कोणती भूमिका घ्याल? आम्हाला येथे नक्की कळवा...