"पाट्यां'पलीकडील अस्मिता
"मनसे'चे नेते राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या अस्मितेच्या मुद्द्यावरून छेडलेले आंदोलन अमिताभ बच्चन यांच्या माफीनाम्यानंतर मागे घेतले. दरम्यानच्या काळात पुणे- मुंबईतील दुकानदार आणि आस्थापना यांनी आपल्या पाट्यांचे मराठीकरण केले. त्यामुळे किंवा जया बच्चन यांनी मागितलेल्या माफीमुळे "मराठीची अस्मिता' कदाचित जागी होईल; परंतु मराठीचे जतन आणि संवर्धन मात्र होणार नाही. भाषेचे राजकारण करणे तसे सोपे असते.
एकीकडे भाषिक अज्ञान आणि दुसरीकडे भाषिक दुरभिमान यांच्या कोंडीत सापडलेल्यांनी थोडा गांभीर्याने विचार करण्याची म्हणूनच आज गरज वाटते. भाषा हे समाजाच्या विविध घटकांना, वेगवेगळ्या स्तरांना जोडणारे साधन असले पाहिजे. विशिष्ट भौगोलिक प्रदेशातील समाजाचे संघटन भाषेच्या आधारेच घडत असते. भाषिक संस्कृतीच हे कार्य करीत असते. त्यासाठी समाजजीवनाची व लोकव्यवहाराची जी विविध अंगे आहेत, तेथे कटाक्षाने स्वभाषेचा वापर व्हावयास हवा.
लोकमान्य म्हणतात त्याप्रमाणे सामाजिक विचार आणि व्यवहार यात मराठीचा आग्रहपूर्वक वापर केला तर मराठी भाषाही टिकेल आणि त्यायोगे मराठीभाषकांची संस्कृतीही! इंग्रजी माध्यमाच्या सर्व स्तरांतून होत असलेला जाणीवपूर्वक स्वीकार हा अपरिहार्य असला तरी त्यामुळे निजभाषेचे महत्त्व कमी होत नाही. शिक्षण, रोजगार, अर्थार्जन, व्यापार, उद्योग या निमित्ताने परप्रांतातून महाराष्ट्रात येणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाणार आणि त्यातून मराठी-अमराठीचे वाद अधूनमधून डोके वर काढत राहणार आणि भाषिक संस्कृतींचे संघर्षाचे प्रसंगही निर्माण होणार! तूर्त इंग्रजीच्या आक्रमणापेक्षा मराठीपण टिकविण्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे.