Showing posts with label Readers Reactions. Show all posts
Showing posts with label Readers Reactions. Show all posts

Tuesday, June 24, 2008

साहित्य महामंडळावर "ब्लॉगविश्‍वा'तून टीकास्त्र

"ई-सकाळ'वर प्रतिक्रियाः परदेशात संमेलनास विरोधाची संख्या अधिक

"फुकटात परदेशवारीची हौस' ते "सातासमुद्रापार गेल्याचा आनंद' अशा प्रतिक्रियांचा हिंदोळा "ई-सकाळ'च्या ब्लॉग्जवर रविवारी आणि सोमवारी अनुभवास आला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमेरिकेत सॅनफ्रान्सिस्कोमध्ये घेण्याच्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या निर्णयावर "सकाळ ब्लॉग' आणि "पुणे प्रतिबिंब' ब्लॉगवर अशा दोन्ही टोकांच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. त्यातही साहित्य महामंडळाच्या निर्णयावर टीकेचा रोख असणाऱ्या प्रतिक्रियांची संख्या अधिक आहे, हे विशेष.

मराठी साहित्याचे बहुसंख्य रसिकजन महाराष्ट्रात असतील, तर हे साहित्य संमेलन अमेरिकेत भरविण्याची गरजच काय, असा प्रश्‍न काही साहित्यप्रेमींनी उपस्थित केला. संमेलनाच्या नावाखाली साहित्यिकांची परदेश वारी करण्याची हौस भागविली जात असल्याचा आरोपही अनेकांनी केला.

याबाबत श्रीधर, योगेश, प्रसाद म्हणाले, ""अमेरिकेच्या तुलनेने महाराष्ट्रात साहित्य रसिकांची संख्या निश्‍चितच मोठी आहे. हे रसिक संमेलनाला मुकणार नाहीत, याचा विचार झाला पाहिजे. सर्वप्रथम अमेरिकेतील नव्या पिढीत मराठी विषयीची गोडी निर्माण केली पाहिजे; अन्यथा अमेरिकेतील हे संमेलन केवळ फार्स ठरेल.''

मागील संमेलनाचा दाखला देताना काही वाचक म्हणाले, ""मागील वर्षी संमेलनात ग्रामीण भागातील साहित्यिकही सहभागी झाले होते. त्यांना या वर्षी संमेलनापासून वंचित ठेवण्याचे काम साहित्य मंडळ करत आहे. केवळ 70 साहित्यिकांच्या परदेशवारीसाठी एक कोटी खर्च करण्याऐवजी त्या रकमेत विकासकामे करावीत आणि साहित्यिकांना स्वखर्चाने जाण्यास भाग पाडावे.

'' रोहित कुलकर्णी यांनी हे संमेलन मराठी मातीत म्हणजे मुंबईत होण्याची गरज व्यक्त केली; तर ए. पी. जामखेडकर यांनी हे साहित्य संमेलन केवळ अनपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले.

संमेलनाचा निर्णय स्वार्थापोटी होत असल्याचा खेद व्यक्त करताना शेफाली जोशी, बालाजी पवार, संदीप दळवी म्हणाले, ""केवळ मूठभर लोकांनी अशा प्रकारचा निर्णय घेणे मुळातच चुकीचा आहे. अशा निर्णयाने साहित्य मंडळ अप्रत्यक्षरीत्या येथील रसिकांचा सहभाग नाकारत आहे. अमेरिकेतील ज्या नागरिकांना मराठी साहित्याविषयी आत्मीयता आहे, त्यांनी महाराष्ट्रात येऊन संमेलनाला उपस्थित राहावे.''

""हे संमेलन एकाच वर्गाच्या हातात आहे, अशी शंका उपस्थित करणाऱ्यांच्या मनात त्यांच्याविषयी अधिकच कटुता वाढेल,'' अशी शक्‍यता एका वाचकाने व्यक्त केली. काही वाचकांनी या निर्णयाचे स्वागत केले. मराठीला जागतिक दर्जा प्राप्त करून देण्यासाठी हे संमेलन अमेरिकेत होणे आवश्‍यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

त्याबाबत सुभाष भाटे म्हणाले, ""आज महाराष्ट्रातील मोठा वर्ग अमेरिकेत स्थायिक आहे. तेथे हे मराठी बांधव मराठीचा झेंडा अभिमानाने फडकावीत आहे. त्यामध्ये अनेक साहित्यिकांचाही समावेश आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सॅनफ्रान्सिस्कोमध्ये होणाऱ्या संमेलनाचे स्वागत झालेच पाहिजे. त्याकडे संकुचित वृत्तीने बघणे सोडून दिले पाहिजे.''

आम्ही आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत आहोत... आपली मते या ब्लॉगवर जरूर नोंदवा..