Saturday, August 30, 2008

लोणावळा खंडाळ्यात एकांतातील बंगल्यांचा दुरुपयोग

मुंबईतील धनिकांनी लोणावळा व खंडाळा परिसरातील डोंगरावर बांधलेल्या बंगल्यांचा रंगीत-संगीत पार्ट्या व गैरकृत्यांसाठी वापर करण्याचे प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. डान्स बारवरी बंदीनंतर या प्रकारात वाढ झाल्याचे दिसून येत असून, या प्रकरणात बाहेरगावच्या लोकांचा अधिक सहभाग असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे.

थंड हवेचे ठिकाण म्हणून मुंबईकरांची लोणावळा व खंडाळा या पर्यटनस्थळांना अधिक पसंती आहे. मुंबईतील अनेक धनिकांनी या दोन शहरांप्रमाणेच पवना धरण परिसरात जागा खरेदी करून आलिशान बंगले बांधले आहेत. अनेकांनी डोंगरच्या डोंगर खरेदी करून त्यावर टूमदार बंगले बांधले आहेत. अनेक बंगले दुर्गम व लोकवस्तीपासून दूर बांधलेले आहेत व या बंगल्यांचे मालक वर्षातून एकदा किंवा दोनदा सुटी घालविण्यासाठी येतात. वर्षाअखेर साजरी करण्यासाठीही ते या बंगल्यांचाच वापर करतात. एरवी मात्र या बंगल्यांची संपूर्ण जबाबदारी सुरक्षारक्षकांकडे असते. या दोन्ही ठिकाणी वर्षभर असलेली पर्यटकांची वर्दळ लक्षात घेऊन हे बंगले तात्पुरत्या स्वरूपात भाड्याने देण्याची शक्कल या बंगल्याची व्यवस्था पाहणाऱ्यांनी लढविली आहे. अधिक पैशाच्या मोहातून काही व्यवस्थापकांनी रंगीत-संगीत पार्ट्या आयोजित करण्यास सुरवात केली.

डान्स बारवरील बंदीनंतर अशा बंगल्यांवर बारबाला आणण्याचे प्रकारही सुरू झाले. काही बंगल्यांवर मुजऱ्याचेही प्रकार घडले. मुंबईतील धनिकांना मद्यधुंद होऊन मौजमजा व रंगीत-संगीत पार्ट्या करण्यासाठी हे ठिकाण अधिक सुरक्षित वाटू लागले. मुंबईतील एजंट या पार्ट्यांची सर्व व्यवस्था करून देत असल्याचे समजते. मंगळवारी खंडाळ्यातील बंगल्यावर रंगलेली सीमा शुल्क अधिकाऱ्यांची पार्टी अशा एजंटाकरवीच आयोजिण्यात आली होती. काही वर्षांपूर्वी तुंगार्ली परिसरातील एका बंगल्यात क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणारी टोळीही छापा घालून पकडण्यात आली होती. येथे रोजच हजारो पर्यटक येत असल्याने स्थानिक नागरिकांकडून अशा प्रकारांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही; तसेच लोकवस्तीपासून दूर बंगल्यांमध्ये असे प्रकार घडत असल्यानेही नागरिकांचे; तसेच पोलिसांचे त्याकडे लक्ष जात नाही. खबऱ्यांकडून माहिती मिळाली तरच पोलिसांना हे प्रकार कळतात.


नागरिकांची जागरूकता हवी

बंगल्यांमध्ये घडणारे असे अनैतिक प्रकार व या प्रकारांतून वाढणारी गुन्हेगारी या पर्यटनस्थळांच्या लौकिकाला धक्का पोचविणारी असल्याने आता अशा प्रकारांबाबत अधिक जागरूकता दाखविण्याची गरज आहे. या ठिकाणी असलेले सर्व बंगले, त्यांचे मालक व व्यवस्थापक यांची यादी करून या बंगल्यांच्या वापराची सखोल माहिती घेणे गरजेचे आहे. स्थानिक नागरिकांनीही या बाबत अधिक जागृत राहून पोलिसांना सहकार्य करण्याची आवश्‍यकता आहे.
सिंहगड पायथ्यालगत झालेली रेव्ह पार्टी आणि त्यानंतर खंडाळ्यातील ही रंगीत- संगीत पार्टी पुणे जिल्ह्याला काळिमा फासणारी आहे.. अशा पार्ट्यांवर आणि पार्ट्या करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. आपल्याला काय वाटते? आपल मते जरूर नोंदवा...

2 comments:

Anonymous said...

लोणावळ्यातल्या व इतरत्र "पकडलेल्या" पार्ट्यांवर आणि पार्ट्या करणाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे हे अत्यंत गरजेचे आहे!

विशेषतः लोणावळ्याच्या पार्टीमध्ये सीमाशुल्क विभागाचे जे अधिकारी पकडले गेले होते त्यांना नुसते तात्पुरते निलंबित करून चालणार नाही तर त्यांना कायमचे नोकरीतून काढून, तुरुंगात डांबून त्यांच्या घरादाराच्या झडत्या घेतल्या पाहिजेत, नाहीतर हे प्रकरण काळाच्या पदद्याआड गेल्यावर ते निस्चितच सहीसलामत सुटणार!!!

या विभागाच्या अतिशय माजलेल्या अधिका-यांना पहिल्यापासून उन्मत्त वागून जनतेकडून पैसे वा माल उकळण्याची वाईट सवय आहे!

सरकारला इच्छाशक्ती असती तर यांना केव्हाच वठणीवर आणले गेले असते,पण भ्रष्टाचाराच्या खाईत सर्व सरकारी "खाती" [मग तो महसुल,आयकर,प्राप्तीकर वा तत्सम विभाग असो],खाण्यात गुंतलेली असल्यामुळे सीमाशुल्क विभागाला कशी अद्दल घडविणार?

सर्व पार्ट्यांवर आणि पार्ट्या करणा-यांवर कडक कारवाई झाली पाहिजे का नको हा धोरणाचा मुद्दा या विषयाची व्याप्ती विनाकारण वाढवत आहे.

जेथे गुन्हे झालेले आहेत त्यांना त्वरेने जबर शिक्षा झाली की इतरांना आपसुकच धडा मिळेल!
Need of the hour is not to beat about the bush & let the guilty go scotfree, while the policy is being reviewed/formulated,but to put them under the guillotine speedily so as to set an example!

Amey Mankar's said...

no doubt in the fact that those officers should get punished