Monday, June 23, 2008

एसएमएस'द्वारे कळणार वाहतुकीची स्थिती

संजय बर्वे ः महिनाभरात योजना कार्यान्वित

रस्त्यांवर नित्यनेमाने होणारा वाहतुकीचा खोळंबा मुंबईकरांना नवा नाही. बऱ्याचदा ऐन "पिकअवर्स'च्या वेळी होणाऱ्या ट्रॅफिक जॅममुळे शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडतो. ट्रॅफिक जॅममुळे तासन्‌तास एकाच जागी अडकून राहणाऱ्या मुंबईकरांना यापुढे ते ज्या रस्त्याने प्रवास करणार आहेत, त्या रस्त्यावरील वाहतुकीची इत्थंभूत स्थिती अवघ्या एका "एसएमएस'ने मिळू शकणार आहे.

दीड कोटी लोकसंख्या असणाऱ्या मुंबईत सुमारे साडेचार लाख वाहने दररोज धावतात. दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहनांच्या तुलनेने येथील रस्ते मात्र अपूर्ण पडू लागले आहेत. राज्याच्या इतर भागांना रस्ते मार्गांनी जोडणाऱ्या पूर्व आणि पश्‍चिम द्रुतगती महामार्ग तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवर होणारा वाहतुकीचा होणारा खोळंबा टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी डिजिटल प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी क्‍लोजसर्किट टीव्ही लावून त्याद्वारे वाहतुकीचे नियमन करीत असतानाच त्या रस्त्यावरील वाहतुकीची प्रत्येक मिनिटाची इत्थंभूत माहिती "एसएमएस'च्या साह्याने त्या रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांसाठी वाहतूक पोलिसांकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या अभिनव योजनेचे काम सुरू झाले असून त्यासाठी ट्राय (टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथरिटी ऑफ इंडिया) कडून पाच अंकी क्रमांक लवकरच घेण्यात येणार आहे. हा क्रमांक मिळाल्यानंतर लगेचच ही सेवा कार्यान्वित होईल.

मुंबईप्रमाणेच पुण्यातही वाहुतकीचा खोळंबा होत असल्याने पुण्यातही ही योजना राबविण्याची गरज आहे.

No comments: