Thursday, May 22, 2008

घातक विडीला प्रोत्साहन करसवलतींचे

गरीब वर्ग गुंतला : देशात निम्म्याहून अधिक लोकांकडून सेवन

तंबाखूजन्य पदार्थांपैकी सर्वाधिक सेवन केल्या जाणाऱ्या विडीला इतर तत्सम उत्पादनांपेक्षा करात अधिक सवलत दिली जाते आणि याच क्षेत्रात गरीब वर्ग विविध प्रकारे सर्वाधिक गुंतला गेला आहे. सिगारेटपेक्षाही घातक असलेल्या विडीवर किमान सिगारेटएवढा कर आकारला जावा, विडीच्या वेष्टनावर धोकादायक इशारा आणि चित्र छापले जावे, या उद्योगातील स्त्रियांना आणि मुलांना पर्यायी व्यवसाय दिला जावा, अशा विविध शिफारशी "हेलिस-सेक्‍सारिया इन्स्टिट्यूट फॉर पब्लिक हेल्थ' या संस्थेने आपल्या शोधनिबंधात केल्या आहेत.

भारतात उत्पादित होणाऱ्या एकूण तंबाखूजन्य पदार्थांत विडीचे सेवन देशातील निम्म्याहून अधिक लोक करतात. त्यातही ही जनता आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या बरीच पिछाडीवर आहे. विडीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची त्यांना जाणीवच नाही; याशिवाय सहा वर्षे वयापासून मुलांनी आणि अधिकांश स्त्रियांनी विडी वळण्याच्या उद्योगात स्वतःला गुंतवून ठेवले असले तरी त्यांना त्यातून मिळणारे उत्पन्न हे अतिशय तुटपुंजे आहे. मात्र त्यातून उद्‌भवणारे आजार हे कितीतरी पटीने घातक आहेत. तेंदूची लागवड करणारे शेतकरी, विडी वळणारे कामगार, विडी ओढणाऱ्या व्यक्तींशिवाय विडीच्या धुराने इतरांनाही विविध आजार होत असतात. अशी परिस्थिती असूनही सरकारकडून सिगारेटवर आकारल्या जाणाऱ्या करापेक्षा कितीतरी कमी कर विडीवर आकारला जातो. त्यातही हाताने वळल्या जाणाऱ्या विडी उद्योगांना या करातूनही सूट देण्यात आलेली आहे. भारतात 98 टक्के विड्यांचे उत्पादन हाताने वळून केले जाते; तर केवळ दोन टक्के विड्या यंत्रावर वळल्या जातात.

No comments: