Friday, April 11, 2008

नियम न पाळणारी रुग्णालये बंद करून टाका

खंडपीठाचा संताप : "पेटीट'मधील परिस्थिती वाईट

रुग्णालयात निर्माण होणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबतचे नियम न पाळणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई करण्यात यावी, असा आदेश उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे. अशी रुग्णालये ताबडतोब बंद करून टाका, अशी संतप्त प्रतिक्रियाही खंडपीठाने व्यक्‍त केली आहे.

या कचऱ्यात रक्ताने भरलेल्या बॅंडेजपासून ते शस्त्रक्रियेत कापलेल्या अवयवांचा समावेश असतो. त्यामुळे त्यांची विल्हेवाटही नियमानुसार लावणे अपेक्षित असते; मात्र पेटीट प्राणी रुग्णालय व पोदार रुग्णालय हे नियम पाळत नाहीत, असे खंडपीठाला महिनाभरापूर्वी दाखवून देण्यात आले होते. त्यामुळे न्यायालयाने ऍड. उदय वारुंजीकर यांना तेथे जाऊन पाहणी करण्यास सांगितले होते. हे नियम पाळण्याबाबत पेटीट रुग्णालयातील परिस्थिती वाईट आहे, तर पोदार रुग्णालयात हे काम थोड्या थोड्या प्रमाणात सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. त्यावर खंडपीठाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. पाहणी अहवाल खरा असेल, तर अशा स्थितीत ही रुग्णालये चालविण्यात काय अर्थ आहे, ती लगेच बंद करून टाका. याकडे सरकार डोळेझाक कशी करू शकते, असे खंडपीठाने विचारले.

नियम न पाळल्यामुळे पेटीट रुग्णालयास राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने "कारणे दाखवा' नोटीस दिली होती. त्याचेही उत्तर या रुग्णालयाने दिले नसल्याचे आज उघड झाले.राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या व सरकारी अधिकाऱ्यांनी याबाबत जबाबदारीने काम केले पाहिजे. रुग्णालये अशा पद्धतीने चालत असतील, तर ते लोकांच्या आरोग्याशी खेळण्यासारखेच आहे. त्यामुळे ही दोन रुग्णालये सर्व नियम पाळतील याबाबत राज्याच्या आरोग्य सचिवांनी व मंडळाच्या सदस्य सचिवांनी दोन आठवड्यांत खातरजमा करावी. चार आठवड्यांत या रुग्णालयांनी नियमपालन केले नसल्याचे दिसले, तर या अधिकाऱ्यांनी नियमानुसार सुयोग्य कारवाई करावी, असा आदेश खंडपीठाने दिला.

खंडपीठाने निर्णय दिला खरा, पण नियम मोडणाऱ्या किती रुग्णालयांवर कारवाई होते, हा प्रश्‍न आहे.

1 comment:

ASHISH BADWE said...

मिस वैशाली अशी रूग्णालये बंद करणेच योग्य - आजार फैलावण्यापेक्षा हा निर्णय केव्हाही चांगला - आशिष बडवे
www.dainikyavatmalnews.com
www.newsindiapress.blogspot.com
www.vidarbhanews.blogspot.com
Email - ashish_badwe@yahoo.co.in
Contact - 09403455960