Sunday, December 30, 2007

गोव्यात पर्यटकांना यावेळी विशेष सुरक्षा

पर्यटन स्थळ म्हणून गोवा देशात तसेच जागतिक स्तरावर प्रसिद्ध असल्याने मोठ्या प्रमाणात देशी - विदेशी पर्यटक वर्षाची पूर्वसंध्या व नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गोव्यात येत असतात. या काळात गोव्यातील लोकसंख्या व पर्यटक मिळून सुमारे तीस लाखांवर ही संख्या पोचते. गर्दीची ठिकाणे ही दहशतवादी बॉम्बस्फोट करण्यासाठी निवड करीत असल्याने अशावेळी चोख बंदोबस्त ठेवणे हे पोलिस खात्यासहित किनारारक्षक दलाला दरवर्षी तारेवरची कसरत करीत जबाबदारी पार पाडावी लागते.

गोव्याला दहशतावाद्यापासून धोका नसला तरी पोलिसांनी शक्‍य तेवढा कडक पोलिस बंदोबस्त महत्त्वाच्या ठिकाणी ठेवला आहे. गोव्याच्या हद्दीवर "सीसी कॅमेरे' बसवून वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. पोलिस कर्मचारी, गोवा सशस्त्र पोलिस (आयआरबी) व केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तीन कंपन्या मिळून सुमारे साडेसहा हजार पोलिस कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. स्थानिक नागरिकांच्या, व्यापाराच्या व विविध क्षेत्रातील व्यावसायिकांच्या बैठका घेऊन त्यांना जागरूक करण्याचे परिपत्रक पोलिस अधीक्षक ऍलन डिसा यांनी २६ डिसेंबर रोजी सर्व पोलिस स्थानकाच्या प्रमुखांना जारी केले होते. त्यानुसार संबंधित पोलिस स्थानकाच्या प्रमुखाने बैठका घेऊन लोकांना जागरूक करण्याबरोबरच सूचनाही केल्या आहेत, अशी माहिती पोलिस महासंचालक बी. एस. ब्रार यांनी दिली.

किनारपट्टी परिसरात होणाऱ्या संगीत नृत्यरजनी व पार्ट्या हे लक्षात घेऊन पोलिस अधिकाऱ्यांनी नाताळनंतर प्रत्येक पोलिस स्थानकाच्या प्रमुखांना त्यांच्या क्षेत्रातील शॅक्‍स, रेस्टॉरंट व हॉटेल चालक यांच्या बैठका घेऊन पर्यटकांची माहिती नोंद करण्यावर अधिक भर देण्याच्या सूचना केल्या आहेत. रिक्षा, टॅक्‍सी, मोटारसायकल पायलट व मोटारसायकल टॅक्‍सी तसेच मार्केटातील व्यापाऱ्यांच्या दोन बैठका घेतल्या आहेत. संशयास्पद आढळून येणाऱ्या व्यक्तींची माहिती जवळच्या पोलिस स्थानकाला किंवा पोलिस नियंत्रण कक्षाला (टेलिफोन क्र. १००) पुरविण्याचे त्यांना सांगण्यात आले आहे.

No comments: