Tuesday, December 25, 2007

रेव्ह पार्ट्यांवर पोलिसांची नजर!

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत कम्युनिटी साईटवरून रेव्ह पार्ट्यांची निमंत्रणे पाठविण्यास सुरुवात झाली आहे. शहरी भागात लपूनछपून होणाऱ्या या पार्ट्यांवर पोलिसांनी लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदा अशा पार्ट्यांचे आयोजक "रेव्हर्स' शहरालगतच्या जंगलांचा तसेच ट्रेकिंगच्या ठिकाणांचा आश्रय घेणार आहेत. नागरी वसाहतींपासून दूर असणारे हे परिसर पिंजून काढण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

यंदा थर्टी फर्स्टनिमित्त शहरात ठिकठिकाणी सेलिब्रेशन पार्ट्या आल्या आहेत. इंटरनेटवर येणारी रेव्ह पार्ट्यांची निमंत्रणेही बऱ्यापैकी वाढीस लागली आहेत. या पार्ट्यांत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा वापर होतो. यंदा ऑर्कुट, गुगलसारख्या वेबसाईटवरील अनेक कम्युनिटीवरून रेव्ह पार्ट्यांसाठी निमंत्रणे पाठविण्यात येऊ लागली आहेत. मुंबईत झडणाऱ्या रेव्ह पार्ट्यांच्या ठिकाणांवर पोलिसांचे लक्ष असल्याने या पार्ट्यांच्या संयोजकांनी आता मुंबईला लागून असलेल्या जंगलांचा आश्रय घेण्याचे ठरविले आहे. बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानाचा परिसर, येऊरचे जंगल, माहुली, खडवली, वसई, मुरबाड, खोपोली, कर्जत येथील जंगल परिसर या रेव्हर्ससाठी "हॉट स्पॉट' ठरणार आहे. याव्यतिरिक्त शहरालगत असलेली ट्रेकिंगची ठिकाणेही या मंडळींची आवडीची ठिकाणे ठरणार आहेत.

ऑर्कुटवर रेव्ह पार्ट्यांना आमंत्रित करण्यात आलेल्यांत महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच बीपीओ, केपीओ इंडस्ट्रीत काम करणाऱ्या युवक व युवतींचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. काही ठिकाणी ई-मेल्स तसेच जाहिरातींच्या माध्यमातून सोबत आपल्या जोडीदाराला घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत घेण्यात येणाऱ्या दक्षतेमुळे काही रेव्हर्सनी आपला मोर्चा गोवा तसेच बंगळूरकडे वळविला आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांत गोवा येथील कलंगुट, म्हापसा, बगा, अरपोरासारख्या बीचवर या पार्ट्या होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या वर्षी पुण्यात सिंहगडाच्या पायथ्याशी झालेल्या रेव्ह पार्टीत सुशिक्षित घरातील युवक-युवती अमली पदार्थांच्या विळख्यात अडकल्याचे दर्शन घडले. कॅलिफोर्निया ड्रॉप्ससारख्या महागड्या अमली पदार्थांचा या पार्टीत वापर झाला होता. गोराई बीच तसेच वसईनजीक झालेल्या अशाच प्रकारच्या पार्ट्यांत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा साठा हस्तगत करण्यात आला होता. त्यावर मोठ्या प्रमाणावर चर्वितचर्वन होऊनही या युवा पिढीची रेव्ह पार्टीची धुंदी अजून उतरलेली नाही. आता या पार्ट्या बंद करण्यासाठी पालकांनीही पुढाकार घेतला पाहिजे...अन्यथा ही पिढी व्यसनांच्या गर्तेत फसत जाईल.

1 comment:

Anonymous said...

ACtually there is a big discussion thread on www.pune360.com .
The writer says the people involved should be shot in head.
And this phenomena to destroy the silience as well as spoil the whole area should be punished very hard..