Wednesday, November 14, 2007

या बळींना जबाबदार कोण?

मॉस्को - वादळात सापडलेल्या एका जहाजातील तेळगळतीने रशियामध्ये अक्षरशः पर्यावरणाचा विध्वंस सुरू केला आहे. काळा समुद्र ते अझोव्ह समुद्रादरम्यान पसरलेल्या क्रेच सामुद्रधुनीवर पसरलेल्या सुमारे १३०० ते दोन हजार टन तेलाच्या तवंगामुळे तब्बल ३० हजार पक्ष्यांचा तडफडून मृत्यू झाला आहे. याचबरोबर किती मासे आणि सागरी प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे, त्याची गणतीच नाही...
१८ फूट लांबीच्या लाटांच्या तडाख्यात "व्होल्गानेफ्ट-१३९' हे तेलवाहू जहाज सापडले होते। जहाजातील सुमारे चार हजार टनांपैकी सुमारे १३०० ते दोन हजार टन तेल सांडले होते. त्याचे अवाढव्य तवंग क्रेच सामुद्रधुनीवर पसरले आहेत. स्थलांतरित पक्षांचे घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सामुद्रधुनीवरील तवंगात अनेक पक्षी अडकून पडले आणि स्वतःचा जीव वाचविण्याची त्यांची धडपड अपुरी ठरली. गेल्या दोन दिवसांपासून पक्षी आणि सागरी जिवाच्या मृत्यूचे तांडव सुरू आहे.

"व्होल्गानेफ्ट' हे रशियातील अझोव्ह बंदरातून युक्रेनच्या पूर्वेकडील क्रिमियाकडे चालले होते। रशिया आणि कॅस्पियन भूभागातून उत्पादित झालेल्या तेलाची युरोपला होणारी वाहतूक प्रामुख्याने क्रेच सामुद्रधुनीतून चालतो. त्यामुळे हा सागरी मार्ग व्यस्त असतो. तिथेच हा अपघात झाल्याने सागरी वाहतुकीलाही मोठ्या प्रमाणात खीळ बसली आहे.

दरम्यान, हा तवंग स्वच्छ करण्यासाठी सुमारे पाचशे सैनिकांना तैनात करण्यात आले आहे। आतापर्यंत तिघांचे मृतदेह सापडले असले तरीही आणखी वीस खलाशी बेपत्ता आहेत. रशियाचे पंतप्रधान व्हिक्‍टर झुबकोव्ह हे लवकरच परिस्थितीची पाहणी करणार आहे.

जे भारतात, तेच रशियात...म्हणजे घटना घडल्यानंतर पाहणी, चौकशी, समित्या...कधी जाहीर होतात या पाहणीचे निष्कर्ष? काय साध्य होते त्यातून? आणि त्यानंतर रोखल्या जातात का अशा पर्यावरणाचा विध्वंस करणाऱया घटना...?

2 comments:

Unknown said...

सर्व बाजूने जमिनीचा विळखा असलेल्या काळ्या समुद्रात अतिसंहारक वादळात दुर्दैवाने सापडलेल्या जहाजावरून तेलगळती झाल्यामुळे त्यातील तेल सांडून व पसरून झालेल्या दुर्घटनेत कित्येक समुद्री पक्षांना आपले जीव घालवावे लागले.अशा तर्हेच्या दुर्घटना टाळणे सोपे नसते कारण वादळाचा तडाखाच इतका प्रचंड असतो की प्रयत्नांची शर्थ करूनहि प्रगत देशातसुद्धा जहाजांना हानी होण्यापासून वाचवता येत नाही.
याला फ़क्त निसर्गाच्या कोपलेल्या रौद्र रूपाला जबाबदार धरता येते!

मेक्सिकोच्या आखातात "कटरिना" नांवाच्या वादळाने केवढा हाहाकार माजवला होता ते सर्वांच्या स्मृतीमधे आहेच.न्यु ओर्लिअन्स शहर व बंदर त्यात पूर्णपणे उध्वस्त झाले.

अशा घटना टाळणे अशक्यप्राय असते,तरी सदैव सतर्क राहून मनुष्य,पशुप्राणी व वित्तहानी त्यातल्यात्यात कमी करता येते.Rapid response team ना तयार करून योग्य प्रशिक्षण देणे व अशी परिस्थिती उद्भवल्यास ताबडतोब पाचारण करून कामाला लावणे हे प्रत्येक देशाची जबाबदारी आहे.

जहाजांवर अशा प्रकारचे प्रशिक्षण सतत चालू असते व mock boat drill,fire drill,anti-pollution drill यांची दर महिन्यात चांचणी घेतली जाते व सर्वांना आपले काम आधीच नेमून दिलेले असते त्याचा ख-या आपत्तींच्या वेळी खुप फ़ायदा होतो!
सुभाष भाटे

Shekhar Shinde said...

I agree with Subhash bhote, also india should be ready for these type of natural disasters. We have to face so many natural disasters, like earthquake, tsunami, storms, etc. We lost so much valuable time for rehabilitation of a calamity people, as if we are already ready for these disasters before it happenes or quick after disasters; then we can save lots of lives from mishap.
Shekhar Shinde