Monday, June 25, 2007

"तात्कालिक फायद्या'ची मानसिकता ठरतेय... अडचण

विद्युत मंडळाच्या नगरसह दहा विभागांचे खासगीकरण (फ्रॅन्चाईसी) सध्या ऐरणीवर आले आहे. यानिमित्ताने कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेचा मुद्दा पुढे आला आहे. ....
वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी नोकरी, तात्कालिक फायद्याचा विचार करून वीज चोरीकडे होणारे दुर्लक्ष, ग्राहकांची होणारी अडवणूक, स्व-फायदा नसला, तर नवीन जोड देण्यात होणारी चालढकल आदी मुद्यांवर कर्मचारीच आता चर्चा करू लागले आहेत. त्या मुळे आत्मपरीक्षणाची ही भूमिका तारणार की नाही, हे पाहणे मात्र औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

वीज कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सर्व संघटनांच्या कृती समितीने राज्यभरात जनजागरण मोहीम हाती घेतली असून, येत्या ३० रोजी राज्यस्तरीय आंदोलनाबाबत निर्णय होणार आहे. फ्रॅन्चाईसी करण्याऐवजी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ व साधनसामग्री देण्याची मागणी करण्यात आली आहे; मात्र जेव्हा संधी होती, तेव्हा काय केले, असाही प्रश्‍न यानिमित्ताने पुढे आला आहे.

वीज कंपन्यांमध्ये ८० टक्के तांत्रिक कर्मचारी आहेत. कंपनीचे "गुडविल' कमी-जास्त होण्यात त्यांच्या कामाचा वाटा मोठा आहे. गावचा वायरमन हा "लोकप्रिय' असतो. यापैकी अनेकजण दीर्घकाळ एकाच ठिकाणी आहेत. आपली शेतीवाडी व घरदार पाहून नोकरीचे काम केले जाते! छोट्या-मोठ्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी चकरा मारण्याची वेळ वीज ग्राहकांवर येते. लवकर वीजजोड दिले जात नाही. साधनसामग्री पुरेशी मिळत नसली, तरी जी उपलब्ध आहे, त्यातूनही फायद्याच्या आमिषाने "डावे-उजवे' केले जाते. वीज चोरी करणारे कोण आहेत, हे माहीत असताना वाईटपणा नको म्हणून वा काही फायद्याच्या हेतूने त्यांच्यावर कारवाई होत नाही. पूर्वी वीज मीटरजवळ जायला जनता घाबरायची, पण आता राजरोस मीटरमध्ये "फेरफार' करण्याची हिंमत कोणामुळे व कशामुळे आली, हे पाहणे महत्त्वाचे असल्याचे कर्मचाऱ्यांमध्ये बोलले जात आहे.

जागतिकीकरणाच्या आजच्या युगात ग्राहक सेवा महत्त्वाची मानली जात आहे. पैसे भरूनही पुरेशी वीज मिळत नसेल, योग्य सेवा मिळत नसेल, तर जनतेने खासगी सेवेकडे का वळू नये, असाही प्रश्‍न आहेच. पूर्वीच्या तुलनेत आता विजेची मागणी वाढली आहे. त्या तुलनेत नव्याने वीज निर्मितीचे प्रमाण कमी आहे. मात्र, "उद्याचे मरण' लक्षात घेऊन एक होऊ पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही आता तात्कालिक फायद्याचा विचार न करता कंपनीच्या प्रगतीचा विचार केला, तर त्यातून त्यांचीही प्रगती निश्‍चित होणार असल्याचेही ज्येष्ठ कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

2 comments:

माधव बामणे said...

पूर्वी मालक नोकरांचा छळ (जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी) करत. त्यातून कम्युनिस्ट विचारसरणी पुढे आली. काळ बदलला कर्मचारी मालकाना वेठीस धरू लागले. सुरवातीला यामुळे त्याचा परिणाम ग्राहकावर झाला नाही. पुन्हा काळ बदलला. सध्या कर्मचारी ग्राहकाना वेठीस धरतात. बिचारा ग्राहक असंघटित आहे. त्या मुळे छळ सोसत राहिला. हे सोसणे ग्राहकाच्या सहनशक्ती पलिकडे चालले आहे. कंपनी कर्मचा-याकडून गरज पुरवो अथवा दुस-या कोणाकडून ग्राहकाला या मध्ये कोणाचेही देणे घेणे नाही.

माननीय मंत्र्यानी महवितरणच्या कर्मचा-याना पर्याय दिला आहे. भरपगारी ५ वर्षे सुट्टी घ्या व हे ठेके स्वत: घ्या. खाजगी ठेकेदाराना हे काम देणार नाही. आजच्या बातमीत वाचले की कोण एक कर्मचारी संघाचा पदाधिकारी मंत्र्यानी दिलेली ऒफर न स्वीकारता बेमुदत संपावर जाण्याची भाषा करत आहे. त्याला ग्राहकाबद्दल आस्था असती तर त्याने अशी भाषा केलीच नसती. कामगार चळवळीला उतरती कळा लागल्याचे हे द्योतक आहे.

असे कामगार सध्याच्या युगात काय कामाचे? ग्राहकाना त्यांचे बद्दल साहनभूती का वाटावी? जर कामगार तार्किक विचार करत नसतील तर त्याना अर्धचंद्र देऊन नवीन व्यवस्था करणे हाच एक पर्याय उरतो.

apg5588 said...

I have 100% perfect solution on the same.
If you want to know about the same, you can ask me on --
9823799062 (Akshay)