Monday, June 18, 2007

प्रश्‍नपत्रिका फोडण्यासाठी भारतीय मोजतात आठ लाख रुपये!

प्रश्‍नपत्रिका फोडण्यासाठी भरपूर पैसे देण्याची भारतीयांची तयारी असते, असा धक्कादायक निष्कर्ष संयुक्त राष्ट्रसंघाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने (युनेस्को) काढला आहे.
ही रक्कम किती असू शकते, तर कमाल वीस हजार डॉलर! (सुमारे आठ लाख रुपये).

विकसनशील देशांमधील शिक्षणातील गैरव्यवहारांवर या अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे. शिक्षकांनी शाळेत शिकवण्याऐवजी खासगी शिकवण्या घेणे, प्रश्‍नपत्रिका तयार करणाऱ्यांनी त्या फोडण्याचे उद्योग करणे, शिक्षकांनी दांड्या मारणे अशा काही प्रमुख गैरव्यवहारांकडे अहवालात लक्ष वेधले आहे.

प्रश्‍नपत्रिका फोडण्यासाठी भारतात मोजली जाणारी रक्कम इटलीतील आजवरच्या कमाल रकमेच्या (३३९१ डॉलर, सुमारे एक लाख २० हजार रुपये) सहापट आहे. एका वैद्यकीय प्रवेश परीक्षेची प्रश्‍नपत्रिका फोडण्यासाठी तर चक्क एक कोटी ४१ लाख रुपये आगाऊ धनादेशांद्वारे स्वीकारण्यात आले होते.

नवी दिल्लीतील ३९.२ टक्के विद्यार्थी शिकवण्या लावतात. शहरी भागातील ७० टक्के विद्यार्थी एक वा त्यापेक्षा जास्त विषयांसाठी शिकवण्या लावतात.

2 comments:

Unknown said...

हा निष्कर्ष खरा असणार यात वादच नाहीं.ब-याच वर्षांपूर्वी नाविक विद्यालयात परिक्षेची तयारी करतांना प्रश्‍नपत्रिका फोडण्यासाठी असे पैसे जमविण्यात येत आहेत अशी अफ़वा कानावर आली होती व एक दिवसाने काही फ़ुटलेल्या प्रश्नांची तयारीपण संबधी विद्यार्थी करत होते,पण तिच्यावर विश्वास न ठेवता परिक्षेला गेल्यावर लक्षात आले कि फ़ुटलेले सर्व प्रश्न खरोखरच प्रश्नपत्रिकेत होते.याबद्दल मी तक्रारपण नोंदविली होती पण पुढे काय झाले ते कधीच कळले नाहीं.
शिक्षणाचा आज काळा बाजार चालू आहे व शिकवण्यांशिवाय शिक्षण व्यर्थ आहे अशी भावना निर्माण झाली आहे."डोंबिवली फ़ास्ट" सिनेमात या विषयाचे छान चित्रीकरण केले आहे.पण सगळ्याच क्षेत्रांत इतका भ्रष्टाचार बोकाळला आहे की यावर कारवाई होणे सोडाच पण नुसती नोंद घेतली जाईल अशी आशा करणे पण मुर्खपणा आहे!

Anonymous said...

गुणवत्ता ओळखण्याची पद्धत जो पर्यंत सुधारत नाही, तो पर्यंत असे होणारच. पैसा टाका काय वाट्टेल ते जसे वाट्टेल तसे काम करुन घ्या ही प्रवृत्ती जगभर आहे. भारतामध्ये ती जास्त आहे. कारण आपला देवावर इतका विश्वास आहे की देवाकडूनही पैसा टाकुन काम करुन घेतॊ. ज्या देशातील देव लाच स्वीकारतो त्या देशातील मनुष्य का स्वीकारणार नाही. आपल्या मनगटावर आपला विश्वास नाही. पाहिजे तेवढी संधी नाही. सगळीकडे रेशन व परमीट राज्य. धनदांडग्याना वेगळा कायदा. निवडणूक प्रचाराला लागणारा प्रचंड पैसा. या सर्वाची परिणिती भ्रष्टाचार बोकाळण्यात होत आहे. मग दुसरे काय घडणार?

भ्रष्टाराशी टक्कर देण्याकरता निवडणूक खर्च शून्यावर आणण्याची आवश्यकता आहे. येथून सुरवात केली तर या राक्षसाला आपण गाडू शकतो.