Friday, June 15, 2007

'Being वेताळ in Our Own Homes - Whom does Mumbai Belong?' - Reader Writes

हल्ली वेताळ तसा धास्तावला दिसत होता, मधेच स्वताःशीच "मी मांसाहारी नाही हो, खरच मी मांसाहारी नाही, मी फक्त वरणभातावर साजुक तुप घालुन खाणारा माणुस होतो हो, हवे तर आता तुप पण खाणे बंद करतो, मनेका गांधी म्हणाली होती ना गाईचे दुध पण मांसाहारी आहे , तिचे मी ऐकतो, पण नका हो नका मला" असे अर्थाचे काहीतरी पुटपुटत अचानक वेताळ गप्प झाला.
नेहमी माझ्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दे नाहीतर परीणाम तुला ठावुक आहे म्हणणारा वेताळ, आज आपल्याच विचारात मग्न झालेला होता. काहीच न बोलता मधेच सुस्कारा सोडीत या खांद्यावरुन त्या खांद्यावर फिरणाऱ्या वेताळाचे हाल विक्रमाला आज पहावले नाही, स्वताःहुन त्याने आज बोलायचे ठरवले. बा वेताळा, काय झाले सांगशील की नाही , तुझे दुःख दुर करणे माझ्या हातात असलेतर मी ते जरुर करीन, विक्रमाने विचारले.
पण वेताळ काहीच बोलला नाही , दर्दभऱ्या नजरेने आपल्या वडाच्या झाडाकडे, आपण लटकत असलेल्या फांदीकडे केवीलवाण्या नजरेने एकटक पहात राहीला, शेवटी ही झाडे विक्रमाने, त्याच्या पुर्वजांनी लावलेली आहेत ते तो कसे विसरु शकत होता ?
विक्रमा, चल तुला मी प्रश्न विचारतोच. मी भुमीपुत्र, स्थानीक, मराठी आहे आणि वर मुंबईत रहातो हा माझा गुन्हा आहे का रे ? आम्ही मांसाहार करतो ती आमची जीवनपद्धत आहे. म्हणुन काय आम्हाला आमच्याकडे घरे विकत घेण्यासाठी पैसा असुन सुद्धा बिल्डरनी घरे विकू नयेत का रे ? परप्रांतीयानी आम्हाला केवळ आम्ही मांसाहारी आहेत म्हणुन आमच्या राहात्या जागेतुनही हुसकवुन लावावे काय रे ? दुर्देवाची गोष्ट म्हणजे काही बिल्डर तर आमचेच भाऊबंद आहेत रे ! आमच्यातल्या शाकाहारी माणसांना आम्ही शाकाहारी आहोत , शाकाहारी आहोत हे दुनीयेला ओरडुन सांगायला लागण्याची, अमराठी लोकांना पटवुन देण्याची वेळ का बरे आली रे ?
आमचा कोणीच वाली नाही का रे ? विक्रमा, अधिक माहीती साठी दि. ९ मे रोजी महाराष्ट टाईम्स मधे आलेला श्री. संजीब साबडे यांचा " शाकाहारी वस्त्यांतील घरं महाग " या विषयावर लिहलेला लेख वाच, आजच्या म.टा . मधले "शाकाहारी वस्तांना मराठी शाकाहारीही नको आहेत " हे श्री.अरुण जोशी , गिरगाव यांचे पत्र वाच.
विक्रमा आता समाज त्यांच्या आहारशैलीवर विभागाला जावु लागला आहे रे ! काहीतरी कर रे , आता तुच आमचा वाली ,आमचा तारणहार, तुच आमचा नेता.
वेताळा, मी तुला याबाबतीत काहीच मदत करु शकत नाहीरे, मला पुढच्या शंभर पिढ्यांची तरतुत करुन ठेवायची आहे, शेवटी पैसा हेच जीवनसर्वस्व, हाच सखा, हाच आप्त, आणि हाच शाश्वत. बाकी सारे झुठ. तु गावाकडे किंवा लांब उपनगरात दुसरे झाड बघ. हवेतर त्यास मी तुला सहायता करीन.
विक्रमा तु बोललास, पण हा मी असा उडुन जावु कुठे रे ?
आणि शेवटी अगतीक वेताळ उडुन जावुन परत आपल्या झाडावर लटकु लागला, दोन दिवसात फांदी खाली करण्यासाठी.

2 comments:

Anonymous said...

It's pathetic to see this discrimination against Marathi people. I think it's duty of Mah. gov to look into this issue. If reqd. a new law should be drafted and impelemented.

माधव बामणे said...

शाकाहारी हे दाखवण्याचे दांत. खाण्याचे नव्हेत. मुंबईतून मराठी माणूस हाकलून देणे हे खाण्याचे दांत. या मागे मात्र कतृत्व मराठी माणसांचेच. आग्री लोकांच्या जमीनी अमराठी लोकाना जवळ जवळ फुकटात देणारे कोण? मराठी लोकच ना? मुंबईला स्वत:चा भार पेलवणे अशक्य झाले तरी विशेष आर्थिक क्षेत्राच्या नांवखाली आग्री लोकाना देशोधडीला लावणारे मरठीच ना? कामगार चळवळीच्या नांवाखाली सूत गिरण्यात अनंतकाळ संप करुन गिरणीकामगाराना देशोधडीला लावणाराही मराठीच. हातगाडीवर माल विकण्यास लाज वाटणाराही मराठीच. कमी पगारावर काम नाकारणारा मराठीच असतो.

शासनाला अमराठी माणसाला मुंबईत येण्यास बंदी घालता येणार नाही. परंतु, मराठीतुन सर्व व्यवहार करण्याचे बंधन घालणे हे शासनाच्या अधिकारात आहे. परंतु, त्याला अडकाठी करणाराही मराठीच.

दुस-याना दोष देण्याआधी स्वत:चे घर स्वच्छ करणे आवश्यक आहे. मराठी आवश्यक करा मग सगळेच मराठी होतील. शे दोनशे वर्षापूर्वी आलेल्या अमराठी लोकाकडे पहा. ते मराठी लोकामध्ये श्रेष्ठ मराठी दिसतात. कारण त्याना मराठीतून व्यवहार करणे अपरिहार्य होते.