पतंगाच्या मांजाने कापली "त्यांच्या' आयुष्याची दोरी...
उत्तरायणानिमित्त गुजरातमध्ये रंगणारी पतंगबाजी आता अनेकांच्या जिवावर बेतू लागली आहे. राज्याच्या विविध भागात गेल्या दोन दिवसांमध्ये या पतंगबाजीमुळे दहा जणांचे बळी गेले, तर दीडशेवर पक्षी प्राणाला मुकले आहेत. पतंगांच्या काटाकाटीसाठी वापरल्या जाणाऱ्या काची आणि चिनी मांजाने अनेक जिवांच्या आयुष्याची दोरी अकाली कापली आहे.
अहमदाबादसह बडोदा, सुरत, राजकोट आदी अनेक मोठ्या शहरांमधील पतंगबाजीने दोन हजारांवर पक्षी गंभीर जखमी झाले आहेत. कावळे, पोपट व घारांबरोबरच गिधाड, घुबड, निळे कबुतर अशा अलीकडे दुर्मिळ होत चाललेले पक्षीही पतंगांच्या मांजामुळे मोठ्या प्रमाणात दगावले अथवा घायाळ झाले आहेत. 562 पैकी गंभीर जखमी झालेल्या 90 पक्षांचे प्राण ते वाचू शकले नाहीत. बडोद्यात 100 जखमींपैकी 15, तर सुरतमधील 93 जखमींपैकी 25 पक्षी अखेर दगावले. अत्यंत धारदार मांजामुळे मान, पाय आणि पंख कापल्याने रक्ताळलेल्या; पण तरीही जगण्यासाठी धडपडणाऱ्या असंख्य पक्षांची अवस्था पाहणाऱ्यांना हेलावून टाकत होती.
जखमी झालेल्या पक्षांमध्ये दुर्मिळ अशा पांढऱ्या पाठीच्या, तसेच इजिप्ती गिधाडांचाही समावेश असल्याचे सलीम अली पक्षीविद्या आणि निसर्गशास्त्र केंद्राचे आर. जे. कुमार यांनी सांगितले. अनेक ठिकाणी झाडांवर पसरलेले मांजाचे जाळे पक्षांसाठी मृत्यूचा सापळा बनले आहेत.
दुसरीकडे, राज्याच्या विविध भागांत मांजामुळे गंभीर जखमी झाल्याने, तसेच पतंग उडविताना उंचावरून पडल्यामुळे बळी गेलेल्यांची संख्या दहा झाली आहे. बिपिन पटेल काल दुचाकीवरून जात असताना अचानक आडव्या आलेल्या मांजाने त्यांचा गळा चिरला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. शहरालगतच्या जेटालपूरमधील स्वामिनारायण मंदिर परिसरात पतंग उडविताना छतावरून पडलेल्या संदीपसिंह महिदा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पाश्चात्यांचे अनुकरण करण्याच्या नादात भारतीय संस्कृती परंपरा जोपासणेकडे दुर्लक्ष होत आहे, अशी ओरड वारंवार केली जाते. शिवाय संस्कृतीचे जतन करणे चुकीचेही नाही. मात्र ते करत असताना काही गोष्टींचे किमान भान बाळगले गेलेच पाहिजे. अन्यथा हा अतिरेकच संस्कृतीवर गदा आणण्यास कारणीभूत ठरू शकतो, नाही का...?