Showing posts with label Environment. Show all posts
Showing posts with label Environment. Show all posts

Friday, December 28, 2007

एकदशांश लोकसंख्येला "सिकलसेल' आजार


राज्यातील लोकसंख्येच्या एकदशांश म्हणजेच एक कोटी 21 लाख नागरिकांना "सिकलसेल' या जीवघेण्या रोगाने ग्रासले आहे, अशी धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. सरकारने याची गंभीर दखल घेतली असून, या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी तातडीची पावले उचलण्याकरिता राज्यस्तरीय समिती स्थापन केली आहे.

विदर्भातील सर्व जिल्ह्यांसह राज्यातील एकूण 19 जिल्ह्यांमधील आदिवासी पट्ट्यातील नागरिकांना "सिकलसेल' (रक्तामधील रोगप्रतिकारक पेशींना नष्ट करणाऱ्या कोयत्याच्या आकाराच्या पेशी तयार होणे) या रोगाने ग्रासले आहे. या आजारात माणसाच्या शरीरातील रोगप्रतिबंधक शक्ती कमी होऊन त्याला अन्य आजार होतात. त्यातच त्याला मृत्यू ओढवण्याची शक्‍यता असते. नागपूर येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजने तयार केलेल्या अहवालानुसार हा प्रकार उघडकीस आला आहे. या भागातील गरिबी, अशिक्षितपणा आणि कुपोषणामुळे या रोगाचे प्रमाण वाढले आहे. याची व्याप्ती लक्षात घेऊन राज्य सरकारने तातडीने एक बैठक बोलावून या आजारावर प्रतिबंध आणि नियंत्रण आणण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. त्यासाठी राज्यस्तरावरील उच्चस्तरीय समिती नेमण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

"सिकलसेल' हा आजार विशेषतः आदिवासींना होतो. हा आजार अनुवंशिक असल्याने त्याची व्याप्ती वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. या रोगावर प्रभावी औषध आजही उपलब्ध नाही.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोगाचा फैलाव होऊनही सरकारी यंत्रणा यापासून अनभिज्ञ कशी काय राहू शकते? सिकलसेलने ग्रासलेले रुग्ण दगावल्यानंतर शासनाचे डोळे उघडले नाही, हे नशीबच म्हणायचं...

Wednesday, November 14, 2007

या बळींना जबाबदार कोण?

मॉस्को - वादळात सापडलेल्या एका जहाजातील तेळगळतीने रशियामध्ये अक्षरशः पर्यावरणाचा विध्वंस सुरू केला आहे. काळा समुद्र ते अझोव्ह समुद्रादरम्यान पसरलेल्या क्रेच सामुद्रधुनीवर पसरलेल्या सुमारे १३०० ते दोन हजार टन तेलाच्या तवंगामुळे तब्बल ३० हजार पक्ष्यांचा तडफडून मृत्यू झाला आहे. याचबरोबर किती मासे आणि सागरी प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे, त्याची गणतीच नाही...
१८ फूट लांबीच्या लाटांच्या तडाख्यात "व्होल्गानेफ्ट-१३९' हे तेलवाहू जहाज सापडले होते। जहाजातील सुमारे चार हजार टनांपैकी सुमारे १३०० ते दोन हजार टन तेल सांडले होते. त्याचे अवाढव्य तवंग क्रेच सामुद्रधुनीवर पसरले आहेत. स्थलांतरित पक्षांचे घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सामुद्रधुनीवरील तवंगात अनेक पक्षी अडकून पडले आणि स्वतःचा जीव वाचविण्याची त्यांची धडपड अपुरी ठरली. गेल्या दोन दिवसांपासून पक्षी आणि सागरी जिवाच्या मृत्यूचे तांडव सुरू आहे.

"व्होल्गानेफ्ट' हे रशियातील अझोव्ह बंदरातून युक्रेनच्या पूर्वेकडील क्रिमियाकडे चालले होते। रशिया आणि कॅस्पियन भूभागातून उत्पादित झालेल्या तेलाची युरोपला होणारी वाहतूक प्रामुख्याने क्रेच सामुद्रधुनीतून चालतो. त्यामुळे हा सागरी मार्ग व्यस्त असतो. तिथेच हा अपघात झाल्याने सागरी वाहतुकीलाही मोठ्या प्रमाणात खीळ बसली आहे.

दरम्यान, हा तवंग स्वच्छ करण्यासाठी सुमारे पाचशे सैनिकांना तैनात करण्यात आले आहे। आतापर्यंत तिघांचे मृतदेह सापडले असले तरीही आणखी वीस खलाशी बेपत्ता आहेत. रशियाचे पंतप्रधान व्हिक्‍टर झुबकोव्ह हे लवकरच परिस्थितीची पाहणी करणार आहे.

जे भारतात, तेच रशियात...म्हणजे घटना घडल्यानंतर पाहणी, चौकशी, समित्या...कधी जाहीर होतात या पाहणीचे निष्कर्ष? काय साध्य होते त्यातून? आणि त्यानंतर रोखल्या जातात का अशा पर्यावरणाचा विध्वंस करणाऱया घटना...?