Tuesday, July 22, 2008

अनुपस्थित खासदार सरकार तारणार?

नवी दिल्ली, ता. २१ - केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या शक्तीची आज कसोटी लागणार असून, सरकार तरणार की जाणार, याचा निर्णय अनुपस्थित राहण्याची शक्‍यता असलेल्या दहा खासदारांवर असल्याचे मानले जाते दहा खासदार राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या गटातील आहेत, हे विशेष. नियोजित वेळेनुसार आज संध्याकाळी सहा वाजता संसदेत विश्‍वास ठरावावर मतदान होईल. संसदेचे विशेष अधिवेशन सुरू झाले आणि उद्याच्या शक्तिपरीक्षेच्या तयारीसाठी दिवसभर वेगवान हालचालीही दिल्लीत झाल्या. सरकारची भिस्त प्रामुख्याने या दहा खासदारांवर असल्याचे समजते. तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जीही अनुपस्थित राहणार आहेत. त्यामुळे काठावरच्या बहुमताने सरकार तरून जाईल, अशी शक्‍यता व्यक्त होत आहे.


या दहा खासदारांमध्ये शिवसेनेचे तुकाराम रेंगे पाटील यांच्यासह भाजपचे दोन आणि संयुक्त जनता दलाच्या एका खासदाराचा समावेश आहे. त्याशिवाय, आघाडीतील अन्य काही खासदार आजारपणामुळे मतदानासाठी येऊ शकणार नाहीत, अशी चिन्हे आहेत.


निर्णायक मते ममता बॅनर्जी (तृणमूल कॉंग्रेस) - कॉंग्रेस, मार्क्‍सवादी आणि भाजप यांच्यापासून दूर राण्याचा निर्णय. त्यामुळे विश्‍वासदर्शक ठरावाच्या वेळी तटस्थ राहणार. ब्रजभूषण सरन (बलरामपूर, भाजप) - मतदारसंघ फेररचनेत सरन यांचा मतदारसंघ राखीव. पक्षादेश झुगारून सरकारच्या बाजूने मतदान करण्याची शक्‍यता.

राम स्वरूप प्रसाद (नालंदा, संयुक्त जनता दल) - नितीशकुमार यांनी मंत्रिपद न दिल्याचा राग. त्यामुळे सरकारच्या बाजूने मतदानाची शक्‍यता. दयानिधी मारन (द्रमुक) - मतदानाच्या वेळी तटस्थ राहण्याची भूमिका सोनिया गांधींबरोबरील चर्चेनंतर बदलली. आता सरकारच्या बाजूने मतदान करणार. कुलदीप बिष्णोई (हरियाना जनहित कॉंग्रेस) - ""मी सोनिया गांधी यांच्या विरोधात आहे, त्यामुळे ठरावाच्या विरोधात मतदान करणार.'' मणि चेरेनमेई (अपक्ष, मणिपूर) - काही तरी अडचण आली की आमची आठवण येते. नाही तर आम्हाला कोण विचारतो? एस. विश्‍वमुथीयारी (अपक्ष, आसाम) - अज्ञात ठिकाणी रवाना. थेट मतदानाच्या वेळी सभागृहात येण्याची शक्‍यता. तुपस्तन चेवांग (अपक्ष, लडाख) - दिल्लीतून अज्ञातस्थळी रवाना, मतदानाच्या आधी काही तास सभागृहात येणार

अनुपस्थित राहण्याची शक्‍यता शिवसेना १ संयुक्त जनता दल २ बिजू जनता दल १ भाजप ६ (कर्नाटक २, गुजरात २, राजस्थान २)

सत्तेच्या साठमारीत कोणाची नाव तरणार आणि कोणाची बुडणार हे आज स्पष्ट होईल. आपली राजकीय निरीक्षणे काय सांगतात? आम्हाला ताबडतोबीने कळवा..

1 comment:

Unknown said...

जे काय संसदेच्या सभागृहात चालले आहे ते अतिशय घ्रुणास्पद व निंदनीय आहे!

इतकी वर्षे प्रतिस्पर्धी असलेल्या पक्षांशी हातमिळवणी करणे,खूनाच्या गुन्ह्यासाठी शिक्षा झालेल्या खासदारांना तुरुंगातून सोडवून सरकारच्या पारड्यात मते टाकण्यास आणणे,सोयिस्करपणे कांही खासदारांनी गैरहजर रहायची तजवीज करणे,पैशाच्या बळावर खासदार विकत घेणे,थोडक्यात अतिशय नीच पातळीवर उतरून राजकारण करणे हे फ़क्त कोंग्रेस पक्ष व त्याचे कांही साथीदारच करू शकतात!!!

हे सरकार तरले किंवा बुडले काय त्याचे पितळ पूर्ण उघड पडले आहे!हे सर्व कशाकरता तर १० वर्षांनी होउ पहाणा-या प्रचंड महागड्या अणुउर्जेसाठी???

आपल्या कांही लोकप्रतिनिधींचे हे किळसवाणे प्रदर्शन आहे!घोडाबाजार संपून घोडा मैदान जवळ ठेपले आहे!!!May God help the country!!!