Wednesday, April 30, 2008

राजधानीची प्रतिमा डागळतेय नवी दिल्ली

राजधानीचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिल्लीची प्रतिमा या वर्षात घडलेल्या बलात्कारांच्या घटनांमुळे डागाळू लागली आहे. या वर्षातील चार महिन्यांत दिल्लीत तब्बल 330 बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये बलात्काराच्या 121, तर विनयभंगाच्या 210 घटना आहेत.

या सर्व गुन्ह्यांची दिल्लीतील विविध पोलिस ठाण्यांत नोंद झाली आहे. विशेष म्हणजे या महिन्यात एका अल्पवयीन मुलीसह चौदा महिलांवर बलात्कार झाले आहेत.

दरम्यान, बलात्काराच्या वाढत्या घटनांची महिला आणि बालकल्याण विभागाच्या संसदीय समितीने गंभीर दखल घेतली असून दिल्लीचे पोलिस आयुक्‍त वाय. एस. दाडवाल यांना एक समन्स काढून पोलिसांनी कोणत्या प्रकारची कारवाई केली याची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत माहिती देताना एक वरिष्ठ पोलिस अधिकारी म्हणाला, ""बलात्काराच्या घटनांतील 90 टक्‍के आरोपींना जेरबंद करण्यात आम्हाला यश आले आहे. अशा प्रकारच्या बहुतांश घटनांमध्ये आरोपी हा संबंधित महिलांना ओळखत असल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या वर्षी दिल्लीत तब्बल 581 बलात्काराच्या घटना घडल्या होत्या. त्यातील 98.28 टक्‍के घटनांची पोलिसांकडे नोंद झाली होती. 2005 मध्ये बलात्काराच्या 658 घटना घडल्या होत्या. 2005 आणि 2006 मध्ये विनयभंगाच्या 762 व 713 घटना घडल्या होत्या. तर 2007 मध्ये 835 विनयभंगाचे गुन्हे नोंद झाले होते.''

बलात्कारच्या गुन्ह्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी मध्यंतरी जोर धरू लागली होती. मात्र, त्याचे पुढे काय झाले हे कोणालाही कळले नाही. तर ती मंजूर झाली असती, तर बलात्काराच्या घटनांना आळा बसला असता. अजूनही वेळ गेलेली नाही, निर्णयकर्त्यांच्या शहरातच अशा घटना होत असतील तर, ही शरमेची बाब आहे. ही वेळ आहे निर्णय घेण्याची.

No comments: