Tuesday, April 01, 2008

वडिलांच्या साक्षीमुळे बलात्कार करणाऱ्या मुलाला सक्तमजुरी

आतला आवाज ऐकलाः अठरा महिन्यांच्या निष्पाप मुलीला न्याय

अठरा महिन्यांच्या निष्पाप मुलीला न्यायस्वतःच्या मुलाचा गुन्हा लपवायचा की अठरा महिन्यांच्या निरागस बालिकेला न्याय द्यायचा याचा निर्णय धारावीतील मुस्तकिन खान यांनी सदसद्विवेकबुद्धी वापरून घेतला आणि आपल्या सव्वीस वर्षांच्या मुलाला पोलिसांच्या स्वाधीन केले. विशेष न्यायालयाने मोईन खान याला बलात्काराच्या आरोपाखाली दहा वर्षे सक्तमजुरीची सजा सुनावली.

धारावीत इस्टेट एंजट म्हणून काम करणाऱ्या मोहम्मद मुस्तकिन खान यांचा मुलगा मोईनने अठरा महिन्यांच्या मुलीवर दोन वर्षांपूर्वी बलात्कार केला. शीव रेल्वेस्थानकावर रोजंदारीचे काम करणाऱ्या एका दक्षिण भारतीय महिलेशी वाद झाल्याने त्याने त्या बालिकेवर बलात्कार केला होता. मुलीला घरी घेऊन गेला असता मुस्तकिन खान यांना संशय येऊन त्यांनी धारावी पोलिस ठाण्यात जाऊन स्वतःच्या मुलाच्या कृत्याची माहिती दिली. त्यानंतर मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यावर तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी रेल्वेस्थानकावर जाऊनही चौकशी केली. तेव्हा आरोपीचे व मुलीच्या आईचे भांडण झाल्याचे सांगणारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पोलिसांना सापडले. वडिलांनीच मुलाचा ठावठिकाणा सांगितल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. त्यावेळेस तो ऑर्थर रोड कारागृहात होता. मात्र न्यायालयात खटला सुरू झाल्यावर मोईन पुन्हा फरारी झाला. त्यानंतर एकदा तो घरी आल्यावर आंघोळ करीत असताना पुन्हा मुस्तकिन यांनी पोलिसांना दूरध्वनी करून कळविले आणि त्याला अटक करण्यात आली. बलात्कार, अपहरण, मारहाण असे गुन्हे पोलिसांनी नोंदविले आहेत.

विशेष न्या. स्वाती जोशी यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व घटनात्मक पुराव्यांवरून आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड ठोठावला. आरोपीचा बाप असूनही मुस्तकिन यांनी घेतलेल्या कणखर भूमिकेबाबत पोलिसांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले. एकदा पाहिलेल्या मुलीसाठी त्यांनी आपल्या मुलाचे नाते विसरून निष्पाप मुलीला न्याय दिला, अशी प्रतिक्रिया निकालानंतर पोलिसांकडून व्यक्त होत होती.

मुलांनी केलेल्या वाईट कृत्यावर पांघरून घातले जाते, अशी ओरड पालकांबाबत होताना नेहमीच दिसते. त्यातून पुढे मुलांची गुन्हेगारी वृत्ती बळावते. अशा अवस्थेत मोहम्मद मुस्तकिन खान यांनी मुलांच्या विरुद्ध साक्ष देऊन समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. मुस्ताकिन यांचे कौतुक व्हायलाच हवे....

2 comments:

ashishbadwe.blogspot.com said...

मिस वैशाली ही बाब निश्चीतच कौतुकास पात्र असली तरी बलात्काराच्या वाढत्या आलेखाला शुन्यावर आणण्याकरिता ठोस उपायांची गरज निश्चीत आहे.
- आशिष बडवे पांढरकव़डा
www.dainikyavatmalnews.com
www.vidarbhanews.blogspot.com
www.newsindiapress.blogspot.com
ashish_badwe@yahoo.co.in
Contact - 09403455960

Anonymous said...

Mustakin Khan hyancha satkaar karava. Tyani kharya arthane tya muli la nyay dila aani aaplya changul-panache pradarshan kele.
Asshi sajjan aani pramanik maanse aajkaal durmilach aahet.