सत्यमचा धडा
सत्यम कॉम्प्युटर्सचे अध्यक्ष बी. रामलिंगम राजू यांनी आपण कंपनीमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याची कबुली देत आपला राजीनामा दिला. त्यानंतर सत्यमचा शेअर तब्बल ७७ टक्क्यांनी कोसळला आणि शेअर बाजाराला तसेच सर्वसामान्य गुंतवणूकदाराला धक्का बसला.
अमेरिकेतील सब प्राइमचा बसलेला फटका, त्यानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळलेल्या अनेक वित्तीय संस्था, कच्च्या तेलाचे दिवसेंदिवस उतरत असलेले भाव या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजारासह जगभरातील सर्वच प्रमुख शेअर बाजार "आजारी' अवस्थेत होते. त्यांच्या प्रकृतीत थोडा-फार चढउतार होत असला तरी म्हणावी तशी सुधारणा नव्हती. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्येही हतबलता आली होती. त्यात सत्यमच्या घोटाळ्याचीही भर पडली.
या घोटाळ्याने कॉर्पोरेट क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांच्या प्रतिमेला धक्का लावण्याचे काम तर केले आहेच शिवाय शेअर बाजाराच्या, शेअर बाजाराची नियंत्रक म्हणून काम करणाऱ्या "सेबी'च्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सत्यमची नोंदणी न्यूयॉर्क शेअर बाजारतही झाली आहे. त्यामुळे या गैरव्यवहारामुळे भारतातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची परदेशात जी प्रतिमा आहे, तिलाही धक्का बसला आहे. या निमित्ताने हिशेब लेखापरीक्षण, नियंत्रण यांतील ज्या काही त्रुटी उघड झाल्या आहेत, त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूक किती सुरक्षित आहे, याचा विचार सर्वसामान्य, मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांच्या मनात येणे स्वाभाविक आहे.
गेल्या काही वर्षांत मध्यमवर्गीयांची शेअर बाजारातील गुंतवणूक वाढली होती. गुंतवणूकदारांनाही फायदा होतच होता. मात्र सध्याची आर्थिक अस्थिरता आणि सत्यमने शिकवलेला धडा यांमुळे कमीत कमी काळात अधिक फायद्यापेक्षाही सुरक्षिततेचा विचार केला, तर नवल वाटायला नको. ही गोष्ट गुंतवणूकदार आणि कंपन्या दोन्हींसाठी फारशी चांगली नाहीये. त्यामुळेच या प्रकरणातून धडा घेऊन अर्थ मंत्रालय, कंपनी कामकाज खाते, सेबी या सर्वांनी कंपन्यांच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणे, आवश्यक आहे.