Showing posts with label government of maharashtra and india. Show all posts
Showing posts with label government of maharashtra and india. Show all posts

Tuesday, October 07, 2008

बालकुपोषितांच्या मृत्यूस शासकीय अनास्थाच जबाबदार

औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या,देशातील प्रगत राज्यांपैकी एक असलेल्या महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यात कुपोषणामुळे पाचशेहून अधिक बालकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील सामाजिक विषमता अधोरेखित करणारी, तसेच सरकारी यंत्रणांची या प्रश्‍नाविषयी असलेली अनास्था दर्शविणारी ही आकडेवारी आहे.


राज्यात 2003-04 या वर्षात कुपोषणामुळे 8321 एवढे बालमृत्यू झाले. तर, 2004-05 आणि 2005-06 या वर्षांत ही आकडेवारी अनुक्रमे 8003 आणि 7700 होती. केवळ 15 जिल्ह्यांतल्या दुर्गम भागातील आहे, म्हणजे केवळ निम्म्या महाराष्ट्रतली ही आकडेवारी असून आजही मृत्यूचे प्रमाण फारसे बदललेले नाहीत. (सरकार दरबारी जरी हे प्रमाण कमी झाल्याची नोंद असली तरी!) असे असूनही या कुपोषणाच्या समस्येकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. एवढेच नाही, तर महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून काहीच किलोमीटरील ठाणे जिल्ह्यांतील आदिवासी पाड्यांवरही कुपोषणाचे प्रमाण गंभीर आहे.


मेळघाट हा अमरावती जिल्ह्यांतला अतिदुर्गम भाग आहे. तसेच तो अतिदारिद्रय अडाणीपणा, अंधश्रद्धेने ग्रासलेला आहे. शेती आणि इतर प्राथमिक उद्योगांवरच येथील लोक अवलंबून आहेत. आरोग्याचे प्रश्‍न येथे गंभीर आहेत पण त्यांतील गांभीर्य ना इथल्या लोकांना जाणवतं ना सरकारला. गेल्या पाच महिन्यांत मेळघाटमध्ये कुपोषणामुळे मृत्यू झालेल्या मुलांची संख्या 176 इतकी आहे. ऑगस्ट महिन्यात कुपोषणामुळे 57 बालकांचा मृत्यू झाला आहे.

अशा परिस्थितीतही मेळघाटमधील आरोग्यकेंद्रांची संख्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. बऱ्याचदा येथील आरोग्य सेवकांनाही अतिकुपोषितांचे निदान (ग्रेड 3 किंवा 4) करता येत नाही. साहजिकच त्यामुळे त्याच्यावर योग्य उपचार होत नाहीत.


या भागात डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग त्यांच्या "सर्च' या संस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. मात्र एकटे डॉ. बंग या समस्येचे निवारण करू शकत नाहीत.

मेळघाट हा आदिवासी भाग आहे, त्यामुळे इथे असे प्रश्‍न निर्माण होणारच असा विचार करून जर या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करू नका. ठाण्यामध्ये गेल्या तीन महिन्यात कुपोषणाने 274 बालकांचा बळी घेतला आहे. मात्र हे मृत्यू न्यूमोनिया आणि अन्य आजाराने झाल्याचे शासनाने म्हटले आहे. मात्र तरीही ठाण्यातील परिस्थिती बरीच सुधारली आहे, असे म्हणावे लागेल. कारण दोन वर्षांपूर्वी याच कालावधीत कुपोषणामुळे मृत्यू झालेल्या मुलांचा आकडा 412 होता.


महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या डॉ. अभय बंग समितीने दिलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रात कुपोषणामुळे दरवर्षी एक लाख 60 हजार बालकांचा मृत्यू होत असल्याचे म्हटले होते. हा अहवाल 2004 मध्ये प्रकाशित झाला होता आणि शासनाने तो स्वीकारलाही होता. इतकेच नाही, तर त्यानंतर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दलवीर भंडारी यांनी या प्रश्‍नी हलगर्जीपणा केल्यावरून सरकारला धारेवरही धरले होते. या सर्वांचा परिपाक म्हणून तरी चार वर्षांत "सरकारी उपाययोजनां'मुळे कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूचे प्रमाण कमी होणे अपेक्षित होते. मात्र वरील आकडेवारी विचारात घेतली तर असे काही झालेले दिसत नाही.
अनेक स्वयंसेवी संस्था कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत असताना शासनाकडून मात्र अनास्थाच दाखविली जात आहे. ही अनास्था आणखी किती बालकांचा बळी घेणार आहे, हे शासनच सांगू शकेल. नाही का? आपल्याला काय वाटते?

Wednesday, October 01, 2008

कोठे आहेत मराठी अधिकारी?

मराठी-अमराठी वाद ताजा असातानाच प्रशासनात वाढणारी उत्तर भारतीयांची संख्या आणि कमी असलेला मराठी टक्का हा (पुरवणी) विषयही आता गाजू लागला आहे आणि तोही ऑनलाइन ... "कोठे आहेत मराठी अधिकारी', असा सवाल करीत आता थेट "ई-मेल'वरुनच "मराठी अस्मिते'ला जागं केलं जात आहे.मात्र मराठी अस्मिता किंवा परप्रांतीय विरोधाचा पूर्वग्रह दूर करून पाहिले, तरी केंद्रीय प्रशासनात मराठी नावं अभावानंच ऐकायला मिळत असल्याचं चित्र आहे.

प्रशासनात मराठी अधिकाऱ्यांचे प्रमाण तुलनेनं कमीच किंबहुना नगण्यच आहे. केंद्राच्या प्रत्येक मंत्रालयामधील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची यादी पाहिली तर त्यात मराठी अधिकाऱ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असल्याचं दिसून येतं. संरक्षण, रेल्वे, पेट्रोलियम, हवाईउड्डाण अशा महत्त्वाच्या मंत्रालयात उच्चस्तरिय महत्त्वाच्या 50 अधिकाऱ्यांमध्ये एकही मराठी नाव दिसत नाही. अगदी कृषि मंत्री शरद पवारांच्या खात्यातही एकही मराठी माणूस नाही! प्रत्येक मंत्रालयाचे अधिकृत संकेतस्थळ पाहिल्यानंतर केंद्रामध्ये आठ मंत्री असलेल्या महाराष्ट्राच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे प्रमाण मात्र समाधानकारक नाही किंबहुना केंद्रीय प्रशासनातील महत्त्वाच्या पदांवर मराठी अधिकारी नसल्याचेच दिसते.महाराष्ट्रातही फारशी वेगळी परिस्थिती नाही.

सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांपैकी 70 टक्‍के नावं ही परप्रांतीयच आहेत. त्यामुळे मराठी माणसाच्या हिताचा विचार करताना शासकीय सेवेत मराठी माणसांसाठी आरक्षणाची मागणीही काही संघटनांतर्फे केली जात आहे.पण अशी मागणी करण्याच्या आधी थोडा विचार केला तर ही नाण्याची केवळ एकच बाजू आहे, हे लक्षात येईल. कारण प्रशासनातले हे अधिकारी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमधून निवडले जातात. आणि अशा परीक्षांना बसणाऱ्या महाराष्ट्रीय मुलांची संख्या ही उत्तर भारतातील राज्यांतील मुलांच्या तुलनेत कमी आहे. शासकीय सेवेपेक्षा मराठी मुलांना प्रायव्हेट सेक्‍टर जास्त आकर्षित करतात,त्यामुळे "साहेब' होण्याची "क्रेझ' उत्तर भारतीय मुलांपेक्षा महाराष्ट्रीय मुलांत तुलनेने कमीच आहे.


गेल्या काही वर्षांत मात्र हे चित्र बदलत आहे. "यूपीएससी'मध्ये उत्तीर्ण होणाऱ्या मुलांमध्ये मराठी मुलांचे प्रमाण वाढत आहे. तरीही ही सुरवातच आहे, पण ती आश्‍वासक आहे, हे निश्‍चित. त्यामुळेच अस्मिता, भाषा अशा मुद्द्यांवरून मराठी मुलांना आरक्षणाची मागणी करण्यापेक्षा स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या मराठी मुलांचे प्रमाण कसे वाढेल, याचा विचार होणे आवश्‍यक आहे.