Wednesday, July 16, 2008

पुण्यात भारनियमन

पावसाने दिलेली ओढ, विजेची वाढती मागणी आणि अपुरा पुरवठा यांमुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीमुळे पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातही एक तासाचे भारनियमन करण्यात येत आहे.

"पुणे मॉडेल'द्वारे पुण्यात गेली तीन वर्षे अखंडित वीजपुरवठा करण्यात येत आहे, तसेच पावसाळ्यात विजेची मागणीही तुलनेने कमी असते. मात्र, गेल्या काही आठवड्यांमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे साऱ्या महाराष्ट्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पाऊस नसल्याने कृषिपंप सुरू आहेत; त्यामुळे विजेची मागणी वाढतच आहे. त्याच वेळी विजेच्या पुरवठ्यातही घट झाली आहे. केंद्रीय प्रकल्पांमधून मिळणारा विजेचा वाटा कमी झाला आहे. तसेच, पावसामुळे कोयनेतील वीजनिर्मितीही घटली आहे. या बिकट परिस्थितीमुळे राज्यात नेहमीच्या भारनियमनाव्यतिरिक्त एक हजार मेगावॉटचे अतिरिक्त अघोषित भारनियमन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पुण्यात एक तास भारनियमन करणे अपरिहार्य झाल्याचे "महावितरण'ने म्हटले आहे.

आणि पाणीकपातही...

धरणांत पानीसाठा कमी असल्याने, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत पाणीपुरवठ्यात बुधवारपासून २० टक्के पाणी कपात करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जाहीर केले. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या धरणांत केवळ २८ टक्के पाणीसाठा आहे. हा साठा पुण्याला सहा महिने पुरेल. १५ जुलैला पुढील वर्षाच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येते. सध्याचा साठा पुढील वर्षभरात वापरण्याचे नियोजन करण्याच्या उद्देशाने पुण्याच्या हद्दीत पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

पुणे शहरात सध्या पाण्याची ३० टक्के पाणीगळती होती. पुण्याला १२ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी दिले जाते. त्यांपैकी तीन अब्ज घनफूट पाणी वाया जाते. म्हणजे टेमघर धरण पूर्ण भरेल, इतके पाणी वाया जाते. ही गळती थांबविली, तर पाणीकपातीची वेळ येणार नाही.

पुण्यासमोर सध्या अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. वीज आणि पाणीकपात करून या प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याचे धोरण शासनाने आखल आहे. अशा परिस्थितीत पुणेकरांकडून संयम ठेवणे आवश्‍यक आहे. त्यासाठी पुणेकरांनी काय करायला हवे, असे आपल्याला वाटते? आपल्या प्रतिक्रिया या ब्लॉगवर जरूर मांडा...

No comments: